सूर्य दाखवणारा माणूस ……अतुल पेठे

एखाद्या नटाला, दिग्दर्शकाला आपण त्याच्या नाटकातून, कामातून ओळखत असतोच. कधीमधी झालेल्या गप्पांमधून तो माणूस म्हणूनही किंचित कळला असतो. पण त्याची जीवनदृष्टी समजून घ्यायची असेल (आणि त्याच्या ‘वेडाचे’ धागेदोरे शोधायचे असतील !!) तर डॉ. आनंद नाडकर्णी यांनी घेतलेली त्याची मुलाखतच ऐकायला हवी. अतुल पेठेंची मुलाखत यूट्यूब वर ऐकताना नेमका याचाच प्रत्यय आला. वेध पुणे २०१९ येथील ‘बदल पेरणारी माणसे’ ह्या संकल्पनेतील दुसर्‍या दिवशीच्या सत्रात ते बोलत होते.

अतुल पेठे हे नाट्यकर्मी (नव्हे नाट्यधर्मी!)……….. हाडाचे नाटकवाले. अगदी ठरवून, सिनेमा आणि दूरदर्शन मालिकांकडे पाठ फिरवून, रंगभूमीशी अव्यभिचारी निष्ठा राखलेले. अनेक सामाजिक महत्वाच्या विषयांवर आपली अस्वस्थता नाटकातून व्यक्त करणारे, आणि स्वतःबरोबर प्रेक्षकांना देखील अस्वस्थ करणारे. कधी चळवळीच्या कार्यकर्त्यांना, कधी दूर गावच्या तरुणांना, तर कधी सफाईकामगारांना प्रशिक्षित करून त्यांच्या माध्यमातून नाटकाची चळवळ जिवंत ठेवणारे ‘कलेचे कार्यकर्ते’.

शाळेत असताना अभ्यासाचे आणि आपले गुण न जुळल्याचे ते मोकळेपणाने सांगून टाकतात. आणि मग ‘काहीच जमत नसेल तर नाटक करावे’ ह्या त्या काळच्या विचारामुळे ते नाटकाकडे कसे आकर्षित झाले हेही मिष्किलपणे नमूद करतात. बालपणी पाहिलेल्या नाटकांनी ते भारावून जात, पुढे महाविद्यालयीन काळात कवितांमधून, एकांकिकांमधून ते व्यक्त होत. ‘Chess’ ह्या एकांकिकेसाठी पुरुषोत्तम करंडक स्पर्धेत त्यांना लेखनाचे आणि अभिनयाचे बक्षीस मिळालं आणि त्यांचे आणि रंगभूमीचे पक्के नाते जुळले.

तुकारामांचे अभंग, गाडगे महाराजांचे विचार, र. धों. कर्वेंचे काम ह्या सगळ्याने ते प्रेरित कसे होतात, हे सारे त्यांच्या मुलाखतीतून उलगडत जाते. त्यांच्या बोलण्यामध्ये केवळ त्यांची नाटकं येतात असं नव्हे, तर त्यांनी कालच पाहिलेल्या वेधच्या मुलाखतींमधली माणसं येतात, त्यांनी वाचलेली उत्तम पुस्तकं येतात. एकेका पुस्तकातून ते कसे अंतर्बाह्य बदलून गेले हे ते नोंदवतात. नुसतीच प्रतिक्रिया नव्हे तर प्रतिसाद देणारी त्यांची ही संवेदनशीलता मुलाखतीतून आपल्याला प्रत्ययास येते.

कला म्हणजे काय, परंपरांचा नेमका अर्थ काय ह्या विषयीची त्यांची मतं तर मुळातून ऐकण्यासारखी आहेत. पेठे ह्यांच्या मते नाटक (आणि त्यातही प्रयोगिक नाटक) म्हणजे ‘मला काय येते’ हे दाखवायला नव्हे, तर ‘मला काय येत नाही’ ते तपासण्यासाठी केले जाते. नाटक हा एकमेव व्यवसाय आहे की जो तुम्हाला काही काळापुरती का होईना, दुसरे कोणीतरी ‘होण्याची’ संधी देतो. अपयशाची भीती असताना सुध्दा सतत नवीन प्रयोग का करायला हवेत हयाबद्दलचे त्यांचे समर्थन……. “आपण शाळेत पहिल्या इयत्तेत पहिले आलो म्हणून कायम पहिलीतच बसत नाही ना! दुसरी- तिसरीत जातोच ना?”

मात्र प्रायोगिक नाटकातल्या प्रयोगशीलतेचे (म्हणजे अंधारात उडी मारण्याचे!) कौतुक करताना सुध्दा ते कुठेही व्यावसायिक नाटकांना कमी लेखत नाहीत. जंगलात जशी वेगवेगळी झाडे, निरनिराळी फुले यायला हवीत तद्धत नाटकांमध्ये सुध्दा व्यावसायिक, प्रायोगिक, असे प्रवाह असावेत असे ते आग्रहाने मांडतात. फक्त आपला पिंड प्रायोगिक नाटकवाल्याचा आहे हे ते स्पष्ट करतात. आणि एखाद्या प्रयोगाला चुकून जास्त प्रेक्षक आलेच तर “काहीतरी चुकले की काय!” असा सुखद आश्चर्याचा धक्का बसतो हेही नमूद करतात!!

नाटक (किंवा सिनेमा) ही समूहकला आहे कारण लेखक, दिग्दर्शक, सहकलाकार, पडद्याआडचा चमू ह्या सगळ्यांच्या खांद्यावर ते उभं असतं हे तर ते सुरुवातीलाच मान्य करतात. म्हणूनच मग त्यांची एखादी डॉक्युमेंट्री २० लाख लोकांनी पाहिली, किंवा त्यांच्या एखाद्या नाटकाचे देशविदेशात शंभराहून अधिक प्रयोग झाले असं जेव्हा ते सांगतात तेव्हा तो त्यांचा वैयक्तिक विजय नसतो, तर सर्वांच्या कष्टाला मिळालेली ती पावती असते. त्यात किंचितही प्रौढी नसते.

मराठी नाटकाच्या अगदी सुरुवातीपासून सामाजिक प्रश्न मांडण्यासाठी शारदा (जरठविवाह), कीचकवध (राजकीय बंडखोरी) तृतीय रत्न (जातीव्यवस्था) ही नाटकं प्रवाहात होतीच. त्याच प्रवाहातली एक धारा म्हणजे पेठेंचे ज्योतिबा फुले ह्यांच्यावर आधारित ‘सत्यशोधक’ हे नाटक. (हे पेठे यांनी सफाईकामगारांना घेऊन बसवले होते. त्या अशिक्षित मंडळीमधल्या शीघ्रकवींनी किती समर्पक काव्ये रचली, नटसम्राट सुध्दा त्यांच्यासमोर नतमस्तक कसा झाला हाही इतिहास मनोरंजक आहे).

ज्योतीबांना केवळ माळ्यांचे पुढारी म्हणून सीमित ठेवणे हे फार संकुचित दृष्टीचे आहे. त्यांचे स्त्री शिक्षणातले कार्य किती थोर होते याचा अंदाज आपल्याला त्या नाटकाची छोटीशी क्लिप पाहताना सुध्दा येतो. बापाने चक्क पोत्यामध्ये लपवून छपवून आणलेली चिमुकली जेव्हा पोत्यातून बाहेर येते आणि मोकळा श्वास घेते, तेव्हा प्रेक्षक म्हणून आपलाच श्वास अडतो, भरून येतं…….. त्या काळातल्या स्त्रियांची ती प्रतिकात्मक सुटका पाहून.

लैंगिक शिक्षण, लोकसंख्या नियंत्रण, समाजप्रबोधन या ‘अश्लील कार्या (?!)’साठी स्वतःला वाहून घेतलेल्या र. धों. कर्व्यांनी अडचणीचे काय डोंगर पार केले असतील याची जाणीव ‘समाजस्वास्थ्य’ रंगमंचावर पाहताना झाली होती. आज ती क्लिप पाहताना पुन्हा जागी झाली. आणि आजही अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी चाललेला लढा पाहिला की र. धों. काळाच्या किती पुढे होते हेही नव्याने जाणवले.

‘कचराकोंडी’ (कुंडी नव्हे….. कोंडीच!) ही त्यांची डॉक्युमेंट्री सफाई कामगारांची घुसमट आपल्यासमोर मांडते. हा प्रश्न नीट समजून घेण्यासाठी अतुल सफाई कामगारांसमवेत दीड वर्षे राहिले. आपल्या आसपासच असून सुध्दा पहिल्यांदाच ह्या वर्गाची दुःखे त्यांना इतक्या तीव्रतेने जाणवली. ह्या सहवासाने सर्व मध्यमवर्गीय अहंकार गळून पडल्याचे ते कबुल करतात.

त्यातील कॅमेराचा angle, त्यातील sound effect ही चित्रपटाची परिभाषा डॉक्टर विशद करतात तेव्हा ही technical gimmicks नव्हेत, तर सहज स्फुरलेल्या गोष्टी आहेत हे जाणवते. आणि मग ‘कॅमेरा महत्वाचा पण त्यामागचा माणूस अधिक महत्वाचा’ ह्या विजय तेंडुलकरांच्या वाक्याचा आपल्यालाही प्रत्यय येतो.

डॉक्टर दाभोलकरांच्या मृत्युने हादरलेले पेठे जेव्हा रिंगण नाट्य नावाचा एक अभिनव प्रयोग करतात तेव्हा ते नुसते नाटक नसते…….. पिस्तुलाच्या गोळीला कलेतून दिलेले उत्तर असते. कार्यकर्ते आणि लोकसहभागातून गावोगावी ४०० हून अधिक प्रयोग करत ते दाभोलकरांचा मृत्यू लोकांच्या मनात जिवंत ठेवतात. ‘तू बेचिराख केलेस तरी मी पुन्हा झाड लावेन’ असा तो अदम्य आशावाद आहे.

सिनेमाच्या पडद्यावर माणूस प्रत्यक्षाहून थोर दिसतो, आणि टीव्हीच्या पडद्यावर मात्र खुजा…….नाटकात मात्र पडदा उघडल्यावरच नाट्य सुरू होते, कारण इथे प्रेक्षकांशी थेट संवाद आहे, आणि म्हणूनच ते जिवंत आणि रसरशीत माध्यम आहे. पेठे ह्यांच्या मते ‘अस्वस्थ करणे, झोपलेल्या समाजाला चिमटा काढून जागे करणे’ हीच त्यांची नाटक करण्यामागची मूळ प्रेरणा आहे. म्हणूनच डॉक्टर नाडकर्णी त्यांना ‘अस्वस्थ नाटक पेरणारा माणूस’ असे म्हणतात. त्यांनी केलेल्या मुलाखतीच्या सारांशामधून आपल्याला आपली (म्हणजे सामान्य माणसाची) अस्वस्थता ही स्वकेंद्री का आहे आणि अतुल ह्यांची अस्वस्थता ही कलात्मक सामाजिक भान असलेली आणि म्हणूनच ‘अतुल’नीय का आहे ते कळते.

अगदी खरं सांगायचे तर ‘सूर्य पाहिलेला माणूस’ हे नाटक मी पहिल्यांदा पाहिले तेव्हा ते तितकेसे मनाला भिडले नव्हते. पण मुलाखतीच्या ओघात डॉक्टर नाडकर्णी म्हणाले, ‘ ही सारी बदल पेरणारी माणसे (म्हणजे फुले, कर्वे, सॉक्रेटीस) ही वेध घेत असतात की आपल्यासमोर काय वाढून ठेवलेले आहे…….. आणि त्यासाठीची भावनिक तयारी ते आधीच करून ठेवतात……….. मग तो विषाचा प्याला असो, किंवा सामाजिक बहिष्कार असो, किंवा खोटे खटले असोत’. तेव्हा अचानक ह्या तिघांच्या (आणि अतुल पेठे यांच्याही!) आयुष्यातला, सत्यशोधनाचा आणि निर्भयतेचा हा समान धागा सापडला……. आणि सूर्याचा किंचित कवडसा मलाही दिसला! सूर्याच्या तेजाने आपले डोळे दिपतात. पण तो सूर्य ‘दाखवण्याचे’ काम निष्ठेने करत राहणार्‍या ह्या सर्व जागल्यांना माझा सलाम!

सावनी गोडबोले,
पेण.

अतुल पेठे यांची पुणे वेध २०१९ मधील मुलाखत ‘AVAHAN IPH’ वर जरूर पहा https://youtu.be/qWFyOvad3ps

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: