अनुभवू सिध्दार्थ

मोठ्या मायेने संगोपन केलेल्या छोट्याशा रोपट्यावर एखादे सुंदर फुल उमलले की जो आनंद होतो, तो आनंद आजच्या वेध कट्ट्यात सहभागी असलेल्या सर्वांना झाला असणार. “गुणवंत की गुणवान” या कट्ट्यात सहभागी झालेल्या बदलापूर वेधच्या आभाने आज सिध्दार्थ सावंतची मुलाखत घेतली. एखाद्या रंगत जाणाऱ्या मैफिलीसारखी ही मुलाखत उत्तरोत्तर रंगत गेली. अवघ्या सतरा-अठरा वर्षांच्या या दोन गुणी मुलांनी झुमवरील १०० आणि फेसबुकवरील शेकडो जणांना मंत्रमुग्ध केले. आयुष्यातील अनेक पैलू हे दोघेजण सहजपणे उलगडून दाखवित होते. सिद्धार्थ सावंत ‘दिव्यांग’ आहे, तो पाहू शकत नाही. मात्र चर्मचक्षुंपेक्षा स्वतंत्र असलेली अंतर्दृष्टी त्याच्यापाशी मुबलक आहे. “पाहता न येणं” ही जगण्यातील एक गोष्ट आहे, तिचा विनाअट स्विकार करुन पुढे जायचं. आपल्याला जे करावसं वाटतं ते करताना एखाद्या नसलेल्या गोष्टीसाठी अडून न राहता ती ओलांडून किंवा तिला वळसा घालून पुढे जायचं हे सामंजस्य सिध्दार्थने त्याच्या अंतर्दृष्टीतून विकसित केलं आहे. पालक, प्रशिक्षक आणि गुरुंच्या भक्कम पाठबळावर सिध्दार्थची आगेकुच आनंदाने सुरु आहे.

आभाने मुलाखतीसाठी फोन केला तेव्हा “माझी मुलाखत कशाला? मी असं काय मोठंसं केलयं?” असे उद्गार काढणं काय, किंवा राष्ट्रपतींच्या हस्ते Best creative child with disability हा राष्ट्रीय पुरस्कार स्विकारताना “हे आपल्याला प्राप्‍त होतं आहे या पाठीमागे आईवडील आणि गुरुजनांचे पाठबळ आहे” हे विचार मनात येणं काय, एकीकडे प्रगल्भता आणि दुसरीकडे कृतज्ञता या दोन्ही भावनांचा मनोज्ञ संगम सिध्दार्थच्या व्यक्त होण्यातून अनुभवता आला. एखादे पारितोषिक मिळाल्यावर “काहीतरी काय, हे मला कसं काय मिळालं असेल” या सिध्दार्थच्या भावनेत नम्रता दिसतेच, परंतु, “यापेक्षा अत्यंत भव्यदिव्य काहीतरी मी घडविन” हा विश्वासही दिसतो. कलाकाराचे असमाधान त्याच्या उत्कर्षाचे इंधन असते. सिध्दार्थ असमाधानी आहे, मात्र हे असमाधान उसळत्या इर्षांचे नाही तर मनाच्या गाभाऱ्यात उजळलेल्या अंतर्ज्योतीप्रमाणे आहे.

तत्कालीन राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सिद्धार्थ सावंत याचा ‘बेस्ट क्रिएटिव चाइल्ड विथ डिसएबिलिटी’ या राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

लहानपणापासून ऐकलेल्या गाण्यांतून सिध्दार्थची संगीताची जाण विकसित होत गेली आणि तबला या माध्यमातून त्याच्या जाणीवेला कृतीची पहिली जोड मिळाली. सिंथेसायझर, ऑक्टॅपॅड, ड्रम असा हा प्रवास पियानोपाशी सुफळ झाला. वाद्ये वाजविताना सिध्दार्थला अनिर्वचनीय आनंदाची प्राप्ती होते. सुरांच्या सुरेल वाटांनी तो विहार करीत राहतो, त्यातील सौंदर्याची अनुभूती पूर्णांशाने घेतो. सुरांची भाषा त्याला कळते. सुर त्याच्याशी बोलतात, तसा तो ही सुरांशी बोलतो, सुरांशी खेळतो. मोझार्ट आणि ए. आर. रेहमान हे त्याचे आवडते संगीतकार आहेत, आणि त्याला स्वत:लाही संगीतकार व्हायचे आहे. कदाचित या उर्मीतूनच विविध वाद्ये हाताळून पाहण्याची इच्छा त्याला होत असेल. हातात वाद्ये असताना त्यातून उमटणारे सुर एरवीही त्याच्या अंतर्कर्णेंद्रियांत बरसत असणार. विविध वाद्यांच्या संयोगातून निर्माण होणाऱ्या मेलडी आज तो एकटाच ऐकतो, उद्या त्या आपल्यालाही नक्की ऐकायला मिळतील असा विश्वास नक्की वाटतो.

सिद्धार्थ हा उत्तम तबला, ड्रम्स, सिन्थेसायजझर व ऑक्टॅपॅड वाजवतो.

पोहणे, सायकलिंग आणि ट्रेकिंग या गोष्टी फिटनेससाठी सुरु केल्या असे तो म्हणतो खरा, मात्र त्यातही तो तितक्याच तन्मयतेने रमतो. वादनातील वैविध्य असो वा इतर कृतींमधील असो, सिध्दार्थच्या अनेकाग्रतेच्या प्रत्येक पैलूत त्याने साध्य केलेली एकाग्रता त्याचे बोलणे ऐकताना जाणवत राहते. आणि अशी एकाग्रता प्राप्त करण्यासाठी आवश्यक समग्रता त्याच्यापाशी आहे हे जाणवत राहते.

राष्ट्रीय पॅरालिम्पिक स्पर्धा, जयपूर

तो डोंबिवली ते सी. एस. टी. हा लोकल प्रवास एकटा करुन झेवियर्स कॉलेजला गेली दोन वर्षे जात होता, किंवा दहावीला त्याला ९५.४० प्रतिशत तर बारावीमध्ये (कला) त्याला ७४ प्रतिशत गुण मिळाले आहेत या गोष्टी केवळ लेखाच्या पूर्णतेसाठी लिहायच्या. दिव्यांगतेवर मात करीत यशाला गवसणी घालणे ही कौतुकाची गोष्ट नक्कीच आहे, मात्र ती सिध्दार्थच्या व्यक्तीमत्त्वाला व्यक्त करण्यासाठी अपुरी वाटते. तो त्या पलिकडे आहे. तो जाणीवेच्या ज्या उच्चपातळीवर वावरत असतो, तिथे ज्ञानेंद्रियांनी व्यक्त होणाऱ्या संवेदना थिट्या पडत असतील असे वाटते.

सिध्दार्थच्या आजवरच्या जडणघडणीत त्याच्या घरच्यांचा, गुरुंचा, प्रशिक्षकांचा आणि मित्रांचा खूप मोठा वाटा आहे. रोजच्या जीवनातील अनेक गोष्टींत सिध्दार्थला मदत करण्यात सगळ्यांचा सहभाग मोठा आहे. सिध्दार्थबरोबर अभ्यास करणारी त्याची आई, त्याला सायकलींगसाठी, पोहोण्यासाठी घेऊन जाणारे वडील, संगीतातील त्याचे गुरु, शाळा, कॉलेजात मदत करणारे मित्र, प्रवासात मदत करणारे ज्ञात, अज्ञात सहकारी या सर्वांचा सिध्दार्थच्या जडणघडणीत वाटा आहे, मात्र हा सहभाग भाग्याचा वाटावा असे सिध्दार्थचे वागणे आहे. परीक्षेत रायटर म्हणून मदत करणाऱ्या आभाशी हा माणूस गप्पा मारू शकतो. परीक्षेचाच काय, कोणत्याच गोष्टीचा ताण याला येत नसावा. प्रत्येक आव्हानाला सामोरे जाताना आपल्या नियत्रंणातील घटक कोणते, नियंत्रणाबाहेरील उनाड गोष्टी कोणत्या ते समजून घेऊन त्यांचा योग्य समन्वय साधून त्यांना कामाला जुंपायचे आणि आपण त्यातली गंमत अनुभवत रहायची हे त्याला साध्य झाले असावे.

“बालश्री” पुरस्काराने सन्मानित सिद्धार्थ सावंत

आभाने अत्यंत तन्मयतेने मुलाखत घेतली. “घेतली” या शब्दांतील कृत्रीमता त्यात अजिबात नव्हती. मुलाखत साकार झाली असे म्हणणे अधिक संयुक्तिक ठरेल. प्रश्न विचारण्याहून अधिक महत्वाचे उत्तरे ऐकणे असते हे शहाणपण आभाला गवसले आहे. मुलाखत उमलत, उमलत फुलली पाहिजे, त्यासाठी मुलाखतीचा ताल व तोल सांभाळता आला पाहिजे. आभाने ते उत्तम जपले.

आभा व सिध्दार्थ दोघेही “बहुरंगी बहर” परिवाराचे सदस्य आहेत. आय. पी. एच. आणि वयम मासिक यांच्या संयुक्त विद्यमाने बहुरंगी बहर हा उपक्रम महाराष्ट्रातील गुणी मुलांना लाभलेला स्वविकासाचा परीस आहे. डॉ. आनंद नाडकर्णी, शुभदाताई चौकर आणि दोन्ही संस्थांच्या टीम या परिवारातील मुलांना घडवित आहेत. सिध्दार्थच्या वडीलांनी आजच्या मुलाखतीच्या अखेरीस हे मोठ्या सुंदर रितीने व्यक्त केले.

“शरीराच्या मशागतीइतकीच, किंबहुना त्याहून कांकणभर महत्वाची मनाची मशागत आहे” या विचाराची मशाल घेऊन तीस वर्षांपूर्वी डॉ. आनंद नाडकर्णींचा प्रवास सुरु झाला होता. लोक जोडले जात राहिले, मनोविकासाचा मार्ग प्रशस्त होत गेला. आभा, सिध्दार्थ सारखी शेकडो, हजारो मुलं हा मार्ग अधिक सुंदर करतील.

-मंदार परांजपे,
वेध कार्यकर्ता

आजच्या मुलाखतीची लिंक https://www.facebook.com/100002001879504/videos/3212254358851262/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: