माझा वेध प्रवास

काही वर्षांपूर्वी, म्हणजे साधारण २००२- २०१०च्या दरम्यान मी नाटकांमधून अभिनेता किंवा बॅकस्टेज (पडद्यामागे) काम करायचो. ठाण्यात माझ्या महाविद्यालयाकडून काही एकांकिका स्पर्धा करायचो.. त्या दरम्यान माझी ओळख सचिन गावकर सोबत झाली. तो तेव्हा नाटकाचे नेपथ्य करत असे.

२००६ ला महाविद्यालयीन शिक्षण संपलं आणि उमेदीचा काळ सुरु झाला, मग काम शोधणे हा प्रवाससुद्धा सुरु झाला. दरम्यान सचिन एकदा मला एका इव्हेंटसाठी मदतीला घेऊन गेला, तिथे नेपथ्याचे काम करायचे आहे म्हणाला. आम्ही सोबत रात्री ९-१०च्या सुमारास ठाण्याला भगवती शाळेच्या मैदानात पोहोचलो. तिथे एक मोठा मंडप उभारला होता. दुसऱ्या टोकाला एक स्टेज, त्यावर काही जुजबी सामान होतं. आसन व्यवस्था, त्याची आखणी, वगैरे. स्टेजच्या मध्यभागी आम्ही सोबत आणलेला एक बॅकड्रॉप (बॅनर) आणि दोन टेबलला लावण्याचे बॅनर लावायचे होते. आम्ही स्टेजवर ठेवून तो उघडला, त्याच्यावर छापलेले होते “पैसा किती मोठा, किती छोटा- Lifestyle and Career”.

साधारण एक तासभर लागला सगळं मांडून ठेवायला, बर्‍यापैकी  उशीर झाला होता. सचिनने पुन्हा एकदा सगळी व्यवस्था लागल्याचं पाहिलं आणि आम्ही निघालो..

त्यानंतर अशा अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमांना त्याने मला सोबतीला घेतलं, अर्थात मला एकट्यालाच नाही, तर आम्ही आणखी एक दोघं नाटकवाले….

काही महिन्यांनंतर सचिनने एकदा आम्हाला ठाण्याच्या हरिनिवास सर्कलच्या त्याच्या ऑफिसमध्ये नेलं.. आम्हाला त्याने त्यादिवशी एक नवीनच टास्क दिला होता, तो म्हणजे C.D, D.V.D चे कव्हर कट करून त्याचं पॅकिंग करायचं. हे कामआम्हाला रोजपेक्षा अगदीच वेगळं वाटलं, म्हणून म्हणलं करूयात…. हातात आलेले कव्हर पाहून त्यावरील चित्र ओळखीचं वाटलं. थोडा विचार केल्यावर आठवलं, “अरे हो, हे तर त्याच कार्यक्रमाचं कव्हर आह की, ‘पैसा किती मोठा किती छोटा, Lifestyle and Career’ “. त्या कार्यक्रमाचं चित्रीकरण करून ते D.V.D स्वरूपात आलं होतं. तेव्हा ते काम करता करता किंचित कुतूहल जागं झालं होतं आणि ज्या कामाचा सेट उभा करायला आपण हातभार लावला होता त्याचं आज D.V.D स्वरूप आलं आहे याचा थोडा अभिमान वाटला होता. खूप आनंदाने आम्ही ते काम केलं होतं.

त्यानंतर मी आयपीएच बरोबर आणि आयपीएच मधल्या आवाहन विभागाशी जोडला गेलो. तेव्हा आवाहन अगदी तान्हं बाळ होतं, अगदी रांगत चालणारं. त्यात आम्ही बर्‍याच गोष्टी करत करत शिकत होतो, म्हणजे D.V.D कव्हर्स प्रिंटिंग करून पॅकिंग करण्यापासून ते इथे होणार्‍या  अनेक कार्यक्रमांचं चित्रीकरण करण्यापर्यंत…. या सगळ्यात एक वेगळीच मजा यायची. काहीतरी नवीन आणि वेगळं शिकायला मिळतय ही गोष्ट माझ्यासारख्या माणसासाठी पुरेशी होती…

तर साधारण माझ्या लख्ख लक्षात रहिलेला न पेक्षा जवळून अनुभवलेला वेध म्हणजे , “सावध आणि साहस”, २००९- १० असावं. पहिला अशा अर्थानं, की पूर्वतयारीची नेमकी काय जादू असते ते मी अनुभवलं, म्हणजे अगदी वेधच्या पहिल्या ‘कोअर मिटींग’ पासून ते ‘पोस्ट वेध’ मिटींगपर्यंत. तेव्हा खरंतर मी वेध कार्यकर्ता झालो असं फीलिंग आलं जे आजपर्यंत टिकून आहे.

वेधचे ते दोन दिवस संपले तेव्हा असं वाटलं, “अरे, हे संपलं, आता पुढे काय?” पण खरंतर माझ्यासाठी वेध सुरु झालं होतं. त्या दोन दिवसाचं जे चित्रीकरण केलं होतं त्याचं संकलन करण्याची प्रोसेस आम्ही लगोलग सुरु केली. त्यावेळी ते सर्व छोट्या कॅसेट्समध्ये चित्रित केलं जाई आणि संकलनाच्या वेळी त्याची रिव्हर्स प्रोसेस होई. त्या सगळ्या कॅसेट्स एका छोट्या हॅंडिकॅम मध्ये टाकून रिवाइंड केल्या जात, मग त्या कॉम्प्यूटरशी जोडून सॉफ्टवेअरमध्ये जमा केल्या जात असत. हे सगळं प्रकरण माझ्यासाठी अदभूत होतं. मी प्रचंड भारावून गेलो होतो. हे सगळं काम आमचा मित्र दिनेश पुजारी याच्या ‘इनफोकस’ च्या ऑफिसमध्ये सुरु होते..साधारण २०-२५ दिवस चालू होतं सर्व काम.. त्या दिवसात वेधला आलेल्या प्रत्येक पाहुण्याला मी किमान दहा- बारा वेळा तरी ऐकलं असेल.. मुलाखती ऐकून त्यातला नको असलेला भाग काढायचा आणि तो पुढच्या भागाशी जोडायचा. या सगळ्याने वैचारिक दमछाक झाली होती पण त्या सगळ्याचं एक समाधान होतं. मला ते तंत्र शिकण्याची खूप इच्छा झाली आणि ते शिकण्यासाठी दिनेश आणि सचिनने मला खूप मदत केली. मी सलग दोन वर्ष ते तंत्र शिकण्यासाठी प्रत्येक कार्यक्रमानंतर दिनेश कडे जाऊन त्याच्यासोबत बसू लागलो आणि त्याला पाहून ते शिकू लागलो..

या सगळ्याचा उपयोग आम्हाला आवाहनच्या जडण घडणीत करता आला.. आज आवाहन हे एक स्वतंत्र, पूर्णपणे मानसिक आरोग्यासाठी वाहिलेलं एकमेव माध्यम विभाग आहे. कदाचित माझी आणि आवाहनची एकत्रित सुरुवात झाली ती वेध मुळेच.

आजवर डॉक्टरांनी कित्येक मुलाखती घेतल्या आणि माझ्यामते तीन पिढ्या घडवल्या. आतातर वेधला आलेले काही विद्यार्थीच वेधचे पाहुणे म्हणून येऊ लागलेत हे खरंतर वेधचे वेगळेपण आहे. एखादा विचार इतक्या लोकांमध्ये रुजून तो वाढणं हे काही औरच!

वेध हा केवळ विचार नाही तर ती एक चळवळ आहे असं आम्ही नेहमी म्हणतो. वेध आजवर का टिकलं, का रुजलं आणि का वाढलं? तर कालानुरूप झालेले बदल वेधने वेळोवेळी, अंगिकारले पण मूळ विचार ढळू दिला नाही.

या संपूर्ण प्रवासात वेध केवळ “Vocational Education” न राहता “जीवन कि पाठशाला” झालेला आहे. वेधने अनेक आयुष्य पालटली, अनेकांना नाव दिले, ज्यांची कार्य लोकांसमोर पोहोचली नव्हती त्यांना लोकांसमोर आणलं, आणि जीवन किती वैश्विक आहे, त्याला किती पैलू आहेत, याची जाणीव करून दिली आहे.

वेध आणि आवाहन आता एक समीकरण झाले आहे. वेधचा कॉंटेंन्ट जितका स्ट्रॉंग असतो, आणि प्रत्यक्ष अनुभवताना जो जिवंतपणा जाणवतो तोच अनुभव वेध झाल्यानंतर त्याच्या चित्रीकरणातून यावा यासाठी आम्ही सदैव प्रयत्नशील असतो.

वेधचं संपूर्ण चित्रीकरण ते संकलन आता आवाहनमध्येच होऊ लागलं आहे. सोबत एक पाऊल पुढे टाकत आता माध्यमही बदलू लागलय, तेव्हा वेधसाठी म्हणून सुरु केलेलं AVAHAN नावाचं YouTube चॅनेल सुद्धा सुरु झालं आहे. त्याची लिंक ब्लॉगच्या शेवटी जोडत आहे. आजवर झालेली आणि पाहता येऊ शकतील अशी सर्व सत्रे या चॅनेलवर अपलोड केली आहेत. त्याचबरोबर मानसिक आरोग्यासंबंधित इतर अनेक व्हीडियो सुद्धा या चॅनेलवर आपण पाहण्यासाठी उपलब्ध करत आहोत. आज आवाहन चॅनेलवर वेधची अंदाजे १५० सत्रं आहेत, काहींचे संदर्भ आजही लागू पडतात तर काही कॉंटेम्पररी विषय देखिल आहेत.

नुकताच आलेला अनुभव म्हणजे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद मधील २०१२ साली झालेला यश आणि अपयश या वेधमधील श्री. गिरीश कुबेर यांच सत्र व्हायरल झालं आहे. त्याची लिंक देखिल ब्लॉगच्या शेवटी जोडत आहोत. कुणीतरी या मुलाखतीतला नेमका संदर्भित मजकूर घेऊन तो कट करून पाठवला आणि अनायसे तो माझ्यापर्यंत पोहोचला. मला इतका आनंद झाला, कारण ते सत्र मी स्वत: संकलित केलं होतं. आपण संकलित केलेल्या एका सत्राचा भाग व्हायरल झाल्याचे समजल्यावर ऊर भरून आला! मी लगेच त्या व्हीडियोची लिंक सर्वांना पाठवली आणि बर्‍याच  लोकांनी ते सत्र पुन्हा एकदा पाहिलं. ह्या आणि अशा अनेक उदाहरणातून वेधची जादू कळते.

आज आपण वेधचा एक भाग आहोत याचा मला अभिमान वाटतो.

वेधबद्दल कितीही लिहिलं तरी ते अपूर्णच वाटतं. असे अनेक ब्लॉग लिहून व्हावेत इतके अनुभव गाठीशी आहेत. अनेक तांत्रिक बाजू आहेत ज्याबद्दल बोलावसं, लिहावसं वाटतं. पुन्हा कदाचित योग येईल न येईल पण मनाच्या तळाशी त्या अनुभवांचं गाठोडं बांधून ठेवलंय… आयुष्यात येणाऱ्या कैक गोष्टींना त्या गाठोड्यात असलेल्या अनुभवांच्या आधारे सामोरे जाता येतय, आणखी काय हवंय जगायला? वेधची जादू खरंतर या शब्दांमध्ये नाही तर तो अनुभवण्यात आहे हे नक्की.

शैलेश मेदगे,
आवाहन माध्यम विभाग व वेध कार्यकर्ता.

आवाहन यू-ट्यूब चॅनेलसाठी लिंक: https://www.youtube.com/channel/UCwZit5ah1vBwbpeQV55VRIA?reload=9

श्री.. गिरीश कुबेर यांचे औरंगाबाद वेधमधील सत्र पाहण्यासाठी लिंक:
https://www.youtube.com/watch?v=KXQxh5wfvJY

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: