OUT OF THE BOX- THE FIRST 2020 VEDH

आयुष्यात पहिल्यांदाच एखाद्या कार्यक्रमाला प्रेक्षक म्हणून न जाता Volunteer म्हणून गेलो. त्यामुळे आज कल्याण वेधच्या ‘Out of the Box’ या कार्यक्रमातील या भूमिकेबद्दल उत्सुकता होती. तशी ही निम्न स्तरावरील भूमिका. जशी जमली तशी केली. पण ते महत्वाचे नाहीच आहे मुळी. महत्त्वाचा आहे तो हा कार्यक्रम.

पठडीतील किंवा ठरीव पायवाट सोडून करिअर निवडण्यासाठी मार्गदर्शक ठरलेला असा हा कार्यक्रम. ज्या पाच फॅकल्टीज निवडल्या होत्या त्यावरून हा कार्यक्रम आगळा वेगळा होणार हे जाणवत होते आणि झाले देखील तसेच. डाॅक्टर आनंद नाडकर्णी यांचा मी उपस्थित असलेला पहिलाच कार्यक्रम. त्यामुळे तो देखील एक उत्सुकतेचा भाग होता.

सकाळचा काही वेळ नाट्यगृहाबाहेरची ड्यूटी असल्याने पहिलं निकित सुर्वे यांचं सत्र काही फार ऐकता आलं नाही….पण जे काही थोडंफार कानावर पडलं ते खूप वेगळं होतं.

त्यानंतरची फॅकल्टी म्हणजे रोजी गुप्ता मॅडम. राष्ट्रपती भवन हा त्यांचा पी. एच. डी. चा विषय. त्यांनी नरेंद्र मोदी, अमीत शहा आणि डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्याबाबत जे अनुभव सांगितले त्यामुळे त्या थोर व्यक्तीमत्वांबद्दल बरंच काही समजलं. त्यांनी संसार सुरू झाल्यानंतर आणि दोन मुलांच्या जन्मानंतर हे करियर करायला घेतलं आणि ते तडीस नेलं यासाठी त्या आणि त्यांचे कुटुंबीय निश्चितच कौतुकास पात्र आहेत.

त्यानंतरची फॅकल्टी होते शिवाजी लोटन पाटील. त्यांची जीवनकहाणी खूपच प्रेरणादायी आहे. अगदी शालेय जीवनापासून असलेलं पॅशन उराशी बाळगून प्रतिकूल परिस्थितीतही न डगमगता अगदी छोट्याश्या गावातून मुंबई गाठून लागोपाठ तीन चार Out of the box चित्रपट बनवून चारही चित्रपटांना राष्ट्रीय पारितोषिकं मिळणं म्हणजे काही येरागबाळ्याचे काम नाही.

पुढील सत्र होते मेधा ताडपत्रीकर मॅडम यांचे. इंजिनिअरींगचा गंध नसलेली स्त्री दुस-या इंजिनिअरींगचा गंध नसलेल्या पार्टनरसह प्लास्टीकच्या कचऱ्यातून इंधन आणि वायू निर्मिती करते याला काय म्हणावे! त्यांना देखील अनेक अडचणींचा सामना करावा लागला आणि प्रथम अपयश सोसावं लागलं. पण अथक प्रयत्नांनी त्यांनी खूप मोठं यश मिळवलं. आणखी एक म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर करून सामाजिक बांधिलकी देखील जपली. हे करत असताना कुटुंब, इतर नातेसंबंध आणि भावनिक बाबींना अजिबात अंतर दिले नाही.

शेवटची फॅकल्टी म्हणजे शैलेश परुळेकर. त्यांचा दिवस पहाटे चार वाजता सुरू होतो, कधी कधी तर पहाटे तीन वाजता, आणि स्वारींची पाऊले घराकडे वळतात ती रात्री अकरा वाजल्यानंतर. गेली अनेक वर्षे हा परिपाठ आहेच. तसेच सायकलने non stop return journey – मुंबई – पुणे – मुंबई. आणखी देखील काय काय. त्यांनी अतुल कुलकर्णी यांच्यावर नटरंग साठी घेतलेली मेहनत तर अवर्णनीयच. सर्वात शेवटी त्यांनी एक वाक्य सांगितलं. ते म्हणजे “Day is a miniature of life”. अगदी प्रत्येकाला विचार करायला लावणारं आणि जीवनाचं सारं मांडणारं एकच वाक्य. आपण आपल्या आयुष्यात अजून बरीच वर्षे बाकी आहेत असे गृहीत धरतो. वास्तविक आजचाच दिवस खरा मानून स्वतःसाठी वेळ देणं किती अत्यावश्यक आहे याची जाणीव त्यांनी करून दिली.

आणखी एक नाव घेतल्याशिवाय हा लेख पूर्ण होऊच शकत नाही. कार्यक्रमाचे सूत्रधार श्री. आनंद नाडकर्णी यांनी ज्या ओघवत्या वाणीने मुलाखत घेतली त्याबद्दल काय बोलावे! सलग पाच सत्रं वेगवेगळ्या फॅकल्टीज बरोबर अगदी हसत खेळत रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकणारं त्यांचं संयोजन होतं.
आता लवकरच पेण संमेलनात त्यांच्याशी जवळून संवाद साधण्याची संधी मला आणि इतरांना देखील मिळणार आहे हे आमचं परम भाग्यच आहे.

आणखी एका बाबीचा उल्लेख करावाच लागेल. तो म्हणजे प्रत्येक फॅकल्टीशी संवाद साधण्यापूर्वी जी पाच वेगवेगळी आणि नविन गीते सादर केली गेली त्यांचे गीतकार स्वत: डॉ. सादर करणारा संपूर्ण चमू यांचे कौतुक करावेच लागेल. गीतकारांचे विशेष अभिनंदन.

हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्या इतर सर्वांनी गेले अनेक आठवडे परिश्रम घेतले त्यामुळेच हा कार्यक्रम नजर लागण्याजोगाच झाला. यात माझा अगदीच खारीचा वाटा होता. पण तरीही मला खूप बरं वाटलं आणि दिवस सार्थकी लागल्याचं समाधानही वाटलं.

शरद दिवेकर,
कल्याण
70457 30570

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: