देणं वेधचं

माझी आणि वेधची भेट म्हणजे काही फारशी जुनी नव्हे! मित्र-मैत्रिणींच्या सांगण्यावरून मी ठाणे वेधला दहावीत असताना गेलो. आम्ही पोहोचलो तेव्हा रिकामं वाटणारं ते मैदान, हां हां म्हणतां थोड्याच वेळात गर्दीने तुडुंब भरले. त्यावेळेची theme होती ‘शून्य ते शिखर’ म्हणजेच ‘Flop to Top’ !! वेध मध्ये आलेल्या Faculties चं स्वागत गाण्याने केलं जातं आणि तीन दिवसांच्या वेधमध्ये आम्हीही ती गाणी गुणगुणायला लागलो. अशी सत्राची सुरुवात सुरेल व्हायची आणि मग मुलाखत कम गप्पा व्हायच्या…

या माझ्या पहिल्या वेधमध्ये मला काही गोष्टी प्रकर्षाने जाणवल्या. Faculties पैकी कोणीही, “आपल्याला सर्व ज्ञान आहे आणि ते लोकांना शिकवायचं आहे”, अशा अभिनिवेशात नव्हते. त्यांपैकी कोणालाही आपण शिखरावर पोहोचलो आहे असं वाटत नव्हतं, आणि सर्वांनाच शून्य आणि शिखर या दोन टप्प्यांपेक्षा शून्य आणि शिखर यांमधला प्रवास जास्त महत्त्वाचा आणि आनंददायी वाटत होता!!

वेध झाल्यानंतरही त्याची मोहिनी कमी झाली नाही. उलट त्या मोहिनी मुळेच मी ‘AVAHAN IPH’ या YouTube channel वर उपलब्ध असलेल्या वेधच्या अनेक मुलाखती पाहिल्या. मला एका गोष्टीचं नेहमी आश्चर्य वाटत आलं आहे, की इतके भन्नाट व्यक्ती आणि वल्ली वेधच्या टीमला सापडतात कुठून! इतकी माणसं, त्यांचे कार्य, त्यांचे अनुभव वेधच्या माध्यमातून आम्हाला कळतात. ह्या माणसांची करियर, कार्यक्षेत्रं किती निरनिराळी!

प्रत्येक जण चौकटीबाहेरचा म्हणजे, ‘Out of the box’ विचार करणारा! म्हणून कधी कधी विचार येतो, की या माणसांना अशी कार्यक्षेत्रं निवडताना भविष्याची भिती वाटली नाही ? ते त्यांच्या आयुष्यातले खरे मुसाफिर असतात. त्यांनी स्वतःच्या इच्छेनुसार वाट निवडली असली तरी त्यांना निष्काळजी म्हणता येत नाही; कारण जिद्द, चिकाटी, परिश्रम कुठेही कमी पडलेले जाणवत नाहीत. ”कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन” हे गीतेतले वचन त्यांच्या वर्तनामध्येच दिसू लागते…

वेधची सर्वात महत्त्वाची खासियत म्हणजे मुलाखत घेणारे डॉ. आनंद नाडकर्णी! आनंद सर अशा पद्धतीने प्रश्न विचारतात, की Facultiesच्या अनुभवाकडे आम्हा श्रोत्यांना योग्य पद्धतीने पाहता येतं. आनंद सर म्हणजे मुलाखतीचे ‘बोलविते धनी’ असं म्हणायला हरकत नाही. मुलाखतीच्या शेवटी ते Facultyच्या प्रवासाचं इतकं मार्मिक विश्लेषण करतात की असं वाटतं एवढ्यासाठीच मुलाखत ऐकली होती! स्पृहा जोशीने तिच्या मुलाखतीच्या शेवटी म्हटलंय, “मुलाखती तर अनेक होतच असतात; पण मुलाखतकाराच्या प्रश्नांमधून आपण काही शिकावं असा योग वेधच्या कार्यक्रमात जुळून येतो.”

वेधच्या मुलाखतीचं वैशिष्ट्य हे, की ती मुलाखत त्या Faculty बरोबर आपली चांगली भेट घडवते आणि त्या Facultyच्या व्यक्तिमत्वाने आपण पुन्हा-पुन्हा प्रभावित होत जातो! काही काही गोष्टी ह्या सर्वांमध्ये common असतात. डॉ. भरत वाटवानी, संतोष गर्जे, रवी बापटले ही सामाजिक कार्य करणारी मंडळी मुलाखतीत बोलू लागतात तेव्हा त्यांची संवेदनशीलता आणि त्यामागची त्यांच्या अंतःकरणातील तळमळ प्रकर्षाने जाणवते. डॉ. शारदा बापट, डॉ. मेधा ताडपत्रीकर, अमृत देशमुख यांची मुलाखत ऐकताना त्यांची ज्ञानलालसा पाहून थक्क व्हायला होतं. कार्यक्षेत्र एक, पण निरनिराळ्या विषयातील यांची मुक्त मुशाफिरी डोळे दिपवते. आणि हे सर्व असूनही आपण आपले ध्येय पूर्णपणे गाठले अशा अविर्भावात कोणीच नसतं!! त्या प्रत्येकामध्ये ध्येयाप्रती एक प्रकारचे झपाटलेपण दिसते. म्हणूनच या सर्व फॅकल्टी आपल्याला नकळत शिकवत जातात….

वेधच्या मुलाखतीला ‘ज्ञानरंजन’ म्हणजेच ‘Edutainment’ असं म्हणतात. कार्यक्रमातली कुठलीही मुलाखत कधीही कंटाळवाणी किंवा नुसती तत्वबोधक वगैरे होत नाही. कारण त्या आपापसातल्या गप्पा असतात. कोणी लहान मूल कार्यक्रमाला येताना रडत आलं, तरी जाताना मात्र हसत हसत जातं…

या कार्यक्रमातून नकळत काही संस्कार आपल्यावर होत जातात. याला जे ‘जीवन की पाठशाला’ म्हटलं जातं तेही योग्यच! या माध्यमातून आपल्यावर असे संस्कार होतात की आपल्या ध्येयाप्रती आपला attitude, perspective उत्तम होतो, सकारात्मक ऊर्जा खेळती राहते. आणि आपण जीवनाचा, जीवनातल्या प्रत्येक क्षणाचा आस्वाद घेऊ लागतो. वेधचं देणं म्हणजे किती आहे, याचा अंदाज बांधणे देखील अशक्य आहे.
तर असं हे वेध वर्षानुवर्षे होत राहो आणि जास्तीत जास्त लोकांना त्याचा आस्वाद घेता येवो आणि आपल्या भारत देशाला त्याचा फायदा होवो.

आदित्य कोतवाल,
युवा कार्यकर्ता,
बदलापूर वेध.

संदर्भासाठी लिंक:

संतोष गर्जे यांची जगण्याचा ताल तोल मधील मुलाखत.
अमृत देशमुख व अमित गोडसे यांची पुणे वेध ‘झपाटलेपण ते जाणतेपण’ मधील मुलाखत.
रवी बापटले यांची ठाणे वेध, ‘शून्य ते शिखर’ मधीलल मुलाखत
डॉ.
डॉ. भरत व डॉ. स्मिता वाटवानी यांची ठाणे वेध, ‘शून्य ते शिखर’ मधीलल मुलाखत.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: