ग्लोबल वेधचा वेध – नीलाताई पंचपोर यांच्या मुलाखतीचा प्रफुल्लित वेध कट्टा

आज रविवार, दिनांक ९ ऑगस्ट रोजी सायंकाळी ५.०० वाजता वेध कट्ट्यावर प्रसारित झालेली नीला पंचपोर यांची मुलाखत सर्वार्थाने विशेष होती. ९९ वा वेध “ग्लोबल” व्यासपीठावर सादर होणार हे ठरल्यानंतर “फिजिकल” वेध ते “ग्लोबल” वेध या स्थित्यंतरामधील “स्टेपिंग स्टोन” म्हणून आजचे सत्र आयोजित केले गेले होते. ऑगस्ट २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीत प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या शनिवारी सायंकाळी ग्लोबल वेधची सत्रे ९९ वा वेध म्हणून साजरी होणार आहेत. भारताशी जन्माने वा जगण्यातून ज्यांचे ऋणानुबंध जुळलेले आहेत असे ग्लोबल पाहुणे या वेधमध्ये येणार आहेत. एका अर्थाने ९९ वा वेध म्हणजे भारताच्या समृध्द परंपरेच्या जगात उमटलेल्या सुंदर प्रतिबिंबाचा आरसा असणार आहे. पाहुणे परदेशात, मुख्य संवादक डॉ. नाडकर्णी ठाण्यात तर सहसंवादक डॉ. ज्योती शिरोडकर पुण्यात असणार आहेत. पाहुणे, संवादक आणि प्रेक्षक या तिघांसाठी हा अनुभव वेगळाच असणार आहे. याची सवय म्हणा, सराव म्हणा, सर्वांना व्हावा म्हणून आजचे सत्र घेतले गेले.

नीलाताईंच्या मुलाखतीने अशी काही उंची गाठली, की – आपण एखाद्या ठिकाणी जाण्यासाठी प्रवासाला निघावे, वाटेत चहासाठी थांबावे, आणि ते ठिकाणच इतके आवडावे की गंतव्यस्थानाचा क्षणभर विसर पडावा असे काहीसे आजचे सेशन पाहताना वाटले. ही मुलाखत म्हणजे परिपूर्ण “वेध सेशन” होते. कुठेही असे वाटले नाही की समोरचे व्‍यासपीठ आभासी आहे, मध्ये कधीही वाटले नाही, की वेबवर इतरत्र फेरफटका मारुन येऊया, किंवा असेही वाटले नाही, की नंतर पाहू, युट्युबवर राहणारच आहे की मुलाखत. आत्ताच आणि जमलेल्या सर्वांसोबतच ही मुलाखत पहावी अशी प्रेरणा निर्माण झाली आणि ती भावना कायम राहिली.

नीलाताई या व्यवसायाने कॉस्ट अकाऊंटंट. स्वत:चा व्यवसाय संभाळताना, त्यांच्या मनात गच्चीवर बाग फुलविण्याचे स्वप्न रुजले आणि दहा वर्षांत हे स्वप्न त्यांनी वाढविले, फुलविले. तोपर्यंत गच्चीवर, जिथे “नको असलेल्या गोष्टी” डंप होत असत, तिथे हे हवेहवेसे जग त्यांनी निर्माण केले. ही प्रक्रिया गच्चीत प्रत्यक्ष साकार होत गेली, तशी त्यांच्या मनातही या प्रक्रियेची प्रतिकृती साकार होत गेली असणार, कारण, बाग जशी गच्चीवर फुलली, तशीच ती त्यांच्या मनातही फुलली. बागकामाचा वेळ त्यांचा क्वालिटी टाईम बनला, आयुष्यातील “मौल्यवान ठेवा” बनला. छंदात सातत्य ठेवले की त्याचा ध्यास बनतो. सातत्यपूर्ण ध्यासातूनच शाश्वत आनंदाचा मार्ग सापडतो.

नीलाताईंच्या शाश्वत छंदाचा मूळ आधार आहे – “मसाला माती”! घरातील ओला कचरा आणि आसमंतातील पालापाचोळा यांचे कंपोस्टिंग करुन तयार झालेली पौष्टिक “मसाला माती”. ही माती मिळाली की बोर्नव्हिटाच्या डब्यात शोभेचे झाड वाढू शकते, आणि भाजीच्या ट्रेमध्ये चक्क भाजी उगवू लागते. कमी मातीत झाडे वाढत असल्याने बागेचा “वेटलॉस” होतो, वॉटरप्रुफिंग पक्के असले म्हणजे झाले. अवघ्या साडेचारशे चौरसफुटात नीलाताईंची ही प्रतिसृष्टी उभी आहे. आणि या परिसंस्‍थेचे परिचालन पंचपोर परिवार करीत असला तरी इथे पक्षी आहेत, फुलपाखरे आहेत, कीटकही आहेत. झाडावर आलेले पपई पक्ष्यांनी खाऊन टाकले तरी नीलाताईंना त्याचे काही वाटत नाही. उलट आपण पक्ष्यांना खाऊ घातले याचे सार्थक त्यांना वाटते. ही बाग त्यांच्या व्यापक वात्सल्याचे निधान आहे. एरवी सायंकाळी आपल्या जीवनक्रिया आवरत्या घेऊन विश्रांत होणारी रोपटी नीलाताईंची वाट पहात जागी राहतात. संध्याकाळी लवकर जेऊन साडेसात आठला बागेत आलेल्या नीलाताईंबरोबर पुढचे दोन तास त्यांची ही रोपटी आनंदाने झुलतात.

नीलाताईंच्या तोंडून हे सगळे ऐकताना कल्पनारम्य अशा एखाद्या जगात आपण गेलो आहोत की काय असे वाटत राहिले. कल्पना करा, पुण्यातील धकाधकीचे जीवन दिवसभर जगून, संध्याकाळी नीलाताई या साडेचारशे चौरस फुटांच्या जगात पाऊल टाकीत असतील तेव्हा कसे स्थित्यंतर त्या अनुभवत असतील. आजीच्या गोष्टीत ऐकलेले जादूचे जग याहून काही निराळे असते का?

अर्थात या जगाचे परिचालनही त्या आणि त्यांचे कुटुंब करीत असल्याने या रुपेरी, स्वप्नमय जगाच्या मुळाशी करडी शिस्त आहे, हे ही तितकेच खरे. झाडांचे संगोपन, त्यांची देखभाल, नवी झाडे लावणे, झाडांना पाणी घालणे, मसाला माती तयार करणे, ती वाहून नेणे कितीतरी कामे. शारिरीक, मानसिक आणि आर्थिक भारही यात समाविष्ट आहेच. आणि सर्वात महत्वाचे त्यामागील सातत्य. शक्यतो बागेला सोडून लांब न जाण्याची घालून घेतलेली मर्यादाही आहे. अर्थात नीलाताईंच्या सासूबाई आणि त्यांच्याकडे काम करणाऱ्या मावशींच्या मदतीने हे शक्य होते.

बागेत तयार झालेल्या भाज्यांना फोडणी देताना त्यांना कृतकृत्यता अनुभवाला येते. त्यांची बाग त्यांचा रोजचा स्वैपाकही सुगंधी करते. जास्तीची सेंद्रिय, विषमुक्त भाजी स्नेही, आप्तजनांना वाटण्यातील आनंद त्या अनुभवतातच, वर या भाजीत उतरलेले त्यांचे वात्सल्य भाजी खाणाऱ्यांच्या मनांतही उतरते. नीलाताई करतात तर आपण का नाही हे करु शकत असे म्हणत दहातील दोन घरांत हे गच्चीतील बागेचे स्वप्न रुजतेच रुजते. मग या स्वप्नांत स्नेही, आप्तजनांना सहभागी करण्यासाठी नीलाताई रविवारी नि:शुल्क वर्ग घेतात, त्याच साडेचारशे चौरसफुटातील स्वप्ननगरीत. फेसबुक आणि व्हॉटस्ॲपवरील पाच गट यांद्वारेही या स्वप्नांचे परागीकरण होत असते.

नीलाताईंचा मुलगा बारावी झाला तेव्हा त्यांना आता आपल्याला अजून एक वेळेचा कप्पा मिळाला याची जाणीव झाली. आपण पळून पहावे असे त्यांच्या मनाने घेतले. अशा “पलायनवादी” भूमिकेचे घरात थोडे काळजीयुक्त थंडे स्वागत झाले तरी नीलाताईंनी धीराने घेतले. फार कुणी पाहू नये यासाठी सकाळी लवकर उठून इमारतीसमोरील रस्त्यावर त्या पळून पाहू लागल्या. नीलाताईंच्या या नवीन स्वप्नाची गोष्ट ऐकताना “ले पंगा” मधील जया निगम आणि “सांड की आँख” मधील चंद्रो आणि प्रकाशी तोमर या व्यक्तीरेखा डोळ्यासमोर येत होत्या. चाळीशीत पळायला सुरुवात करून ४ तास ३७ मिनीटे ९ सेकंदात फुल मॅरेथॉन (४२.२ किमी) अंतर पळणे ही गोष्ट अत्यंत भारी आहे. त्यातही मिल्खासिंग यांच्या हातून पुरस्कार मिळणे हे स्वप्नातील स्वप्नाची पूर्तता.

त्यामुळे सध्या नीलाताईंचा दिवस सकाळी पळण्यापासून सुरु होतो, आणि सायंकाळी बागेत मावळतो. सकाळी पळताना सायंकाळच्या बागेची स्वप्ने, आणि बागेत काम करताना सकाळच्या पळण्याचे वेध. सकाळचा वेग आणि सायंकाळची मन:शांती यांच्या लयीत त्यांचा दिवस आनंदात तोलला जात असतो. जिवीका आणि उपजिवीका यांचे किंवा आयुष्यातील श्रेयस आणि प्रेयसाचे इतके समृध्द संतुलन ते ही पुण्यासारख्या महानगरात कुणी साधू शकतो यावर विश्वास ठेवणे कठीण असले तरी नीलाताईंना ऐकल्यावर तो ठेवावा लागतो. आणि यात कोणतेही रॉकेट सायन्स नाही, अगदी सोप्या गोष्टी सातत्याने करायच्या. कशा ते सांगायला नीलाताई आहेतच. मनाची तयारी हवी आणि सातत्याचा ध्यास हवा, इतकेच.

तर असे हे आजचे “प्री-ग्लोबल वेधचे” सत्र. डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकरांनी साकार केलेले. त्रिस्थळी घेतली गेलेली मुलाखत, तिचे रेकॉर्डिंग, एडिटिंग आणि प्रिमियरचे प्रसारण या गोष्टी “आवाहन आय. पी. एच. टीम”ने लीलया पेलल्या. सर्व काही सेट आहे. आता प्रतिक्षा आहे, पहिल्या ग्लोबल वेधची. शनिवार, २९ ऑगस्ट रोजी तो साजरा होणार आहे. त्याविषयीची माहिती प्रसारित होत राहिलच. वेधचे सेशन होण्यापूर्वी “अनोळखी” असणारे पाहुणे सेशननंतर “अविस्मरणीय” बनतात याचा अनुभव आपल्यापैकी अनेकांनी घेतला आहे. असे अविस्मरणीय पाहुणे, मनोविकासमहर्षी डॉ. आनंद नाडकर्णी आणि सुजन श्रोतेजन यांच्या त्रिवेणी संगमातून वेधचे सत्र साकार होत असते. ग्लोबल वेधच्या व्यासपीठावर कोणत्याही भौगोलिक मर्यादेशिवाय सर्व आप्तजनांना, स्नेहीजनांना सहभागी करून घेणे सर्व सुजन श्रोत्यांना सहज शक्य होणार आहे. आपण फक्त मनोविकासाच्या या सोहोळ्याचे परागीकरण करायचे आहे. वेधचे बीज जिथे पोहोचेल तिथे मानसिक आरोग्याची बाग फुलायला सुरुवात होते हे आपण जाणतोच.
Happy Gardening!

-मंदार परांजपे,
ग्लोबल वेध कार्यकर्ता

काही उपयुक्त दुवे:

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: