वेधक व्यक्तीमत्वाची बहुरंगी, Cool मुले

ऑनलाईन वेध कट्ट्यावर आज (१२ जुलै २०२०)आलेली मुले ना कुणी सेलिब्रिटी होती, ना अजून त्यांनी आयुष्यात काही असामान्य कर्तृत्व गाजविले आहे. पारिजातकाचा सडा पडलेला आहे, त्यातील कोणतीही चार फुले वेचलीत किंवा गुलाबांच्या ताटव्यांमधील कोणतीही फुले पाहिलीत तर जी प्रसन्नता अनुभवांस येईल तीच प्रसन्नता आजच्या (१२ जुलै २०२०) ऑनलाईन कट्ट्याविषयी लिहिताना मनांत आहे. आणि मला खात्री आहे की पूर्ण भरलेल्या झुम सभागारातील प्रत्येकाच्या मनांत तीच प्रसन्नता दाटलेली होती, आणि फेसबुकवर भविष्यात जे कुणी हे सेशन पाहतील त्यांनाही हाच अनुभव येईल. वेध परिवारांतील शेकडो मुले, बहुरंगी बहरमधील सुमारे दोनशे मुले, आय. पी. एच. च्या कुल क्लबमधील मुले असा हा वेधक, बहुरंगी, कुल समुदाय आहे, त्यातील ही आजची पाच जण!

काल या पंचकाच्या त्यांच्या केतकी ताईसोबत झालेल्या संवादाआधी आजचा हा ब्लॉग लिहिण्याची माझी हिंमत झाली नसती. म्हणजे, आपल्याच मुलांचे कौतुक आपणच लिहायचे म्हणजे जे टिपीकल अवघडलेपण वगैरे येते ते आले होते. मात्र या मुलांच्या गप्पांनी मला जमीनीवर आणले. व्यासपीठ, फॅकल्टी, मुलाखत वगैरे कोणत्याच गोष्टीचा कोणताच ताण न घेता, कोणताही गंड न बाळगता हे बहाद्दर बिनधास्त बोलत होते. ही सहजता, ही समानता, ही सायुज्यता कोठून आली यांच्यात? ही तर आपण यांना दिलेली देणगी नाही, ना हे जन्माला येताना या गोष्टी बरोबर घेऊन आले होते. वेध चळवळ आणि बहुरंगी बहरमुळेच त्यांना या सुंदर गोष्टींचा लाभ झाला. त्या गोष्टींचे सेलिब्रेशन म्हणजे ऑनलाईन कट्ट्यावरील मुलाखत असेल, तर त्याचे अवघडलेपण कसले? गंमत म्हणजे मोठा मानसिक वळसा घेऊन प्रयत्नपूर्वक जे मी समजाऊन घेतले ते यांच्यात अगोदरच सामावलेले होते. आजच्या या गप्पांत अहंभावविरहित सहजता अनुभवास आली असेल तर ती REBT आणि तत्सम मनोविकासात्मक तंत्रे यांनी अतिशय योग्य वयात आत्मसात केली त्यामुळे. ही मनोविकासात्मक तंत्रे आत्मसात करण्याची इच्छा इतर अनेक मुलांच्या मनात निर्माण व्हावी, आणि पालकांनी त्यासाठी त्यांना मदत करावी हाच या सेशनचा उद्देश होता.

सेशनच्या मध्यावर एका चलाख मुलाने फार सुंदर प्रश्न विचारला की “मार्कांना महत्व नाही तर ९०+ गुण मिळविलेलीच मुले का?”. खरं सांगू माझ्या मित्रा जर तू हे वाचत असलास तर माझी (आमच्या पिढीतील बहुसंख्य पालकांच्या वतीने दिलेली) ही कबुली ऐक, आणि आम्हाला क्षमा कर. शालेय जीवनातील परीक्षा जीवनाचा फार छोटासा भाग आहे, हे “तत्वत:” आम्हाला पटते रे. मात्र ते आचरणात आणताना आम्हाला खूप कठीण जाते. ९०+ गुण आम्हांला आकर्षित करतात, त्यांच्या मर्यादा माहित असूनही. तुमची पिढी या मानसिक मर्यादेतून नक्की बाहेर पडेल. आजच्या या पंचकाने दिलेल्या उत्तरांतून हा दिलासा तुझ्यापर्यंत नक्की पोहोचला असेल. अजून वीस पंचवीस वर्षांनंतर असे सेशन जेव्हा होईल तेव्हा हे ९०+ चे कुंपण त्याला नक्की नसेल.

आजचे चौघजण बारावीत शिकणारे होते, आणि त्यांची विशाखाताई त्यांच्याहून दोन वर्षांनी मोठी. मुलाखत घेणारी केतकी ताई अजून फार तर चार वर्षांनी मोठी. या सहा जणांनी मिळून गेल्या आठवड्यात जी तयारी केली होती त्याचे साक्षीदार होणे आमच्यासाठी अतिशय आनंददायी होते. यांची माहिती गोळा करणे, नंतर यांच्याशी फोनवर बोलणे, मुलाखतीचा आराखडा बनविणे हे केतकी ताईने केले. सहज, कुल वागणारी ही मुलं तयारी कशी जबरदस्त करतात हे ही आम्ही पाहिले.

सोमनाथ प्रकल्प, श्रमसंस्कार छावणी, भ्रमंती, योग, होमी भाभा परीक्षा, असीम फाऊंडेशन, FTII (Film and Television Institute of India), गायन, क्रीडा, बहुरंगी बहर आणि वेध या सर्व ॲक्टिव्हिटीज् मुळे यांचे आजवरचे जगणे समृध्द केले, इतकेच नव्हे या गोष्टींनी यांना जीवनदृष्टी प्रदान केली. यांच्या पालकांच्या पिढीला हे असे काही भन्नाट करायला अपवादानेच मिळाले, त्यामुळे पालकांची पिढी परीक्षेतील मार्कांना इतके महत्व देते. परीक्षेतील मार्क पालकांच्या पिढीसाठी आपले स्वत्व दाखवून देण्याचे कदाचित एकमेव व्यासपीठ होते. या मुलांसाठी परीक्षेतील मार्क साधन आहेत, जीवनपटाचा एक लहानसा भाग आहेत. ही मुले मार्कांना योग्य महत्व देतात, मात्र त्यापलिकडचे जगणे यांना दिसते ही गोष्ट किती मनोहर आहे!

शालेय परीक्षांना मर्यादित महत्व देणारी ही मुले जगण्यातील परीक्षांना मात्र समरसून सामोरी जातात. विशाखाला B. Sc. करताना योगाभ्यासाची पदविका कराविशी वाटते, आभा, आशय FTII चा कोर्स करतात, सानिका खेळते, मुक्ता होमी भाभा परीक्षेच्या प्रकल्पात जीव ओतून मेहनत करते. यातून त्यांची जीवनदृष्टी विकसित होत असते, कदाचित त्यांना पर्यायही मिळतात. आयुष्यात एखादी गोष्ट मनासारखी नाही झाली तर ही मुले हार मानणार नाहीत हे नक्की. त्याऐवजी दुसरं काहीतरी कदाचित आधीच्या स्वप्नाहूनही भव्य ते नक्की उभारतील. पहा पुन्हा “भव्य” शब्द माझ्या मनातून आला. ही मुले म्हणतील, भव्य असेल किंवा नसेल, मात्र ज्यात आम्हाला आनंद ते आम्ही करू हे नक्की. ते भव्य असेल की नाही याची काळजी आम्ही का करावी?

वेध चळवळ आणि बहुरंगी बहरचा उल्लेख सुरुवातीला झाला. या दोन्ही चळवळींमागे डॉ. आनंद नाडकर्णी या मनोविकासमहर्षींचे अधिष्ठान आहे. “वेध” ही महाराष्ट्रात ठाणे, नाशिक, कल्याण, पुणे, अहमदनगर, औरंगाबाद, परभणी, लातूर, पेण आणि बदलापूर (आगामी) या शहरांत साजरी होणारी व्यवसाय-प्रबोधन परिषद – जीवनकी पाठशाला आहे. ज्यांनी जीवनात सार्थक समाधान प्राप्त केले आहे अशा ७०० पेक्षा अधिक दिग्गजांच्या मुलाखती डॉ. आनंद नाडकर्णी यांनी वेधच्या व्यासपीठावरुन घेतल्या आहेत. यातील बहुसंख्य मुलाखती “AVAHAN IPH” या युट्युब चॅनेलवर उपलब्ध आहेत. या मुलाखती जीवनातील सार्थकता प्राप्‍त करण्यासाठीचे मार्गदर्शक वस्तूपाठ आहेत. वेधच्या फॅकल्टींना ऐकल्यावर आपल्या जगण्यातील अहं, निराशा, भितीच्या भिंती नाहीशा होतात, मने मोकळी होतात, नवीन साहसे करण्यासाठी सिध्द होतात. ज्या पालकांना आणि मुलांना आजचे सेशन ऐकल्यावर “या मुलांनी हे मिळविले कुठून” असा प्रश्न पडला असेल, त्यांनी लगेच वेधचे व्हिडिओ पहायला सुरुवात करावी, उत्तरे आपली आपण मिळत जातील.

शुभदा चौकर संपादित वयम मासिक आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांची आय. पी. एच संस्था यांनी ‘बहुरंगी बहर’ या उपक्रमाद्वारे महाराष्ट्रातील सातवी ते नववीच्या मुलांमधून दरवर्षी ५० याप्रमाणे २०० मुले आजवर निवडली आहेत. या मुलांना दरवर्षी एका शिबीरात सहभागी होण्याची संधी मिळते. या शिबीरांतून मुलांना मिळणारे मनोविकास-प्रशिक्षण अद्वितीय असते. केवळ निवासाचे शुल्क या मुलांकडून घेऊन हा ज्ञानयज्ञ या दोन्ही संस्था दरवर्षी करीत असतात. कुमारवयाच्या मुलांनी अथवा त्‍यांच्या पालकांनी, https://wayam.in/ या दुव्यावर जाऊन वयम मासिकाशी संलग्न व्हावे असेही सुचवावेसे वाटते.

या मुलाखतीत मुले आम्हा पालकांविषयी जे काही चांगलं बोलली त्याचं श्रेय आय. पी. एच च्या पालकशाळेला जातं, यावर मला वाटतं बहुसंख्य मुलांचे पालक सहमती दर्शवतील. AVAHAN IPH वरील “या मुलांशी वागायचं कसं” हे डॉक्टर नाडकर्णी यांचे व्याख्यान अवश्यमेव ऐका. पालक म्हणून पुनर्जन्म व्हावा इतके हे व्याख्यान प्रभावी आहे.

आजचे सेशन आम्हाला आमच्या मुलांची नवीन ओळख करवून गेले. मार्कांना साधन मानणारी, एका मर्यादेनंतर मार्क कामाचे नाहीत याची समज असणारी आमची ही बाळं आम्हाला खूप काही शिकवून गेली. फिल्म बनविण्याचे आणि सायंटिस्ट होण्याचे स्वप्न एकाच वेळी पाहणारा आशय, योगाभ्यास करता करता स्पर्धा परीक्षांना सामोरी जाऊ पहाणारी विशाखा, ॲथलीट आणि डॉक्टर बनू इच्छिणारी सानिका, मानसशास्त्रात काही करु पाहणारी आभा, जीवनाचे मोझॅईक समृध्द अनुभवांनी संपन्न करीत डॉक्टर बनू इच्छिणारी मुक्ता तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा!

खलील जिब्रान म्हणतो तशी तुम्ही सर्वजण जीवनाच्या स्वेच्छेची अपत्ये आहात, आम्ही तुम्हाला केवळ प्रेम देऊ शकतो, विचार नाही, तुमचे विचारविश्व तुम्ही स्वत: निर्माण करणार आहात. तुमच्या पंखात बळ येईतो आम्ही तुम्हाला निवारा देऊ, मात्र तुमच्या आत्म्यांना निवारा देण्याचे बळ आमच्यात नाही, कारण, त्यांची जागा उद्याच्या भविष्यकाळात आहे.

मंदार परांजपे, कार्यकर्ते, पेण वेध.

वेध कट्टा, ‘गुणवंत की गुणवान?’ सेशनची लिंक – https://m.facebook.com/story.php?story_fbid=3110757662334266&id=100002001879504

इतर उपयुक्त लिंक्स –
१. आवाहन आयपीएच युट्युब चॅनल
https://www.youtube.com/channel/UCwZit5ah1vBwbpeQV55VRIA २. या मुलांशी वागायचे कसे? डॉ. आनंद नाडकर्णी यांचे व्याख्यान https://www.youtube.com/watch?v=RlpcjASVR7c ३. वयम मासिक https://wayam.in/

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: