माइंड फेस्ट नव्हे माइंड फीस्ट

            तारीख १३, १४, १५ डिसेंबर २०१९. डिसेंबर महिन्यातला दुसरा शनिवार, रविवार! सालाबाद प्रमाणे, खरं तर या आय. पी. एच च्या “ठाणे वेध” च्या तारखा असायच्या. पण या वर्षीचा वेध काही वेगळंच स्वरूप घेऊन अवतरला होता. दोन दिवसात मिळून सरासरी वीस कर्तृत्ववान व्यक्तींच्या मुलाखतींऐवजी एकटे दस्तुरखुद्द डॉ. आनंद नाडकर्णी तिन्ही दिवस संध्याकाळचे तीन तास निरूपण करणार होते. गेली आठ – दहा वर्षे त्यांनी जो वेदांतांचा अभ्यास केला आणि डॉक्टर म्हणून अनेक वर्षे मानसशास्त्राची, मनोविकारशास्त्राची आणि मनोविकासशास्त्राची प्रॅक्टिस केली, त्या सगळ्यांचा एकत्र परिपाक असलेला डोळसपणे आखलेला “या जगण्याचं करायचं काय?” या मनाची समजूत कशी घालायची?” या विषयावरचा “माइंड फेस्ट” हा कार्यक्रम.

            १३ तारखेला शुक्रवारी संध्याकाळी ट्रॅफिकचा सामना करत जरा उशिराच शिव समर्थ  विद्यामंदिराच्या मैदानावर पोचलो. संपूर्ण भरलेलं प्रेक्षागार, आणि समोर भव्य रंगमंच. होय. व्यासपीठाची मधोमध स्थापना केलेला रंगमंचच तो. फक्त वक्ता आणि प्रेक्षक यांच्या मध्ये पडद्याचा अडसर नाही. डावीकडे साधी गवताची झोपडी. बाहेरच्या कोनाड्यात पणती तेवत असलेली. झोपडीपुढे तुळशी वृंदावन, त्यात सुंदर तुळस. उजव्याबाजूला भव्य अश्वत्थ वृक्ष. त्याच्या शेजारी ज्ञानेश्वरांचा “पैसाचा खांब”. वर छत नाही. मागे स्क्रीनवर निळा जलाशय आणि निरभ्र आकाश. पूर्ण देखावा आणि प्रकाश योजना मनात शांत, सात्विक भाव जागवणारी. जोडीला बासरीचे स्वर आणि उदाधुपाचा वास!!

            डॉ. नाडकर्णींनी विनम्र भावे प्रेक्षकांना वंदन करून शांतीमंत्र आणि ॐकाराने सुरुवात केली, आणि प्रेक्षक मनाच्या उत्सवात केव्हा रंगून गेले, ते त्यांना ही कळले नाही. मेंदू, मन आणि शरीर… विचार, भावना, वर्तन… मानसशास्त्रज्ञांनी वर्षानुवर्षे प्रयोग करून शोधून काढलेले सिद्धांत डॉक्टरअत्यंत सोप्या भाषेत समजावून सांगत होते. बरोबर हीच तत्वे थेट वेदांपासून, उपनिषदांपासून, गीतेपासून, संत साहित्यातील अभंगांपर्यंत; ज्ञानेश्वर आणि विनोबांपर्यंत अनेक जणांनी कशी लिहून ठेवली, याचं अनेक उदाहरणांसह निरुपण करत होते.

            आदिमानवापासून प्रगतमानवापर्यंत आणि प्रगतमानवापासून उन्नतमानवापर्यंत आपला भावनिक आणि बौद्धिक प्रवास कसकसा होत गेला हे मेंदू विज्ञान, मानस शास्त्र, शरीर शास्त्र, जगभरातील विविध धर्मातल तत्वज्ञान आणि अध्यात्मिक ग्रंथ, यांचा आधार घेऊन; जगभरातील थोर, अधिकारी व्यक्तींची वचने उर्धृत करत, त्यांचा अर्थ उलगडून सांगत स्वतः रंगून गेलेल्या डॉ. आनंद यांनी श्रोत्या प्रेक्षकांना रमवल, खिळवून ठेवलं.

            ते फक्त सांगत नव्हते. शिकवत होते. सहभागी करून घेत होते. कित्येक अभ्यासक तरुण तसच वयोवृद्ध प्रेक्षक स्त्री पुरुष आपापल्या वहीत, मोबाईल मध्ये हे सगळं साठवून घेत होते.

            ८० मिनिटांच्या सलग निरूपणानंतर मध्यंतर झालं, तेव्हा सर्वांच्याच मनात त्या भारलेपणातून, त्या निर्मळ आनंदातून बाहेर येऊ नये, असं होतं तर तीन तास झाल्यानंतर शेवटी शांतीमंत्र म्हणताना सगळे स्तब्ध, मूक, नि:शब्द होत असू.

            त्या तीन दिवसात आम्हाला कोण कोण नाही भेटले? मनू:स्मृती मधला मनू, डार्विन, फ्रॉइड, अल्बर्ट एलिस, थोरो, सॉक्रेटीस, ऍरीस्टॉटल, कार्ल युंग हे तर होतेच पण आमच्या परिचयाचे असे महात्मा गांधी, विनोबा भावे, आंबेडकर, कुमार गंधर्व, ब्रायन लारा, सचिन तेंडूलकर, अशी किती तरी उन्नत व्यक्तिमत्वे, त्यांचे उदात्त विचार ऐकायला मिळाले आणि समजावून दिले गेले. शिवाय आपली ज्ञानोबा माऊली, तुकोबा, गाडगे बाबा, बहिणाबाई, अशी यत्चयावत संत मंडळी तर ठायी ठायी भेटली. वारंवार गीतेतले अर्जुन – श्री कृष्ण भेटत होते. आम्ही नेहेमी म्हणत आलो, त्या श्लोकांचे स्तोत्रांचे अर्थ उलगडत होते.

            तिसऱ्यादिवशी तर आमच्या नेहेमीच्या जगण्यातल्या प्रोब्लेम्सकडे कसं बघितलं पाहिजे, याचं सुंदर मार्गदर्शन मिळालं आणि श्रोते धन्य झाले. तिन्ही दिवस अक्षरशः गणितातल्या चढत्या भांजणी प्रमाणे (२,४,८,१६,३२) या मनोमेजवानी (माइंड फीस्ट) ची रंगत वाढत गेली. शास्त्रज्ञ आणि तत्वज्ञ यांचे सिद्धांत समजावून सांगताना आजच्या सामाजिक आणि राजकीय परिस्थितीवर नर्म विनोदी शैलीमध्ये जे भाष्य सूचक शब्दात डॉ. नाडकर्णी करत होते, आणि उपस्थित जाणकार श्रोतृ वर्ग हसून दाद देत होते, हा ही एक समसमासंयोग प्रत्यक्ष अनुभवण्यासारखा!

या तीन दिवसांमध्ये हे मनावर ठसलं की आपण,आपलं मन हे सध्या कोणत्या स्थितीत आहे ,आदिम भावनावस्था,प्रगत भावनावस्था, की प्रगल्भ भावनावस्था यावर सतत लक्ष ठेवायचं ,आणि जाणीव पूर्वक शक्यतो ,उन्नत भावावस्थेकडे जाण्याचा प्रयत्न करायचा .’मी’ कडून ‘आम्ही’कडे आणि ‘आम्ही’ कडून ‘आपण सर्व’ या भावनेकडे जायचं.आपलं मन जितकं समतोल स्थितीत राहील ,तितकी आपली वाटचाल सुकर होईल. जितके आपण व्यक्तीकडून समष्टीकडे जात राहू,तितके ‘अवघे धरू सुपंथ’ हे साध्य होईल.

तिसऱ्या दिवशी शांतीमंत्र होऊन कार्यक्रम संपला, तेव्हा दोन्ही हात जोडून श्रोतृवृन्दापुढे विनम्रभावे उभ्या राहिलेल्या निरूपणकाराच्या डोळ्यात अश्रू होते आणि रंगून गेलेल्या श्रोत्यांना टाळ्या वाजवण्याचे ही भान नव्हते. काही क्षणानंतर वास्तवाची जाणीव झालेल्या श्रोत्यांनी उभे राहून, मनाची तृप्ती होई पर्यंत, टाळ्यांचा कडकडाट केला.

            जवळपास साडेतीन हजार श्रोत्यांनी तीन दिवस रोज तीन तीन तास कार्यक्रमाचा आनंद घेतला. अक्षरशः पिन ड्रॉप सायलंस म्हणतात तशी शांतता असायची. काही वर्षांपूर्वी आनंद विनायक जातेगावकरांनी संत तुकारामांचे पाच अभंग घेऊन त्यावर सद्यस्थितीवर निरुपण करणारे नाटक लिहिले होते “ज्याचा त्याचा विठोबा” आणि स्टेजवर सलग तीन तास सादर करायचे कसलेले रंगकर्मी- सदाशिव अमरापूरकर. ते नाटक पाहताना असाच तृप्तीचा आनंद प्रेक्षक अनुभवत असत. त्या नंतर कित्येक वर्षात असा तृप्त करणारा निरूपणाचा आनंद अनुभवला नव्हता. आपल्याच पूर्वजांनी लिहून ठेवलेलं लाख मोलाचं तत्वज्ञान आहे, अध्यात्मिक ग्रंथ आहेत. पण सध्या आपण सगळं विसरलो की काय असं वाटत असताना, जेव्हा असे कार्यक्रम घडवून आणले जातात, तेव्हा, अंधारात कुणीतरी लामणदिव्याचा प्रकाश दाखवल्यासारखं वाटतं.

            “सुदृढ मन सर्वांसाठी” चा वसा घेऊन समाजासाठी वाटचाल करणाऱ्या डॉ. आनंद नाडकर्णी यांनी माइंड फेस्टच्या रूपाने मोठा पल्ला गाठलेला आहे. वेध संमेलनाची जशी वेध चळवळ झाली, तसं या माइंड फेस्टचं हे व्हावं अशी शुभेच्छा मी व्यक्त करते.   

-सुनंदा अमरापूरकर

ज्यांना कार्यक्रमाला प्रत्यक्ष उपस्थित नाही राहता आले आणि जे पुन्हा कार्यक्रमाचा आस्वाद घेऊ इच्छितात त्या सर्वांसाठी माइंड फेस्ट आता ‘आवाहन आय. पी. एच.’ या यू ट्यूब वाहिनीवर दर आठवड्याला एक सत्र असा प्रसिद्ध होणार आहे.. पहा त्याची झलक…..
https://youtu.be/IVGcnNwmWUI

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: