आपोआप दहावी – डॉ. आनंद नाडकर्णी यांची विद्यार्थी-पालकांबरोबरची झूम मिटींग

लॉकडाऊनच्या परिस्थितीमुळे विविध क्षेत्रांमधील कार्यपध्दती एक तर थंडावल्या आहेत किंवा बदलल्या आहेत. शिक्षणक्षेत्र याला अपवाद नाही. सुमारे महिन्याभरापूर्वी सर्वच ठिकाणच्या शाळा बंद झाल्या. SSC बोर्डाच्या शाळांमधील इयत्ता ९ वी व ११ वीच्या परीक्षा रद्द झाल्या. इयत्ता १० वीचा भूगोलाचा पेपर रद्द झाला. इतर बोर्डांच्या परीक्षांच्या बाबतीतही थोडेबहुत असेच घडले. सर्वांसाठीच हे शैक्षणिक वर्ष कोणत्या ना कोणत्या प्रकारे अपूर्णता शिल्लक ठेऊन संपले. दहावी-बारावीचे शाळा-क्लासेसमधील वर्ग इंटरनेटवरील क्लाऊड मिटींगच्या स्वरूपात सुरू झाले. शिकण्याची ही रित शिक्षक व विद्यार्थी दोघांसाठी नवीन होती. दिवसभर घराबाहेर राहणारे सगळेजण अचानक घरात बंदिस्त झाले आणि घराचे मानसिक पर्यावरण पूर्ण बदलून गेले.

या बदलांना सकारात्मक रितीने सामोरे कसे जावे याचे काही मूलमंत्र डॉक्टर आनंद नाडकर्णी विद्यार्थी आणि पालकांना अत्यंत प्रभावीपणे देऊ शकतील अशा विचारातून पुणे वेधचे पळशीकर सर आणि कल्याण वेधचे ताम्हणे सर यांनी एका क्लाऊड मिटींगची कल्पना मांडली. रविवार, दिनांक १९ एप्रिल रोजी सायंकाळी ५.०० वाजता या मिटींगचे आयोजन करण्यात आले होते. “आपोआप दहावी” अशा समर्पक शीर्षकाची ही मिटींग अत्यंत यशस्वीरितीने पार पडली, तिचा हा वृत्तांत.

या मिटींगमध्ये ताम्हणे सरांनी डॉक्टरांची मुलाखत घेतली. ४.५० वाजता महाराष्ट्रातील विविध ठिकाणांहून आणि महाराष्ट्राबाहेरहूनही लोक जॉईन व्हायला सुरुवात झाली, आणि ५.०० वाजता १०० ही मिटींगरुमची क्षमता पूर्णपणे भरली. अनेकांना इच्छा असूनही मिटींगमध्ये सहभागी होता आले नाही. अर्थात या मिटींगचे रेकॉर्डिंग करण्यात आले असून ते लवकरच सर्वांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना काही विषय मनापासून आवडतात, तर काही विषयांचा अभ्यास करण्याचा कंटाळा येतो. अशा वेळी सर्व विषयांचा समुचित अभ्यास कसा करायचा असा प्रश्न ताम्हणे सरांनी विचारला. काही विषय आवडते तर काही नावडते असणे अत्यंत नैसर्गिक असल्याचे डॉक्टरांनी पहिल्यांदाच स्पष्ट केले. त्यांनी सांगीतले की व्यक्तीनुरुप प्रत्येक विषयाची एक विशिष्ट लय असते. ती लय शोधून काढणे महत्वाचे आहे. काही विषयांचा अभ्यास वेगात होईल, तर काही विषयांना अधिक वेळ द्यावा लागेल. अशा वेळी प्रत्येक विषयाचा अभ्यास “कोणत्या गिअरमध्ये” करायचा ते विद्यार्थ्याने शोधून काढले पाहिजे. आणि नंतर त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करायला हवे. वेगवान अभ्यास होतो ते विषय सुरुवातीला आणि शेवटी ठेऊन ज्यांना अधिक वेळ लागतो ते विषय मधल्या वेळेत करता येतील. जेवणातील सर्वच पदार्थ आपल्याला आवडत नाहीत, तरीही चौरस आहारचे महत्व असते, तसे “चौरस अभ्यास” करणेही गरजेचे असते, नावडते विषय “चविष्ट नसले तरी पोषक” आहेत अशी मनाची समजूत घालावी असे डॉक्टरांनी समजावले.

अभ्यास एके अभ्यास असे करु नये असा सल्ला डॉक्टरांनी दिला. हाताची बोटे पाच तसे दिवसाचे दोन भाग टाईमपास आणि मित्रांशी गप्पा मारण्यासाठी अवश्य राखून ठेवावेत असे त्यांनी सांगीतले. दिवसाच्या नियोजनातील तिसरे बोट मनोरंजनाचे, चौथे ज्ञानरंजनाचे तर शेवटचे अभ्यासाचे. ज्ञानरंजनात इंटरनेटचा वापर प्रभावीपणे करता येईल. ज्ञानरंजनातून मिळविलेले ज्ञान अभ्यासाच्या विषयांनाही समृध्द करील, असा मंत्र डॉक्टरांनी दिला. सोप्याकडून अवघडाकडे असा प्रवास केला तर तो सहजगत्या होईलच, शिवाय, हाताची सगळी बोटे मिळून ज्याप्रमाणे मूठ तयार होते, तशी शिकण्याची वज्रमुठ तयार होईल. दिवसात करावयाच्या सर्व कृतींचे सम्यक समायोजन होईल अशाप्रकारे दिवस स्वत:च “डिझाईन” करण्यास डॉक्टरांनी सांगीतले आहे. कुणाला पहाटे उठून अभ्यास करायला आवडेल, कुणाचा अभ्यास रात्रीच्या निरव शांततेत चांगला होईल. कोणत्या वेळी योग्य लय सापडते ते शोधावे.

आभासी माध्यमातील वर्ग हे आजचे वास्तव आहे. असे होईलच असे नाही, मात्र, पुढील शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपेस्तोवर कदाचित प्रत्यक्ष वर्ग भरणारही नाहीत याची मानसिक तयारी सर्वांनी करायला हवी. या कालखंडात शिक्षणाची पध्दतच कदाचित बदलून जाईल. आभासी वर्गच मुख्य प्रवाह बनू शकतील. आभासी वर्गांचे स्वत:चे फायदे आहेतच. भौगोलिक अंतराची मर्यादा त्यांना नाही, अर्थात यात सर्वांचाच वेळ व ऊर्जा वाचते. विद्यार्थी त्याला हवा त्या पध्दतीने “आरामात” वर्गात उपस्थित राहतो. अर्थात याची दुसरी बाजूही लक्षात घेण्यासारखी आहे ती म्हणजे एरवी शिक्षक जी एकाग्रता विद्यार्थ्यांमध्ये काहीशा बलपूर्वक प्रस्थापित करतात, तशी सोय इथे नाही. मात्र पुन्हा यातील चांगली बाजू अशी की विद्यार्थ्यांना स्वत:ला स्वत:ची एकाग्रता कमावता येईल आणि हे जीवन-कौशल्य अतिशय उपयोगी तर आहेच. आवाहन आयपीएचवरील इ१० हे मराठी व इंग्रजीत असणारे व्हिडिओ विद्यार्थ्यांनी अवश्य पहावेत असे डॉक्टरांनी सांगीतले. (या प्लेलिस्टची लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे.)*

“सर्वच जण घरात, आणि मुलांचे वर्गही घरात” यात मुलांची पर्सनल स्पेस हरवेल की काय अशी काळजी डॉक्टरांनी व्यक्त केली. मुलांना त्याची पर्सनल स्पेस हवी असते मग ती प्रत्यक्ष जागेची असेल आणि मानसिक पातळवरीलही असेल. या पर्सनल स्पेसचा सन्मान पालकांनी राखायला हवा. एखादी गोष्ट मुलांना “त्या वेळी” तुम्हाला सांगायची नसेल, त्याचा अर्थ ती ते तुम्हाला कधीच सांगणार नाहीत असा होत नाही, हे पालकांनी समजून घेतले पाहिजे. “लक्ष ठेवणे” आणि “पहारा ठेवणे” यात मानसिकदृष्ट्या महदंतर आहे याची जाणीव पालकांनी राखायला हवी. पहारा मुलांना नक्कीच टोचेल, त्यातून विसंवाद वाढीस लागेल. उलट लक्ष ठेवण्यात मायेची उब असेल. योग्य कृती घडत नसतील तर त्या घडण्यासाठी केवळ सिग्नल दिला जाईल. हा सिग्नल मुलांचा आत्मसन्मानही जपेल आणि त्यांना योग्य मार्गावरही आणेल. पहारा ठेवायला लागत असेल तर परस्परसंवादात, परस्परविश्वासात काहीतरी गडबड झाली असे निश्चित समजावे, व त्यावर त्वरित उपाय करावेत.

पालक-मुलांच्या नात्याचे पर्यावरण जसे बदलले आहे तसेच शिक्षक-विद्यार्थ्यांमधील सहसंबंधांचे पर्यावरणही बदलले आहे. आभासी-प्रत्यक्ष माध्यमांच्या घुसळणीतून या पर्यावरणात कदाचित कायमस्वरुपी विधायक बदल होतील. माहितीच्या आदानप्रदानासाठी तंत्रज्ञानाने उपलब्ध करुन दिलेली साधने वापरुन प्रत्यक्ष भेटींचा वेळ वैयक्तिक संवादासाठी वापरता येईल. प्रत्यक्ष भेटणे जमणार नसेल तेव्हा फोन किंवा क्लाऊड मिटींगद्वारे विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद शिक्षकाला साधता येईल. अशारितीने कदाचित शिकविण्याच्या प्रक्रियेचे चलनवलन पूर्णत: बदलून जाईल.

या जागतिक आरिष्टानंतरचे जग आर्थिक-सामाजिकदृष्ट्या यापूर्वीच्या जगापेक्षा अत्यंत निराळे असेल. आर्थिक मंदीचा काळ सर्वांच्याच आयुष्यात येईल. अशा परिस्थितीत जीवनशैलीकडे नव्याने पहावे लागेल. मागच्या पिढ्यांनी जसा टुकीचा, निगुतीचा संसार केला तसा यापुढे कदाचित करावा लागेल. विद्यार्थ्यांच्या जीवनातही याचे पडसाद निश्चित उमटतील. ज्या गोष्टींना आजवर गरजा समजले गेले त्या खरोखर गरजा होत्या का याचा विचार करावा लागेल. कुटुंबाची जीवनशैली नव्याने आरेखित करावी लागेल.

अशाप्रकारे लॉकडाऊन आणि त्यानंतरचा काळ कोणती आव्हाने घेऊन येणार आहे, आणि त्याला विवेकनिष्ठ दृष्टीकोनातून कसे सामोरे जायचे हे डॉक्टरांनी अत्यंत सोप्या भाषेत समजाऊन सांगीतले. आयपीएच आणि वेध कट्टा यांनी संयुक्तपणे आयोजित केलेली ही मिटींग अत्यंत यशस्वीपणे पार पडली.

-मंदार परांजपे,
क्षितिज-पेण

आवाहन आयपीएचवरील इ१० हे मराठी व इंग्रजीत असणारे व्हिडिओप्लेलिस्टची लिंक:

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: