माध्यमांतर आणि द्राविडी प्राणायाम!

वर्ष २०२० सुरु झालं तोवर सगळं काही सुरळीत सुरु होतं, पण पुढच्या दोन महिन्यात जे चित्र पालटलं ते तर सर्वांनाच माहित आहे. वर्षाच्या सुरुवातीला ज्या काही गोष्टी ठरविल्या होत्या त्या सर्वांना “lockdown” कराव्या लागल्या. अंगावर बेड्या नाहीत, पण शरीरापासून मनापर्यंत सगळेच जखडले गेलो. सुरुवातीचे काही महिने तर नेमकं काय घडतंय हे कळण्यातच गेले, आणि पुढचे काही त्या मुद्द्यांना समजून घेऊन त्यांच्याशी जुळवून घेण्यात गेले; आणि अजूनही चाचपडतच चाललो आहोत. “One step at a time” या उक्ती प्रमाणे सगळे अगदी हळुवार पुढे- पुढे चाललो आहोत.

या सर्व कोलाहलात, आमच्या आय्. पी. एच्  संस्थेचा देखील गाडा अचानक थांबला. अगदी तोंडाशी आलेला
आय्. पी. एच्  संस्थेचा वाढदिवस साजरा करण्यासाठी घातलेला घाट देखील ऐनवेळी रद्द करावा लागला. सगळ्यांनाच धक्का बसला. खरंतर आजवर आय्. पी. एच् चा एखादा कार्यक्रम रद्द झाला असं माझ्या ऐकिवात तरी नाही , पण परिस्थितीच अशी झाली की हाच एकमेव पर्याय समोर राहिला. त्यामुळे आम्हा सर्वच कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. पण हे प्रकरण फारच क्लिष्ट आहे हे जाणवलं. त्यातून पुढचे अनेक प्रोजेक्ट्स देखील रद्द करावे लागणार याची जाणीव झाली. त्यात आय. पी. एच  चा सगळ्यात मोठा आणि महत्वाचा उत्सव म्हणजे ‘वेध’ आणि तो ही केवळ संस्थेपुरताच नाही तर अखिल महाराष्ट्रभर होत असणाऱ्या सर्वच ठिकाणी तो रद्द करावा लागणार होता.
मग आता पुढे काय ….??
नुसतं वाट बघत बसायचं ? 

जणू महाभारतामधल्या अर्जुनासारखी “सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति । “ अशी अवस्था झाली होती साऱ्यांची. तिथे त्याचे आप्त होते, पण इथे कोरोना पुरेसा होता…
पण पुढे गीतेत श्रीकृष्ण म्हणतात “क्षुद्रं हृदयदौर्बल्यं त्यक्त्वोत्तिष्ठ परन्तप”. या उक्तीला लक्षात ठेऊन पुढील आखणी करावी, असं डॉक्टर नाडकर्णी यांच्या मनात आलं, आणि मग सर्वानुमते ‘वेध’ रद्द करण्यापेक्षा त्याचं रुपांतर करून
‘वेध ऑन वेब’  म्हणजेच ‘ग्लोबल वेध‘ ही संकल्पना अमलात आणायची हे ठरलं!
म्हणजे समोरच्या अडचणीला संधीत कसं बदलायचं हे सुद्धा आम्ही डॉक्टर आणि वेध यांच्यामुळे शिकलो असं मी म्हणेन.

याचा श्रीगणेशा सुद्धा ऑनलाईन मीटिंग ने करायचा हे नक्की झालं. पहिली मीटिंग आम्ही कोरोना काळात फार प्रचलित झालेल्या माध्यमांपासून म्हणजे ‘झूम’ या अ‍ॅप पासून केली. तोवर खरं सांगायचं तर माध्यम बदल मी तितक्या खुशीने स्वीकारला नव्हता. माझी सुद्धा ‘झूम’ सारख्या माध्यमाबरोबर पहिली ओळख या मीटिंग पासूनच झाली. मग नवल वाटलं, आणि मग या माध्यमाबरोबर मैत्री करण्याची धडपड सुरु झाली. खरंतर आताच्या पिढीला माध्यम बदल हा तितकासा जड विषय नाही, पण  पोहणे शिकण्यासाठी पाण्यात उडी मारावी लागते, म्हणून आम्ही त्या पाण्यात उडी मारली! सुरुवातीला खूप हातपाय मारले, गटांगळ्या खाल्ल्या, प्रवाहाचा रोख शोधू लागलो आणि मग आता कुठे हळू- हळू त्या प्रवाहाशी जुळवून घेऊ लागलो आहोत. आम्ही अजूनही पोहणं शिकलोय असं मी म्हणणार नाही. आम्हाला तळ नाही गाठता आला पण प्रवाहासोबत एकरूप होतोय हे नक्की म्हणेन.

पुढे पुढे आम्ही झूम मिटींग्स ना सुद्धा सरावलो, कार्यक्रमाची रूपरेषा तयार होऊ लागली, ‘वेध’ साठी पुण्याचे पळशीकर सर आणि कार्यकर्त्यांनी मिळून काही वैश्विक पातळीवर वेगळं काम करणाऱ्या पाहुण्यांना शोधून त्यांच्याशी प्राथमिक बोलणी केली होतीच, पण मग आता या सर्व बदलांची त्यांना माहिती देऊ केली, आणि त्यांना या माध्यमांतराचा भाग बनवून घेण्याचा प्रस्ताव मांडला आणि ते ही तयार झाले. झालं! मग पुढे या सर्वांसोबत ऑनलाईन मीटिंग्स घ्यायच्या, त्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं, त्यानुरूप  प्रश्नावली तयार करायची हे सर्व काम पुण्याच्या वेध कार्यकर्त्या डॉक्टर ज्योती शिरोडकर यांनी केलं. मुख्य निवेदन डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि सहनिवेदिका म्हणून ज्योती ताई, असं स्वरूप झालं. हे सत्र झूम वरून घेतलं जाणार आणि त्याचं रेकॉर्डिंग देखील केलं जाणार व त्या रेकॉर्डिंगचं संकलन (एडिटिंग) करून ते आवाहन च्या यूट्यूब माध्यमावर दर महिन्याच्या शेवटच्या शनिवारी संध्याकाळी ७ वाजता प्रसारित करण्यात येणार असं ठरवण्यात आलं.

त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे, तांत्रिक बाजू. यामध्ये काय काय येतं यावर विचार केला, तर बरीच मोठी यादी तयार झाली. त्यातले काही मुद्दे नक्कीच सांगेन… मुख्य म्हणजे ऑनलाईन संवाद साधायचा तर त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे इंटरनेट, वेब कॅमेरा असलेला लॅपटॉप किंवा डेस्कटॉप, एकमेकांचं व्यवस्थित ऐकू यावं यासाठी लागणारे हेडफोन्स आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे एकमेकांना नीट पाहता यावं यासाठी लागणारा लाईट. या सगळ्याची नीट व्यवस्था करणे आवश्यक असते. त्यात एक गोची अशी की इथे आमच्या हातात असलेली माध्यमं आम्ही एकवेळ हाताळू, पण समोर असलेल्या व्यक्तीला हे सगळं कसं सांगायचं ? त्यासाठी आमचा सचिन या सर्व पाहुण्यांसोबत होणाऱ्या मीटिंग्सना त्यांना या सर्व बाबींबद्दल माहिती सांगायचा, ती अशी की शक्यतो आपण आपल्या चेहऱ्यावर प्रकाश येईल अशा ठिकाणी, उदाहरणार्थ उजेड असेल, किंवा दिवस असेल तर खिडकी तत्सम ठिकाणी, किंवा जिथे चेहऱ्यावर लाईट मिळू शकतो अशा ठिकाणी बसून संवाद साधायचा, शक्यतो बाहेरून येणारे आवाज टाळता येतील अशा ठिकाणी ती व्यवस्था करावी जेणेकरून बाहेरच्या आवाजाचा त्रास होणार नाही. या, आणि अशा अनेक सूचना या मीटिंग्स मधून सचिन ने दिल्या. हा मुद्दा मार्गी लागला, आता आला इथला भाग.

यासंदर्भातील आलेला एक अनुभव नक्की  सांगेन…. आम्ही श्री पराडकर यांची मुलाखत घेण्यासाठी तयारी करत होतो. सकाळी ७.३० ची वेळ ठरली होती, पण आम्ही मीटिंग अर्धा तास अगोदर शेड्यूल करून ठेवली होती जेणेकरून त्यांना आम्हाला बेसिक इन्सट्रक्शन देता येतील. श्री समोर आल्या, त्यांनी आधीच्या मीटिंग मध्ये सांगितल्याप्रमाणे सगळ्या गोष्टी विचारात घेऊन त्यांची बसण्याची जागा निश्चित केली, पण त्यांच्याकडे असलेला लाईट त्यांच्या डोक्यावर होता. त्यामुळे चेहऱ्यावर आणि डोळ्यांखाली अंधार दिसत होता. ते त्यांच्या, आणि आमच्याही लक्षात आलं. त्यांनी थोडीफार लाईट ची व्यावस्था बदलून पहिली, एक टेबल लॅम्प त्यांना मिळाला, तो समोर ठेवला खरा, पण त्याने त्यांचा चेहरा आणखीनच भडक दिसू लागला. आम्ही त्यांना इथून त्या गोष्टी सांगत होतो, पण काही केल्या जमत नव्हतं. तितक्यात त्यांचे यजमान तिथे आले आणि त्यांनी एक कोरा पांढरा कागद समोर ठेवला, आणि लॅम्प मधून येणारा लाईट त्या कागदावर सोडला. त्याच्या रिफ्लेक्शन मुळे चेहरा स्पष्ट दिसू लागला आणि आम्ही इकडे सगळे आवाक झालो. खरंतर ती अगदी बेसिक गोष्ट होती, पण आम्हा कुणालाच लक्षात आली नाही, आणि त्यांनी क्षणात ते बदलून टाकलं. आम्ही इथे इतक्या व्यवस्था करून सुद्धा आमच्या पटकन ते लक्षात आलं नाही आणि आम्ही सगळे आ वासून ते पहात बसलो.

तसं पाहिलं तर इतर देशांच्या मानाने भारतात मिळणारा इंटरनेट स्पीड हा खूपच कमी आहे. त्यात कोरोनाचं संकट, अनेक गोष्टींवर असलेल्या मर्यादा, या सगळ्यांचा विचार करता त्यातल्या त्यात चांगला पर्याय कोणता हे बघताना आम्हाला सप्तसोपान परिसरात असलेला आमचा आवाहन चा स्टुडिओ हाच उत्तम पर्याय वाटला. तिथे असलेली यंत्र ही या सगळ्या गोष्टींसाठी पूरक होती, म्हणजे चांगला स्पीड असलेला इंटरनेट, चांगला कॅमेरा असलेला ‘आय मॅक’ (Apple) कंपनीचं मशीन, आणि शूटिंगसाठी घेऊन ठेवलेल्या लाईट्स, या सगळ्यांसाठी हा एका अर्थी दुग्धशर्करा योग म्हणावा लागेल. या सगळ्या गोष्टींना कसं हाताळायचं, हे समजून घेण्यासाठी देखील आम्ही खूप एक्सपेरीमेंट्स केल्या, अनेक क्लूप्त्या लढवल्या,म्हणजे ‘आय मॅक’ वरअसलेल्या कॅमेरामधून येणारा आउटपुट प्रत्येक वेळी बदलत होता, सतत त्याचे रंग बदलणे, चेहऱ्यावर अति लाईट पडणे, किंवा अगदीच कमी लाईट पडणे , त्यामुळे सतत लाईट्स ची जागा बदलत राहणे; आवाहन चा स्टुडिओ हा अगदी भडक पोपटी रंगाचा आहे ज्याचा उपयोग बरेचदा chroma या तंत्रासाठी होतो. पण यावेळी आम्हाला त्याचा त्रासच होत होता. मग त्यावर पर्याय म्हणून आम्ही एके दिवशी त्या भिंती झाकून टाकण्यासाठी पडदे लावले. मग बर्‍याच गोष्टी आमच्या कंट्रोल मध्ये आल्या. समोर बसलेल्या व्यक्तीने कोणत्या रंगाचे कपडे घातले तर चांगले दिसेल हे देखील महत्त्वाचं होतं, कारण त्या कपड्याच्या रंगाप्रमाणे लाईट सेट करावा लागणार होता. म्हणून मग आम्ही ४ जणांनी म्हणजे सचिन, मी, ऋषिकेश आणि ओंकार (हे दोघे आम्हाला मदत करण्यासाठी आले होते ) आलटून पालटून कॅमेरा समोर बसून पहिलं होतं. प्रत्येकाच्या कपड्यानुसार समोरचं चित्रं बदलत होतं. याची उपरती  होण्यासाठी आम्ही दोन दिवस घालवले आणि मग याची उकल झाल्यानंतर आम्हाला डॉक्टरांना अमुक रंगाचाच कुर्ता घाला किंवा जोडीला आणखी एक कुर्ता देखील आणा हे सांगावं लागलं. हे हास्यास्पद जरी वाटत असलं तरी त्याने खरंच फरक पडला.

माध्यम बदलताना खरा वेळ ते माध्यम समजून  घेण्यात जातो हे नक्की. इतरवेळी आपण जे हेडफोन वापरतो त्याला असलेल्या वायर मुळे बरेचदा मानेभोवती झालेले वेटोळे आपण पाहतो. ते टाळता यावे यासाठी सचिनने वायरलेस हेडफोन खास ग्लोबल वेधसाठी ऑनलाईन मागवून घेतले. त्याचा सुद्धा आम्हाला बराच फायदा झाला. आणि आय .पी. एच ची शिकवण  म्हणा किंवा परंपरा म्हणा, प्लॅन ए , प्लॅन बी , प्लॅन सी असे अनेक प्लॅनचे बॅकअप प्लॅन करण्याची सवय असल्याने आम्ही अनेक गोष्टींसाठी अनेक प्लॅन्स तयार केले. म्हणजे जर झूम रेकॉर्डिंग इंटरनेट मुळे कुठे खराब झालं तर त्याचं किमान डॉक्टरांपुरतं रेकॉर्डिंग असावं, म्हणून आम्ही कॉम्प्युटरच्या अगदी मागोमाग दोन वेगळे  कॅमेरा सेट करून ठेवले, ज्याचा खरंच उपयोग झाला देखील.

आता सत्र सुरु असताना त्याला लाईव्ह चा Flavour  सुद्धा यायला हवा, म्हणून मग मी मुख्य कॉम्प्युटर शेजारी एक लॅपटॉप घेऊन बसतो. त्यातून मी मीटिंग होस्ट करतो, आणि ऑपरेट सुद्धा. (आता यात काय नवल?) तर नवल हे की संवाद सुरु असताना जेव्हा एखादी व्यक्ती बोलत असेल, तेव्हा स्क्रीनवर तीच व्यक्ती दिसण्यासाठी ‘स्पॉट लाईट’ सारख्या गोष्टीचा वापर करणे, ज्यामुळे अगदी समोरासमोर बसून बोलत असल्याचा भास तयार होतो. त्यामुळे मला देखील ऑनलाईन एडिटिंग चा अनुभव घेता आला. त्यात किंचित अडचणी येतात पण त्यासाठी बॅकअप चा बॅकअप प्लॅन तयारच असतो!

नुकतंच आम्ही डॉक्टर आनंद नाडकर्णी यांचं एक यूट्यूब लाईव्ह सत्र घेतलं. त्या दिवसाची गम्मत म्हणजे १५ ऑगस्ट, सुटीचा दिवस, आणि आम्ही दोघे स्टुडिओ मध्ये दुसऱ्या दिवशीचा सेटअप करण्यासाठी हजर. संपूर्ण सेटअप करायला अर्धा दिवस गेला, काही अडचण होऊ नये म्हणून आम्ही सगळं सेट अप् टेस्ट करण्यासाठी सलग दोन तास तसंच सुरु ठेऊन इतर कामं करत बसलो. एक लक्षात आलं होतं की या सगळ्या लाईट्स मुळे तिथे उष्णता तयार होत होती, जी AC  मुळे बऱ्याच प्रमाणात कंट्रोल करता येत होती, आणि त्याआधी वेध ची दोन सत्र पार पडली होती त्यामुळे या सगळ्या गोष्टींचा अंदाज होता. पहिल्या दोन्ही सत्रांच्या वेळी खोलीत अधिकच गारवा वाढला होता हे जाणवलं होतं. त्यामुळे डॉक्टरांनी या वेळी जाड कापडाचा कुर्ता घालून येण्याचं ठरवलं होतं, त्याप्रमाणे ते आले देखील. आम्ही तासभर आधी जाऊन सगळी व्यवस्था करून घेतली आणि अखेरीस AC लावला पण तो काही केल्या सुरूच होईना, म्हणून थोडे फार भारतीय पद्धतीने AC सुरु करण्याचे प्रयत्न केले, त्याचं कुठे बटण सापडतं का ज्यामुळे तो सुरु होईल हे बघण्यासाठी मी खुर्चीवर चढून ते चाचपडत होतो इतक्यात दाराशी डॉक्टर हजर, त्यांनी ते पाहिलं आणि काय झालं त्याबद्दल विचारलं. जेव्हा त्यांना सांगितलं की काही केल्या AC चालू होत नाही, तेव्हा काही सेकंद तेही थांबले आणि मग म्हणाले, “दुसरा पर्याय काय?” दुसरा पर्याय हा, की दार सताड उघडं ठेऊन खोलीतला छोटा, पण प्रचंड आवाज करणारा पंखा सुरु ठेवायचा. “मग तसं करूयात”, असं म्हणून ते आत आले. आम्ही दार उघडं ठेवलं, आणि पंखा कमीत कमी आवाज करेल अशा पद्धतीने सुरु केला. सत्रं सुरु झालं, पण आम्हाला हवा लागत असूनही आम्ही घामाने चिंब  झालो होतो. त्यात दोन स्क्रीन्स असल्यामुळे त्या लाईव्ह सत्रामध्ये लोक विचारत असलेल्या प्रश्नाची उत्तरं डॉक्टर देत होते आणि आम्ही त्यांना दुसऱ्या स्क्रीन वरून ते प्रश्न पाहून एका कागदावर लिहून त्यांच्याकडे  देत होतो. हा आमच्यासाठी खरंतर द्राविडी प्राणायाम होता. पण त्या सगळ्यात डॉक्टरांनी घातलेल्या कुर्त्याने आणखी भर घातली होती, त्यांनाही हळू- हळू घाम येऊ लागला होता. पण त्यांनी सवयीने आणि अगदी शिताफीने तो पुसून सत्रं पुढे सुरु ठेवलं आणि पार नेलं.

आम्हा सगळ्यांना एक बरं वाटलं होत की हे सगळं वेधच्या सत्रादरम्यान झालं नाही ते बरं झालं! आणि मग आम्ही सगळ्यांनी, डॉक्टरांनी आमच्यासाठी आणलेल्या खास खमण ढोकळ्यावर ताव मारला.

अशा सगळ्या गमती जमती करत आम्ही हा माध्यम बदलाचा प्रवास करत आहोत, नुकतीच २९ तारखेला प्रदर्शित होणारी श्री पराडकर यांची मुलाखत आता पूर्णत्वास आली आहे. त्याचं संकलन पार पडलं आहे. आम्ही जो अनुभव तिथे प्रत्यक्ष घेतला, तसाच अनुभव तुम्हाला मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न केले आहेत. तेव्हा तुम्हाला हे पहिलं सत्रं नक्कीच आवडेल.

तुम्ही ही सगळी सत्रं पाहण्यासाठी आवाहन च्या YouTube चॅनल ला नक्की Subscribe  कराल आणि या सगळ्या सत्रांचा आनंद घ्याल अशी आशा व्यक्त करतो.

शैलेश मेदगे,
आवाहन कार्यकर्ता

चॅनेल लिंक सोबत जोडत आहे – https://youtube.com/c/AVAHANIPH

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: