झरीचे भगीरथ – कांतराव देशमुख झरीकर

रविवार, १९ जुलै २०२०. आज मी चक्क परभणीजवळच्या झरी गावात जाऊन आलो. चांगलं अठरा-वीस हजाराची लोकसंख्या असलेलं मोठं कृषकनगर आहे हो. प्रत्यक्ष नाही गेलो, तिथल्या कांताराव देशमुखांना ऑनलाईन वेध कट्ट्यावर भेटलो. त्यांच्या बोलण्यातून झरी गावाचं आणि त्या प्रदेशातील इतर अनेक गावांचं जे दर्शन घडलं ते मोठं मनोहारी आहे, शेअर केलंच पाहिजे असं.

कांतराव साधारण पासष्टीचे असतील. मात्र त्यांचा पोशाख गेल्या शतकाच्या उत्तरार्धातील कोकणातील आजोबांसारखा. वागणं, बोलणं खानदानी कृषकसंस्कृतीतील. कोकण पोशाखाच्या बाबतीत, बोलण्याचालण्यात झकपक झालं ते मुंबईच्या सान्निध्यातून. नव्या तंत्रज्ञानाचा अंगिकार केला तरी परभणी अजून परंपरेचे जुनेपण टिकवून आहे, हे किती छान आहे.

कांतरावांकडे झरीतील गेल्या चाळीस वर्षांतील पर्जन्यमानाचा डेटा आहे. हे सातत्य, ही निष्ठा त्यांच्या संपूर्ण व्यक्तीमत्वाचे सार आहे, असे म्हटले तर वावगे होणार नाही. महाविद्यालयीन शिक्षण अर्धवट सोडून घरची शेती सांभाळण्यासाठी कांतराव झरीला परत आले. आधुनिक जगातील ज्ञानाची ओळख त्यांना झाली आणि त्यांनी ती स्वत:साठी आणि समाजासाठी पुरेपुर वापरली. कापूस आणि सोयाबीन ही पिके घेणारा हा कोरडवाहू पट्टा. इथे फळबाग लावण्याचे स्वप्न बघणे हीच अचाट गोष्ट. कांतरावांनी ती केली. खूप तरुण वयात ते गावाचे सरपंचही झाले.

काकांच्या आयुष्याचा संपूर्ण पट उलगडण्यासाठी त्यांनी आत्मचरित्रच लिहायला हवे. त्यांच्या आजच्या मुलाखतीतून समोर आलेले पैलूच इथे मांडता येतील. तेव्हा कट टू २०१५. झरी गावात चारशे फुटावरही बोअरला पाणी लागत नाही. काकांना माहिती आहे की आठशे, नऊशे मिमी पाऊस पडतोय इथे, देव तर द्यायलायं, आपलीच झोळी ते दान घेऊ शकत नाही आहे. काका गावात फिरले, नऊ नाले होते गावात, लांबी मोजली तर २९ किमी भरली. नाले गाळाने भरले आहेत, त्यामुळे पाणी पळू लागलं आहे हे काकांच्या लक्षात आलं.

त्याच वेळी “जलयुक्त शिवार” योजना महाराष्ट्रात सुरु झाली होती. काकांनी प्रयोग करुन पहायचं ठरविलं. गावातील सर्वात मोठा नाला – लेंडी नाला दोन ठिकाणी प्रत्येकी ३०० मीटर खोदला, त्याचं रुंदीकरण, खोलीकरण केलं, त्याचा उत्तम परिणाम पावसाळ्यात दिसून आला. “पळणारं पाणी चालवा, चालणारं थांबवा, थांबलेलं जिरवा” हा मंत्र काकांना गवसला. नाल्यातील खणून बाहेर काढलेला गाळ शेतात टाकायचा, तो फार सुपिक असतो हे ज्ञान काकांना होतं. एक इंच सुपिक जमीन नैसर्गिकरित्या तयार व्हायला हजार वर्षे लागतात, हे सूत्र त्यांनी आधुनिक जगातून शिकलं असावं. आधी स्वत: केलं आणि त्याचे फायदे बाकीच्यांना दाखविले. लोक आपणहून खणून काढलेला गाळ शेतात स्वखर्चाने नेऊ लागले.

नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी “नाम फाऊंडेशन” या नावाने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबांना मदत करायला सुरुवात केली होती. जलयुक्त शिवाराच्या कामात नाम फाऊंडेशन आपसूकच जोडले गेले. काकांचा संपर्क नाम फाऊंडेशनशी आला आणि एक भाग्यशाली सहकार्य सुरु झाले.

सुमारे नऊ किमी लांबीच्या नाल्याचे रुंदीकरण, खोलीकरण केले, गावकरी गाळ, मुरुम घेऊन जाऊ लागले, आणि एक नवे शासकिय लचांड समोर आले. मुरुम हे गौण खनिज आहे. त्यांची विनापरवानगी, विनारॉयल्टी वाहतुक केली म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी मुरुम वाहून नेणारी वाहने जप्त केली. नाल्याच्या रुंदीकरणाचे, खोलीकरणाचे काम ठप्प झाले. नंतर जे घडले ते अकल्पनीय होते. तत्कालिन सहकार सचिवांना काकांचे काम माहित होते. त्यांनी चक्रे फिरविली आणि जलयुक्त शिवारातील गाळ वाहून न्यायचा हक्क शेतकऱ्यांना तर मिळालाच, वर त्यासाठी डिझेलचे पैसेही मिळू लागले. शासन आणि प्रशासन चांगल्या कामामागे विधायकरित्या उभे राहू शकते हा सुखद अनुभव यानिमित्ताने आला.

चारशे फुटावर पाणी लागत नव्हते ते दहा फुटावर लागू लागले हा जलयुक्त शिवाराचा चमत्कार होता. शासनाची योजना आणि शेतकऱ्यांची इच्छाशक्ती यांचा समसमा संयोग आणि त्याला नाम फाऊंडेशनसारख्या संस्थेचा सहयोग अशा त्रिवेणी संगमातून हे घडले.

झरीत आणि इतर सर्वच गावात स्मशानभूमी अत्यंत प्रतिकुल जागेत असे, अनेकदा तिथे अस्वच्छतेचे साम्राज्यही असे. गावात अशा अनेक स्मशानभूमी असत, आणि त्यातही राजकारण चाले. जीवनाकडे सौंदर्यपूर्ण दृष्टीने पाहणाऱ्या काकांना मानवी जीवनाची अशी कुरुप अखेर पाहवत नसे. “आधी केले मग सांगीतले” या उक्तीप्रमाणे काकांनी “स्व. इंदिराबाई देशमुख वैंकुठधाम” या नावाने स्वच्छ, सुंदर स्मशानभूमी झरीत उभारली, आणि नंतर या कार्याला चळवळीचे स्वरुप येऊन अनेक गावांनी झरीचे अनुकरण केले.

याच अनुषंगाने नेत्रदान, देहदानाचे महत्व काकांच्या लक्षात आले. काकांच्या स्वभावाचे वैशिष्ट्य असावे की एकदा मनात आले की त्यांना ती गोष्ट केल्याशिवाय चैन पडत नसावे. आणि प्रत्येक गोष्ट आधी स्वत: करायची, त्याचे महत्व दाखवून द्यायचे, आणि नंतर इतरांना ती करण्यासाठी उद्युक्त करायचे अशी त्यांची कार्यपध्दती असली पाहिजे. त्यांच्या प्रेरणेतून सुमारे ५० जणांनी देहदान, अवयवदान केले आहे. वैज्ञानिक दृष्टीकोन बालपणापासून अंगी बाणलेल्या सुशिक्षित माणसालाही देहदान, अवयवदान अवघड वाटू शकते, ते काका परभणीसारख्या परंपराप्रिय कृषक भागात घडवून आणत आहेत.

मोतीबिंदूमुळे येणारे अंधत्व आणि न परवडणारी शस्त्रक्रिया या गोष्टी लक्षात घेऊन कांतराव काकांनी “कै. स्वातंत्र्यसैनिक पंडितराव देशमुख व्हिजन सेंटर” या नावाने एक सेवाकेंद्र उभारुन मोतिबिंदूची नि:शुल्क शस्त्रक्रिया करण्याची सोय उपलब्ध करुन दिली.

विधवा स्त्रियांना समाजात उपेक्षेची वागणुक मिळते, यासाठी काकांनी विधवांची भाऊबीज सुरु केली. त्यांना संक्रांतीला वाणे द्यायला सुरुवात केली. भाऊबीजेसाठी ओवाळते वेळी “चाळीस वर्षांनी ओवाळणीचे ताट हातात धरते आहे” हे सांगताना एका स्त्रीला अश्रु आवरले नाहीत. परंपरांमधील सौंदर्य टिकवून ठेऊन त्यातील कुरुपता हलक्या हातांनी दूर करण्याचे काकांचे कौशल्य मनोहारी आहे.

दिव्यांगांचे विवाह हे असेच एक उदाहरण. एक अंध व्यक्ती काकांना आपले दु:ख सांगते काय, आणि काकांच्या डोक्यात चक्रे सुरु होतात काय. “आम्हाला कुणी कुठे नेत नाहीत, पाहुण्यांकडे जावे असे आम्हालाही वाटते, आम्हालाही आनंद हवे असतात, आम्ही असे झालो यात आमचा काय दोष” असे दिव्यांगांचे प्रश्न काकांना अस्वस्थ करु लागले. काकांची अस्वस्थता सृजनशील असते. ते उगा कुढत बसत नाहीत, दिव्यांगांचे सामुहिक विवाह लावून ते मोकळे होतात.

एवढे सारे करुनही काका जगण्याशी कृतज्ञ आहेत. “प्रफुल्ल होवोनी सुपुष्प ठेले” हे कवितेतील शब्द पुलंनी नानासाहेब गोरे यांच्यासाठी वापरले आहेत. प्रसन्न, शांत, विचारांची खोली असणारे देखणे व्यक्तीमत्व याअर्थी कांतराव काकांसाठीही हे शब्द चपखल लागू होतात. कांतराव काका खरे “समाजवादी”ही आहेत, कारण त्यांच्या डोक्यात सतत आपल्या बांधवांचे भले कसे होईल याच्या योजना बनत असतात. त्यांचे आवडते नेते “नितीन गडकरी” हे ही त्याअर्थाने समाजवादीच. आपल्याला वंशपरंपरागत लाभलेल्या संपन्नतेचा विश्वस्त म्हणून स्विकार करायची त्यांची दृष्टी खास भारतीय आहे.

कांतरावांची ओळख आजची मुलाखत आणि त्याआधी त्यांचे फेसबुक पेज चाळले होते एवढीच. मात्र यात जे कांतराव समजले त्यातून त्यांची खूप आधीपासून ओळख असावी असे भावबंध माझ्या मनात निर्माण झाले. त्यातून त्यांना “कोकण प्रांत” आवडतो हे ही कळले, तेव्हा मनस्वी आनंद झाला. काका, तुम्हाला पाहिल्यावर मला माझ्या आजोबांची आठवण आली. त्या आजोबांच्या गावी, माझ्या कोकणातील आजोळी तुम्हाला घेऊन जायला खरंच खूप आवडेल, नक्की या, वाट पाहतो आहे.

कांतराव काकांची मुलाखत घेणारे, ग्रामगीताकार तुकडोजी महाराज यांच्यावर पी. एच. डी. करणारे, “शिक्षणाचा जागर” या उपक्रमातून प्रबोधन करणारे आमचे परभणी वेधचे डॉ. दिलीप शृंगारपुतळे सर! किती सुंदर, प्रवाही मुलाखत घेतली त्यांनी. त्याआधी आमच्या नायक सरांच्या लेकीने, विशाखाने, काकांची सुंदर ओळख करून दिली. “जगात जर्मनी आणि भारतात परभनी” ही उक्ती सार्थ करणारे हे सारे परभणीकर. तुम्ही सारे सुंदर आहात.

बस इतकेच.

-मंदार परांजपे,
वेध कार्यकर्ता

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: