राजीव तांबे समवेत वेध कट्टयावर हास्यकल्लोळ!

९ व्या वेधकट्टयावर राजीव तांबे बरोबर गप्पांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. शिल्पा चौधरी हिने अतिशय ओघवत्या शब्दांमध्ये राजीव तांबेचा परिचय करून दिला, तर प्रदीप कुलकर्णी यांनी वेध आणि वेधकट्टयाविषयीची माहिती दिली.

मुलाखतीची सूत्रं माझ्या हाती आली आणि मी औपचारिकता बाजूला ठेवून राजीव माझा अनेक वर्षांपासूनचा मित्र असल्यानं अरेतुरेच्या संबोधनानंच गप्पांना सुरुवात केली. साहित्य अकादमीच्या मानाच्या पुरस्काराने सन्मानित झालेला, २३ जागतिक भाषांमध्ये पुस्तकं अनुवादित झालेला आणि १०० च्या वर पुस्तकं प्रसिद्ध असलेला हा लेखक सकारात्मक आयुष्य जगणारा आहे. मुलांमध्ये मूल होऊन जगणारा हा मित्र असून कुठलेही उपदेश न करता, अतिशय खेळकर पद्धतीनं तो पालकांची, शिक्षकांची शाळा घेतो.

राजीव तांबे हा गणित, विज्ञान या विषयांना घाबरणारा, शाळा नको वाटणारा, शाळेची पुस्तकं विकून मजा करणारा …हाच मुलगा मोठा होऊन गणित आणि विज्ञान या विषयावर लिहितो आणि एवढ्यावरच थांबत नाही, तर शिक्षकांसाठी, पालकांसाठी, मुलांसाठी कार्यशाळाही घेतो. युनिसेफसारख्या आणि ‘प्रथम’ सारख्या जागतिक स्तरावर काम करणार्‍या संस्थांबरोबर कामही करतो ही किमया कशी घडली याचं उत्तर राजीवनं त्याच्याच खास शैलीत दिलं. शिवाय गणिताच्या बाबतीत ९८१ भागिले ९ या गणितानं कसा धुमाकूळ घातला याच्या गमतीजमती सांगितल्या. इतकंच नाही तर ‘सजीवनिर्जिव’ हा तिसर्‍या वर्गात असलेला पाठ शिकवताना शिक्षकांची जी भंबेरी उडाली ते किस्सेही त्यानं सांगितले.

रोज नियमित लिखाण करणारा राजीव खरं तर एक साधा इलेक्ट्रिशियन! मात्र त्याच्या जिद्दी स्वभावानं त्याला शिक्षणतज्ज्ञ करून सोडलं. सोप्या पद्धतीनं खरं आनंददायी शिक्षण कसं असू शकतं याचे पाठ त्यानं शिक्षक आणि पालक यांना दिले. त्याच्या गंमतशाळेत मुलं रमू लागली. पालक आपल्या मुलांच्या बाबतीत कसे आततायीपणा करतात याचेही अनेक किस्से राजीवनं सांगितले. मुलांच्या मनातले प्रश्न आणि त्यांच्यातली निरागसता त्यानं उलगडली. त्याचबरोबर मुलांच्या बाजूने भक्कमपणे उभा राहणारा हा बालसाहित्यिक श्रोत्यांनाही प्रचंडच भावला. कारण दीड तास नॉनस्टॉप वेधकट्ट्यावर हास्याचे कारंजे उडत होते. अखेर तर श्रोत्यांनी पोट धरून हसायला सुरुवात केली.

राजीव तुझी पुढली स्वप्नं काय, असा गंभीर प्रश्न विचारताच राजीवनं मला भूत व्हावंसं वाटतं, हेच माझं स्वप्न असल्याचं सांगितलं. भूत कुठेही जाऊ शकतं, त्याला रांगेची गरज नाही, त्याला स्वतःच्या वजनाची चिंता नाही आणि वाट्टेल ते करता येण्याची मुभा असल्याचं तो म्हणाला. त्याच्या नव्यानं आलेल्या आणि विवेक प्रकाशनानं प्रसिद्ध केलेल्या १० पुस्तकांच्या सेटबद्दल त्यानं कल्पना दिली. ही पुस्तकं शिशूवर्गासाठी असून रंगीत आणि चित्रमय आहेत. काल ५०० रुपयांचा संच सवलतीच्या दरात ४०० रुपयांना मिळाला.
कार्यक्रमाच्या शेवटी मिसेस पळशीकर यांनी कार्यक्रमाच्या लाईव्ह आठवणीदाखल सुरेखशा फोटोफ्रेम्स भेट दिल्या. ज्योतीने नेहमीप्रमाणे अतिशय सुरेख शब्दांत आभार मानले. राजीवला सगुण म्हणावं का निर्गुण हा प्रश्न पडल्याचं ती म्हणाली. राजीव तांबेमधली मीश्किली तिनं दाखवली.

कालच्या कार्यक्रमाला धनू, मंजू, नीतीन रानडे, अरूणा देशपांडे, अप्पा, मधुरा, श्रुतीसह नेहमीप्रमाणेच अनेक रसिक दर्दी श्रोत्यांची उपस्थिती होती. मराठी पाठ्यपुस्तक मंडळाचे माजी संचालक वसंत काळपांडे आवर्जून वेधकट्टयावर उपस्थित होते.
कालचा वेधकट्टा सुरूवातीपासून ते शेवटपर्यंत हास्यमैफिलीत रंगून गेला होता. ते हासू चेहर्‍यावर घेऊन सगळ्यांनी पुढल्या महिन्यात भेटू म्हणत निरोप घेतला.
(मॅक्स महाराष्ट्रने वेधकट्टयाचं फेसबुक लाईव्ह केलं, तर सुरेखसे बोलके फोटो वेधची वृंदा आणि गीता यांनी काढले. सुनीलने माझ्यापर्यंत पोहोचवले. या सगळ्यांचेच मनापासून आभार.)

दीपा देशमुख, पुणे.
adipaa@gmail.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: