अतुल आणि अमृता यांची शाश्वत शाळा

लातूर वेध २०१९ मध्ये “गौरव बंडखोरीचा” या सूत्रा अंतर्गत शाश्वत शाळा, अमरावतीचे अतुल आणि अमृता गायगोले यांची मुलाखत पाहण्याचा योग नुकताच आला (या मुलाखतीची युट्यूब लिंक लेखाच्या शेवटी दिली आहे). ही मुलाखत ऐकताना पहिल्यांदा जाणवते अतुल यांची conviction – दृढ धारणा. ते सांगत असलेल्या गोष्टी त्यांनी कुठे वाचलेल्या, ऐकलेल्या नाहीत, नुकत्याच त्यांच्या मनात आल्यात असेही नाही. त्या अनेक वर्षे त्यांच्या मनात रुजून, फुलून परिपक्व झाल्यात आणि नंतर बाहेर पडल्या आहेत असे वाटते. तेरा वर्षांहून अधिक काळ स्वत:च्या श्वासांच्या समिधा अर्पण करुन ही परिपक्वता या दांपत्याने मिळविली आहे. बारा महिने, चोवीस तास शिक्षणाच्या ध्यासासाठी – त्यांच्या दोन शाळांसाठी (त्यांच्याच शब्दात सांगायचे तर पहिली “बंदिशाळा” आणि दुसरी “संधीशाळा”) त्यांनी खर्च केले आहेत.

अमरावती हे पुण्या-मुंबईच्या पावलावर पाऊल टाकीत मार्गक्रमण करणारे शहर. मात्र एका बाबतीत कदाचित ते आपल्या मेंटॉर-शहरांनाही मात देत असेल. इथे अशी एक शाळा आहे, जिथला बाळाचा प्रवेश बाळ आईच्या पोटात असतानाच निश्चित करावा लागतो. शाळा नावाच्या चक्रव्यूहात इथले “अभिमन्यू” जन्माआधीच प्रवेश घेत असतात. अतुल-अमृता या सुविद्य दांपत्याला या शाळेची ओढ न लागती तरच आश्चर्य. या शाळेच्या प्रवेशाचे सव्यापसव्य आईबाबांनी पार पाडले आणि त्यांच्या “सई” बाळाने इथे प्रवेश तर मिळविला. सई शाळेत जायला लागली तशी तिची सर्वांगिण काळजी घेण्यासाठी अमृता चक्क त्या शाळेत शिकविण्यासाठी जाऊ लागल्या. बाहेरुन अतिशय आकर्षक दिसणाऱ्या शाळेचे रॅपरखालील अंतरंग अमृतांच्या लक्षात येऊ लागले, आणि त्यावेळी “आपणच शाळा काढूया” या इच्छेच्या निखाऱ्यावरील राख झटकली गेली आणि या दांपत्याने त्यांची पहिली शाळा काढली देखील.

अतुल व्यवसायाने इंटिरियर डिझायनर तर अमृता MA (English). मात्र शाळेत शिकविण्यासाठी सर्वात महत्वाचं काय लागते तर मुलांवरचे प्रेम आणि त्यांना उत्तम शिकवावे ही उत्कट इच्छा. याच भावनेतून त्यांची पहिली शाळा उभी राहिली. शाश्वत शाळेची आधीची आवृत्ती “एडिफाय” कोणत्याही हाय निश शाळेप्रमाणेच होती, आणि अत्यंत यशस्वीही झाली. अतुल-अमृताही या काळात कोणत्याही सर्वसामान्य पालकाप्रमाणेच “उत्तम करियर घडविण्यासाठी शिकविते ती शाळा” याच विचाराचे होते. परंतु वर म्हटल्याप्रमाणे “मुलांवरचे प्रेम आणि त्यांना उत्तम शिकवावे ही उत्कट इच्छा” ही उभयतांची अमृतगुटी होती. “कुठेतरी चुकत आहोत” हे जेव्हा जाणवले तेव्हा मांडलेला मोठा डाव उधळून नवा मांडण्याची शक्ती त्यांना याच गुटीने दिली असावी. “जीवनासाठी शिक्षण नाही तर जीवन हेच शिक्षण” हा युरेका विचार ज्या क्षणी त्यांच्या मनात आला तो उत्क्रांतीचा क्षण होता. न्यूटनचे नियम शिकायचे नाहीत, तर नियम तयार करणाऱ्या न्यूटनच्या मनात डोकावून पहायचे हे त्यांना जाणवले. नियमांच्या चष्म्यातून जग पाहिले तर ते नीरसच दिसते, “कोणत्या मनहूस घडीला तो न्यूटन जन्माला आला”, असेच वाटते. मात्र जगाचे चलनवलन पहात पहात नियमांकडे गेले तर नियमांच्या जन्माचा सोहळा अनुभवायला मिळतो. “मै भी न्यूटन”, असे ज्याला वाटेल त्याला न्यूटन कधी मनहूस वाटेल का? हाच “बंदिशाळा” आणि “संधीशाळा” यातील फरक असणार.

शिक्षणाच्या बाबतीतील त्यांचे उत्क्रांत झालेले विचार अतिशय सामान्य पालकांना ‘रॅडिकल’ वाटणारे. अचानक समोर आलेल्या क्रांत्या सामान्यजनांच्या चटकन पचनी पडणाऱ्या नाहीत याची सुबुध्द जाणीव – शहाणीव त्यांच्यांत होती. “जगाला हळूहळू धक्के देत बदलूया”, हा विचार अत्यंत महत्वाचा खराच. हा गांधींचा मार्ग – क्रांतीपेक्षा उत्क्रांतीवर विश्वास ठेवणारा. समाजाला बरोबर घेऊन पुढे जाणारा. पालकांच्या पाल्याविषयीच्या पारंपारिक आकांक्षांचा आदर अतुल-अमृतांनी नेहमीच केला. कधीकाळी त्याच त्यांच्याही आकांक्षा होत्या ना!

“शाश्वत शाळेतील” बहुतांश मुले शिष्यवृत्ती परीक्षेत उज्ज्वल यश संपादन करतात. या बिंदूवर ही शाळा पालकांच्या अपेक्षांवर खरी उतरते. आपल्या पाल्याची शाळा “भारी” आहे हा विश्वास पालकांच्या मनात दृढ होतो, आणि यानंतरच शाश्वत शाळा प्रयोगशीलतेच्या मार्गावर अग्रेसर होते. पालकही विश्वासाने विसावतात. समोरच्या व्यक्तीचा, तिच्या आकांक्षांचा “विनाअट स्विकार” करतानाच आपले ध्येय न विसरणे, आणि अत्यंत प्रेमाने त्या व्यक्तीला आपल्या विचारांच्या रंगात रंगविणे ही गोष्ट खूप आकर्षक आहे. वादविवादाच्या खडखडाटात बऱ्याचदा अहं दुखावले जातात, आणि आपल्या विचारांचा सहजपणे स्विकार ज्यांनी केला असता अशी माणसेही दुरावतात. प्रयोगशील शाळा बऱ्याचदा कडकडीत वैचारिक वैराग्यामुळे अल्पसंख्यांची बेटे ठरतात. हे “धोक्याचे वळण” शाश्वत शाळेने मोठ्या संवेदनापूर्ण रितीने टाळले आहे.

शाश्वत शाळेत सहावीपासूनची पुढची मुले त्यांच्या मागच्या वर्गाचे वाटाडे बनतात. गतवर्षी त्यांनी जे शिक्षण जगले ते पुढच्या पिढीला पास ऑन करतात. नववीची मुले तर अख्खी शाळा चालवितात. सफाईपासून प्रवेशापर्यंत सर्व विभाग सांभाळतात. मुले वर्गखोल्यांत फारशी नसतातच! शिक्षक म्हणून विषयाचे एक्स्पर्ट येतात, ते बऱ्याचदा शाळेतील मुलांचे पालकही असतात. शाळेला आखीव रचना नाही असे वर वर पाहता वाटते, मात्र तसे नाही….. मुलांना काय शिकवायचे, कसे घडवायचे याचे पक्के आडाखे, पक्की रचना शाळेकडे आहे. मात्र ही शाळा कृत्रीम फुले बनवायचा कारखाना नाही, तर फुले फुलविणारी बाग आहे. इथे मुलांना स्वत:च्या जनुकांप्रमाणे फुलण्याचा अधिकारही आहे, आणि बागेतल्या माती-पाण्याचे उत्तम-आरोग्यमय पोषणाचे आश्वासनही आहे.

शाश्वत शाळेत सुरू असलेले प्रयोग भन्नाट तर आहेतच, पण असे प्रयोग याआधीही झाले आहेत. मात्र ही सारी उदाहरणे का कोण जाणे, दूरस्थ दीपस्तंभ वाटत राहतात. आणखी एक म्हणजे ही उदाहरणे कदाचित ‘पुस्तकात बंदिस्त’ झालेली वाटतात, ‘स्टॅटिक’ वाटतात. मनावर असलेल्या परंपरांचा पगडा हे कारण नक्की असू शकेल, मनाचा दोष म्हणूया हवा तर. या पार्श्वभूमीवर अतुल-अमृता यांच्या शाळेतील “पालकांच्या आकांक्षांचा स्वीकार” थोडा अधिक आश्वासक वाटतो. हळूहळू धक्के देत पुढे जाणं थोडं सोपं वाटतं. आणि दुसरं म्हणजे हा प्रयोग “ऍक्टिव्ह” फेज मध्ये असणं किंवा अतुल-अमृता यांचं “ऑनलाईन” असणं हे ही महत्वाचं आहेच.

शाश्वत शाळेची ओपन सोर्स भूमिकाही अत्यंत आश्वासक आहे. एक कोटीचे हजार, हजाराचे दहा (अधिकाधिक लोकांना प्रशिक्षित केले की प्रशिक्षणासाठी मोजलेले मूल्य दरडोई कमी होत जाईल) म्हणजे काय तर – ‘जे जे आपणासी ठावे, ते ते इतरांसी शिकवावे, शहाणे करुन सोडावे, सकल जन’! ही कॉपीलेफ्ट* विचारसरणी सुंदर आहे.

आजची शाश्वत शाळा अतुल-अमृता यांच्या आधीच्या शाळेचे उत्क्रांत रूप आहे, ‘उत्तम, प्रभावी शिक्षण देण्याची आस’ त्यांच्या आधीच्या शाळेतही होती, आजही आहे, आणि पुढेही राहणार आहे. शाश्वत शाळेच्या रेप्लिका निघणार नाहीत, कारण शाश्वत शाळा स्वतःच बदलत राहणार आहे. ‘गतितील स्थिरता’ किंवा ‘गतिमान संतुलन’ हाच ज्या संकल्पनेचा मूलाधार आहे ती संकल्पना भूमितीश्रेणीने उत्क्रांत होण्याची भरपूर शक्यता आहे.

वेधच्या व्यासपीठावर अतुल-अमृता यांची ही मुलाखत येणे हा मोठाच भाग्ययोग आहे. अवघ्या सदतीस मिनीटांच्या मुलाखतीतून डॉ. आनंद नाडकर्णींनी अतुल-अमृता आणि त्यांची “शाश्वत शाळा” जगासमोर सादर केली. इतकंच नाही तर त्या उभयतांना वेध परिवारात सहभागीही करून घेतले. हा दुहेरी समन्वय मोठा सुरेख आहे.

शाश्वत शाळा अधिक जवळून समजून घेण्यासाठी शाळेचा दोन दिवसांचा एलिमेंटरी कोर्स प्रत्येकाने अवश्य करावा! वेध परिवारात अतुल-अमृता यांचे आगमन अतिशय आनंददायक आहे, ते सर्वांना समृद्ध करणारे ठरो!

-मंदार परांजपे,
कार्यकर्ते,
पेण वेध.

*Copyleft – an arrangement whereby software or artistic work may be used, modified, and distributed freely on condition that anything derived from it is bound by the same conditions.

ही मुलाखत पााहण्यासाठी खालील लिंकचा उपयोग कर….
https://youtu.be/7kDyfXcsbhY

One thought on “अतुल आणि अमृता यांची शाश्वत शाळा

 1. सर्वप्रथम अतिशय सुंदर, समर्पक लेख लिहिल्याबद्दल मंदार सर तुमचे अभिनंदन..
  गोगावले दाम्पत्याचा बंदीशाळा ते संधिशाळा हा प्रवास अत्यंत वेगळा व शाळा या संकल्पने बद्दल नव्याने विचार करायला लावणारा आहे.
  शाश्वत शाळा ही प्रत्येक पालकाला शाळेबद्दल नवीन दृष्टीकोन देते व गोगावले दाम्पत्याच्या बंडखोर स्वभावाचा परिचय करून देते.
  ही शाळा रॅट रेस विद्यार्थी निर्माण न करता अनुभव समृद्ध, प्रयोगशील, निसर्ग प्रेमी व शाश्वत विद्यार्थी निर्माण करत आहे.
  या अनोख्या शिक्षण पध्दतीबद्दल गोगावले दाम्पत्याचे खूप खूप अभिनंदन.

  Liked by 1 person

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: