ऑनलाईन वेध कट्ट्याची छोटीशी समृध्द गोष्ट

उमलत्या वयातील मुलांसाठी “जीवन की पाठशाला” असणारी “वेध” ही व्यवसाय प्रबोधन परिषद महाराष्ट्रातील दहा शहरांत आयोजित होत असते. हजारो मुले, त्यांचे पालक यांच्या जीवनात चैतन्याचे दीप उजळणारी ही परिषद डॉ. आनंद नाडकर्णी या मनोविकासमहर्षींनी मोठ्या निगुतीने गेली ३० वर्षे फुलविली आहे. या निमित्ताने ठिकठिकाणी वेध संयोजकांचे समुह निर्माण झाले. दोन वेधच्या दरम्यान आपापल्या पातळीवर मनोविकासात्मक कार्यक्रमांचे सातत्य राखण्यासाठी “वेध कट्टयांचे” आयोजन अनेक वेध समुहांनी सुरु केले. या “मिनी वेध” सोहोळ्यांचे उत्तम परिणाम ठिकठिकाणी दिसून आले. असे सर्व सुरळीतपणे चालू असताना, आणि शंभराव्या वेधचे वेध सर्वांना लागलेले असताना अचानक कोरोनाच्या विश्वव्यापी प्रकोपाने सगळ्यांचेच जगणे ठप्प केले.

सर्वच ठिकाणच्या शाळा बंद झाल्या. SSC बोर्डाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी व ११ वीच्या परीक्षा रद्द झाल्या. इयत्ता १० वीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला. इतर बोर्डांच्या परीक्षांच्या बाबतीतही थोडेबहुत असेच घडले. सर्वांसाठीच हे शैक्षणिक वर्ष कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपूर्णता शिल्लक ठेऊन संपले. या पार्श्वभूमीवर डॉ. नाडकर्णींचे एखादे मनोविकासात्मक सेशन विद्यार्थ्यांना दिलासा देणारे ठरेल या उद्देशाने पुणे वेधचे पळशीकर सर आणि कल्याण वेधचे ताम्हाणे सर यांनी पुढाकार घेतला आणि “आपोआप दहावी” या नावाने एक झुम मिटींग आयोजित केली. या मिटींगला अत्यंत उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. डॉक्टरांनी अतिशय सोप्या भाषेत कसोटीचा काळ, शिकण्याच्या नव्या पध्दती, शिक्षकांची-पालकांची भूमिका यावर मार्गदर्शन केले. दिनांक १९ एप्रिल २०२० रोजी ही मिटींग पार पडली.

या मिटींगमुळे “ऑनलाईन वेध कट्ट्याचे” बीजारोपण झाले असे म्हणायला हरकत नाही. झुम मिटींगचा हा अनुभव अतिशय वेगळा होता. ठिकठिकाणी असलेले लोक त्यांच्या मोबाईलवरुन, संगणकावरुन यात सहभागी झाले, इतकेच नव्हे, तर वेधमध्ये अनुभवाला येणारी एकतानता त्यांच्यात अनुभवायला आली. ही किमया तंत्रज्ञानाची जशी होती, तशीच लोकांच्या त्या अनुभवाला सामोरे जाण्याच्या असोशीचीही होती. कोरोनाच्या कसोटीकाळात अशाप्रकारचा विधायक उसंतकाळ लोकांना हवा आहे याची जाणीव आयोजकांना झाली.

यानंतरच्या रविवारी ताम्हाणे सर (मंत्र यशाचा तंत्र अभ्यासाचे), पेण वेधचे धारप सर (मैत्री मूलद्रव्यांची) आणि ठाण्याचे संजय जोशी सर (गोष्ट उत्क्रांतीची) यांची अभ्यासाच्या विविध पैलूंवर आधारित व्याख्याने झाली. ऑनलाईन वेध कट्ट्याच्या उत्क्रांतीचा पुढला टप्पा आला तो १७ मे रोजी झालेल्या अमेय अरगडेच्या सेशनमुळे. पुणे वेधची तरुण कार्यकर्ती केतकी जोशी हिने फुटबॉल प्रशिक्षक म्हणून कारकिर्द घडविणाऱ्या अमेयची मुलाखत घेतली. तरुणाईची उत्साही उर्जा आणि अनौपचारिक आत्मीयता यामुळे वेध कट्टा आणि प्रेक्षक यांच्यातील अंतर गळून गेले आणि कट्टा आपल्या नावाच्या अधिक जवळ गेला.

वाळंज सरांचे इंग्रजी भाषेचे सौंदर्य उलगडून दाखविणारे सेशन लक्षात राहिले. त्यानंतरचे चेतन एरंडे यांच्या सेशनमध्ये एका सुजाण पालकाचा शिक्षणाच्या क्षेत्रातील वैचारिक आणि कृतिशील प्रवास अनुभवता आला, तर सौ. माधवी ताम्हाणे यांच्या सेशनमध्ये समृद्ध पालकत्वाची पारंपारिक तरीही वेगळी वाट समजून घेता आली.

वेध कट्ट्यावर ऋतुजा सीमा महेंद्र आणि प्रफुल्ल शशिकांत आले होते. कसोटीच्या काळात समाजाच्या उतरंडीच्या शेवटच्या पायरीवरील विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षण घेऊन जाणारे ‘वोपा’ या संस्थेचे कार्य त्यांच्याकडून समजून घेता आले. त्यानंतरच्या काळात आलेले कांतराव देशमुख हे ही ग्रामीण भागात गाडून घेऊन काम करणारे भगिरथ. परभणी वेध समुहाने आयोजित केलेले हे सेशनही फार छान झाले.

ऑनलाईन वेध कट्ट्याच्या उत्क्रांतीचा आणखी एक टप्पा आला तो वेध परिवारातील गुणवान मुलांच्या केतकी जोशी यांनी घेतलेल्या मुलाखतीतून. केतकीताईबरोबरच्या या मुलांच्या गप्पा म्हणजे या मुलांसाठी एक प्रशिक्षणवर्गच होता. मुलाखतीला सामोरे जाताना या मुलांना स्वत:कडे जसे वळून पाहता आले, तसे प्रेक्षकांना ‘वेध’, ‘बहुरंगी बहर’ या मनोविकासात्मक कार्यक्रमांचा सुंदर सुपरिणाम मुलांच्या व्यक्तीमत्वांमध्ये फुललेला पाहता आला. यातील आभा आणि मुक्ता यांनी कट्ट्याच्या अंतीम सत्रांमध्ये चक्क मुलाखती घेतल्या. ऑनलाईन कट्ट्याचे हे अनुषांगिक फलित तितकेच महत्त्वाचे आहे.

अमरापूरकर भगिनींच्या अनौपचारिक गप्पा इथे रंगल्या. सायली मराठे या उद्योजिकेची भेट झाली, तशी जयदीप आपटेंसारख्या उदयोन्मुख शिल्पकाराला समजून घेता आले. नाशिक वेधने तन्मय दीक्षित यांचे डिजीटल सुरक्षेवरचे सेशन घेतले.

सिध्दार्थ सावंत हा नेत्रदिव्यांग वादक, संगीतकार, ॲथलीट, सायकलपटू, ट्रेकर असा बहुरंगी व्यक्तीमत्वाचा आहे, तर अतीत गावची दिव्या जगदाळे संपादिका, लेखिका आणि कवयित्री आहे. अशा अष्टपैलू तरुणाईला भेटण्याची संधीही ऑनलाईन वेध कट्ट्याने प्रेक्षकांना दिली.

ऑनलाईन वेध कट्ट्यांची सांगता नाशिक वेधच्या वंदनाताई अत्रे यांच्या नाट्यानुभवाने झाली. माणसाच्या पेशी प्रथमच प्रयोगशाळेत वाढवण्याच्या प्रयत्नांमधे यशस्वी ठरलेले डॉ. जॉर्ज गे आणि पूर्वसंमती न घेता ज्या स्त्रीच्या पेशी संशोधनासाठी वापरल्या गेल्या, ती आफ्रिकन-अमेरिकन, शेतमजूर स्त्री हेन्रीएटा लँक्स यांची पेशीकथा वंदनाताईंनी अप्रतिमरित्या लिहिली, राजेंद्र अत्रे व शोभना बापट यांनी तितक्याच प्रभावीपणे ती सादर केली.

“ग्लोबल वेधची” संकल्पना डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या मनात साकार होत गेली, त्यात या ऑनलाईन वेध कट्ट्याचा थोडातरी वाटा असणार याचे अपार समाधान आयोजकांना आहे. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सायंकाळी ग्लोबल वेधची सत्रे ९९ वा वेध म्हणून साजरी होणार आहेत. भारताशी जन्माने वा जगण्यातून ज्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत असे ग्लोबल पाहुणे या वेधमध्ये येणार आहेत. एका अर्थाने ९९ वा वेध म्हणजे भारताच्या समृध्द परंपरेच्या जगात उमटलेल्या सुंदर प्रतिबिंबाचा आरसा असणार आहे.

ऑनलाईन वेध कट्टा हे ग्लोबल वेधचे मिनीएचर मॉडेल जसे होते, तसे कार्यकर्त्यांसाठी ती ‘वेध की पाठशाला’ ही होती. झुम मिटींग आयोजित करता करता ताम्हाणे सर फेसबुक लाईव्हही करु लागले. त्यामुळे वीसपैकी नऊ सेशन्स फेसबुकवर स्थायी स्वरुपात विराजमान झाले. पळशीकर सरांची वेधप्रती असलेली अचल निष्ठा आणि ताम्हाणे सरांची अक्षय उर्जा यामुळे “ऑनलाईन वेध कट्टा” इतका देखणा झाला. नाशिक वेधच्या वंदनाताई, बदलापूर वेधच्या अमलाताई, पुण्याच्या केतकी जोशी ऑनलाईन वेध-संयोजनात सहभागी होत्या. कट्ट्याने प्रस्तुत लेखकाला ब्लॉग लेखनासाठी उद्युक्त केले. विविध ठिकाणच्या वेध कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन साजरे केलेले हे वेध कट्टे वेधची समुहभावना अधिक बळकट करणारे होते.

ज्यांच्यासाठी हा उपक्रम आयोजित केला ते ऑनलाईन वेध कट्ट्याचे प्रेक्षक. त्यांच्या सहभागामुळेच हा उपक्रम यशस्वी झाला. डिजीटल टाळ्या वाजविणारे, मुलाखत पार पडल्यावर गप्पांमध्ये सहभागी होणाऱ्या प्रेक्षकांनी हा कट्टा विविधरंगांनी सजविला. पुणे वेधच्या ज्योतीताई, लातूर वेधचे प्रदिप कुलकर्णी यांनी या गप्पांमध्ये नेहमीच विधायक सहभाग घेतला.

ग्लोबल वेधची सत्रे सुरु झाल्यानंतर ऑनलाईन वेध कट्ट्याची सांगता करावी असे ठरले आहे. अर्थात वेधवृत्ती यामुळे थांबणार नाही. ठिकठिकाणचे वेध समुह निरनिराळ्या नावांनी, निरनिराळ्या स्वरुपात अशाप्रकारचे उपक्रम साजरे करतीलच. त्यावेळी, कधीतरी, कुणालातरी या वीस सत्रांतील कोणतेतरी क्षण स्मरतील. अशा समृध्द क्षणांच्या साठवणुकीसाठी तर हा सारा खटाटोप.

-मंदार परांजपे,
वेध कार्यकर्ता

ग्लोबल वेध ची सत्रे पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकचा वापर करुन ‘आवाहन’ या यूट्यूब चॅनेलला subscribe करा: https://www.youtube.com/channel/UCwZit5ah1vBwbpeQV55VRIA

ऑनलाइन वेध कट्ट्यावर संपन्न झालेले कार्यक्रम पाहण्यासाठी लिंक:

ऑनलाइन वेध कट्ट्याबद्दल काही ब्लॉग्स:

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: