सृजनशील शिल्पकाराशी संस्मरणीय संवाद

रविवार, दिनांक ५ जुलै २०२० रोजी सादर झालेल्या वेध कट्टयावर जयदीप आपटे या तरुण शिल्पकाराची भेट झाली. जयदीप यांनी शेअर केलेल्या गुजगोष्टींचे टिपण करुन ते साठवावेसे वाटले, म्हणून हा लेखप्रपंच. जयदीप यांच्यातील मनाला सर्वात अधिक भावलेली गोष्ट म्हणजे त्यांच्या विचारांची खोली आणि सुस्पष्टता.
वयाच्या अवघ्या पस्तीशीतील जयदीप यांना जगण्याचे विविध पैलू अत्यंत बारकाईने समजले आहेत. त्यांच्या दृष्टीत एकप्रकारचा दृढनिश्चय दिसून येतो. करीयरच्या वाटा शोधाणाऱ्या प्रत्येकाला या मुलाखतीतून बरेच काही घेण्यासारखे होते.

कल्याणमधील जगप्रसिध्द शिल्पकार सदाशिव ऊर्फ भाऊ साठे यांना पहात पहातच जयदीप लहानाचे मोठे झाले. गेटवे ऑफ इंडिया येथील अठरा फुटांचा शिवाजी महाराजांचा पुतळा, तसेच, दांडी येथील मिठाच्या सत्याग्रहाच्या राष्ट्रीय स्मारकातील गांधीजींचा पुतळा या भाऊ साठ्यांच्या अजरामर कलाकृती. शाळकरी जयदीपच्या मनात शिल्पकलेचे बीज रोवले गेले, आणि स्वभावातील कृतनिश्चयाच्या बळावर त्याने ते पूर्णत्वाला नेले.

हमखास यश देतात अशी अंधश्रध्दा ज्या करीयर मार्गांबद्दल असते, ते सर्व सोडून, आपल्या मनाच्या ग्वाहीला प्रतिसाद देण्यासाठी हिम्मत लागते, ती जयदीप आणि त्याच्या पालकांनी दाखविली ही भाग्याची गोष्ट. शिल्पकलेचे क्षेत्र तसे बेभरवशी आणि दीर्घसूत्री समजले जाते. जे. जे. स्कूल ऑफ आर्टस् मधील G. D. Arts (Sculpture and Modelling) सोबतच रहेजा स्कूल ऑफ आर्टस् मधून G. D. Arts (Applied) अशा दोन पदव्या जयदीप यांनी मिळविल्या, मात्र त्यांचा जीव रमला तो शिल्पकलेतच.

करीयरच्या सुरुवातीला त्यांनी भाऊ साठे व अन्य शिल्पकारांच्या हाताखाली काम केले, त्याचसोबत गणपती-उत्सवातील सजावटीचे पडदे रंगविण्याचेही काम त्यांनी केले. पडदे रंगविताना स्केलची भिती गेली असे ते नमूद करतात. प्रचंड मोठ्या कामाला भिडण्याची पूर्वतयारी, सराव या दृष्टीने त्यांनी हे काम केले होते. एकदा आजारातून पूर्ण बरे व्हायच्या आधीच सलग ३६ तास गणपती-उत्सवातील सजावटीचे काम ते करीत होते. वर वर पाहताना ही गोष्ट उथळ, अनावश्यक व बेजबाबदार वाटू शकते, मात्र त्यापाठीमागची त्यांची विचारप्रक्रिया समजून घेतली तर ती अत्यंत भव्य दिसते. “मनाच्या तरल, प्रवाही अवस्थेत” माणूस अशक्यप्राय कामे करु शकतो, आणि मनाची अशी अवस्था अभ्यासाने मिळविता येते असे डॉ. कलामांनी “Wings of fire” पुस्तकात लिहून ठेवले आहे. जयदीप याच अवस्थेच्या प्राप्तीचा अभ्यास करीत होते.

२०१२ मध्ये जयदीप यांनी स्वत:चा स्टुडियो कल्याणमध्ये थाटला, आणि शिल्पकार म्हणून त्यांच्या करीयरला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. दांडी स्मारकातील दोन शिल्पे तसेच कणकवली येथील “कोकणगांधी” अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा अशी कामे जयदीप यांनी साकारली. कोकणी माणसाच्या हातात काठी किंवा दंडा असलाच पाहिजे या सामान्यज्ञानावर आधारित जाणीवेतून अप्पासाहेबांच्या पुतळ्यामध्ये काठी आणली गेली. शिवाय काठीमुळे ट्रायपॉडसदृश रचना निर्माण होऊन पूर्णाकृती पुतळ्याचा गुरुत्वमध्य अधिक पक्का होईल ही शिल्पकाराची भौतिकशास्त्रीय दृष्टी विशेष म्हणायला हवी. अप्पासाहेबांचे जेमतेम पाच फोटो उपलब्ध झाले, त्यातील चेहरा नीट दिसतो आहे असे दोनच निघाले, तेव्हा शिल्पकारांनी अप्पासाहेबांचे चरित्र, त्यांनी लिहिलेली पुस्तके वाचली, त्यातून त्यांची मूर्ती त्यांच्या मन:चक्षुंसमोर साकार झाली. ही कर्तव्यनिष्ठा, पूर्णत्वाचा ध्यास कलाकाराचे असामान्यत्व सिध्द करीत असतो. जी गोष्ट चेहऱ्याची तीच कपड्यांची. जाड्याभरड्या खादीचा पोत निराळा, तर रेशमी वस्त्राचा तलमपणा निराळा. शिल्पाच्या माध्यमातून तो साकार करणे हे कलाकाराला मिळालेले आव्हान, आणि ते पेलणे हे त्याचे सृजन. जयदीप यांच्या प्रवाही वाणीतून त्यांच्या कलेचे विविध पैलू उघड होत होते.

अप्पासाहेब पटवर्धन यांचा पूर्णाकृती पुतळा

कल्याणमधील एका चौकात सुशोभीकरणासाठी सिंहाचे शिल्प बसवायचे होते, आणि हे शिल्प स्क्रॅप धातुंपासून बनवायचे होते. हे शिल्प बनविण्यासाठी कामाची गरज म्हणून जयदीप वेल्डिंग कसे करायचे ते शिकले. वास्तविक हे काम त्यांना वेल्डरकडून करुन घेता आले असते. मात्र त्यासाठी त्यांना वेल्डरला बऱ्याच गुंतागुंतीच्या सुचना द्याव्या लागल्या असत्या, आणि त्या नेमकेपणाने अमलात आणणे वेल्डरला जमलेच असते असे नाही. शिल्पाकृतीच्या आकाराचा तोल बिघडू नये यासाठी शिल्पकारानेच त्या जोडण्या करणे त्यांना आवश्यक वाटले.

जयदीप यांची शिल्पकलेतील स्वतंत्र कारकीर्द उण्यापुऱ्या आठ वर्षांची. यशाची उच्चतम शिखरे अजून त्यांना पादाक्रांत करायची आहेत. तरीही त्यांच्या आजवरच्या शिल्पकलेच्या प्रवासातील माईलस्टोन ठरेल असे शिल्प म्हणजे, इंग्लंडमधील यॉर्कशायर येथील शीख सोल्जर्स संघटनेसाठी महायुध्दात वीरगती प्राप्त केलेल्या शीख सैनिकाचे पूर्णाकृती शिल्प. ३३० किलो ब्रॉन्झमधून हे शिल्प साकारले गेले आहे. या शिल्पाकृतीच्या निर्मितीचे काम सलग आठ महिने चालले होते.


या निमित्ताने मुलाखतीमध्ये शिल्पकारांनी शिल्पनिर्मितीची सगळी प्रक्रियाच उलगडून दाखविली. आधी लहान आकाराचे मातीचे शिल्प तयार केले जाते. त्यानंतर साचे बनवून आधी फायबरची आणि नंतर मेणाची अंतिम प्रतिकृती बनविली जाते. नंतर साच्यांमध्ये वितळलेले धातू संमिश्र (जसे की ब्रॉन्झ) ओतून पुतळा साकार होतो. यानंतर शिल्पकार त्याचे फिनिशींग करीत असतो. निर्मितीची ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत सुखाची असते, एकदा पुतळा त्याच्या अपेक्षित जागी स्थापन झाला की शिल्पकार त्यातून अलिप्त होतो, नवे आव्हान स्विकारायला सिध्द होतो. गीतेतील कर्मयोग याहून काय वेगळा असतो?

शिल्पकाराला शरीरशास्त्राचे आणि भूमितीचे ज्ञान असणे अत्यंत आवश्यक असते, गणितही पक्के असावे लागते, कारण ‘स्केल अप’ करण्यासाठी आकडेमोड गरजेची असते. मगाशी भौतिकशास्त्राचाही उल्लेख झाला. इतिहासाचे ज्ञान आणि भान तर हवेच. याशिवाय ज्यांचा पुतळा बनवायचा त्यांच्या आणि ज्यांच्यासाठी तो बनवायचा त्यांच्याही मनाची ठेवण माहित हवीच. म्हणजे मानसशास्त्राचे ज्ञानही हवे. असामान्य शिल्पकार अशाप्रकारे बहुविध गुणांच्या समुच्चयाने बनत असतो. त्याच्या शालेय औपचारिक शिक्षणाचा ठायी ठायी उपयोग त्याला होत असतो. शिल्पकला मातीत होते, प्लॅस्टरमध्ये, फायबरमध्ये आणि धातूतही होते. लेणी तर दगडात खोदली जातात. या साऱ्या माध्यमांवर हुकूमत शिल्पकाराला मिळवावी लागते.
शिल्पकला अशा तऱ्हेने कलाकाराला थकविणारी असली तरी शिल्पकलेला टिकून राहण्याचे वरदानही आहे. शिल्पे इतिहासाची साधने बनून राहतात, आणि त्यांच्या रुपाने शिल्पकार अमरत्व प्राप्त करतो.

‘स्टॅच्यु ऑफ युनिटीच्या’ स्केलचा किंवा त्या तोडीचा पुतळा बनविण्याची जयदीप यांची महत्वाकांक्षा आहे. त्यांचा आजवरचा प्रवास पाहता त्यांना अशी एखादी अजरामर कलाकृती निर्माण करण्याची संधी निश्चित मिळेल याची खात्री वाटते.

जयदीप आपटे या शिल्पकाराचे मनोगत ऐकताना खूप समृध्द अनुभवाची प्राप्ती झाली. एक कलाकार त्याच्या कलेविषयी भरभरुन बोलत होता, कोणताही आडपडदा नव्हता, कोणता बडेजाव नव्हता की अहंकार नव्हता. झऱ्याचे पाणी वहात असावे तितक्या सहजपणाने आणि निर्मळपणाने संवाद झाला. कल्याण वेधचे आमचे श्री. देवेंद्र ताम्हणे सर, ते जयदीप यांचे विज्ञान-गणिताचे शिक्षकही होते, त्यांनी अत्यंत प्रवाहीपणे ही मुलाखत घेतली. शिक्षकाचा जिव्हाळा आणि शिष्याचा स्नेह यामुळे खूप छान माहोल निर्माण झाला होता.

ही मुलाखत प्रत्येक विद्यार्थ्याने आणि त्याच्या पालकांनी अवश्यमेव ऐकावी. त्यातून खूप काही शिकण्यासारखे आहे.

मंदार परांजपे,
पेण वेध.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: