मी माझा वेध घेताना……….

नवीन वर्ष उजाडलं की नवीन संकल्प सुरु होतात. काही संकल्प टिकतात तर काही उत्साहाच्या भरात केलेले गळून जातात. अर्थात मी काही नवीन वर्षासाठी संकल्प करणारी नाहीये पण जसे आपण सगळेच कोणासाठीतरी काही ना काही करण्याची इच्छा मनात ठेवून असतो तशीच माझ्याही मनात इच्छा असते नेहमी. त्यामुळे मी काही ना काही करत राहते. थोडंफार सामाजिक भान मनात ठेऊन आपण काही ना काही करत राहतो. पण त्याच बरोबर मी माझ्या आजूबाजूच्या सगळ्यांना सांगत असते की अमुक ठिकाणी मदत करा, मी स्वतः पाहून आलेय, अगदी genuine आहे वगैरे वगैरे ….. यामुळे काय होतं की आजूबाजूच्या सगळ्या लोकांना “अरे ही  तर सॉलिड आहे” असं आपलं जाम  कौतुक वाटायला लागत. आपल्यालाही मग आपल्याबद्दल भारी वाटायला लागत…… असच अर्ध पाऊण वर्ष सरतं आणि सप्टेंबर पासून “वेध “ चा season सुरु होतो. पुणे, नाशिक, नगर…… आणि मग माझी जमिनीवर राहण्याची process  सुरु होते. 

“वेध”च्या माध्यमातून भेटणारी माणसं ऐकली, पाहिली की मग आपण जे करतोय ते काहीच नाहीये ही जाणीव व्हायला लागते. लक्षात येतं की ही खरी ‘समाजाचं देणं देणारी, वेगळा विचार करून सातत्याने त्या विचारांचा पाठपुरावा करणारी  माणसं’. यांचे अनुभव ऐकले की कळतं की आपल्याला काही हे जमलं नसतं बुवा ….. पण अगदी आपल्यापुरता विचार करतानासुद्धा आपण काही गोष्टी मात्र करू शकतो ते जाणवायला लागतं. मग घरातलं कपाट पाहिलं की अंशू गुप्ताच, “तुमच्या घरातल्या कपाटामध्ये रस्त्यावर राहणाऱ्या अनेक लोकांचे कपडे आहेत” हे वाक्य माझ्या मनात घोळत राहत, आणि मी जोरदार आवराआवरी करून ते कपडे त्या-त्या माणसांपर्यंत पोहोचवते.  एक सामान्य व्यक्ती म्हणून जगताना या लोकांकडून मी काय-काय शिकू शकते? याचा विचार मग सतत माझ्या मनात राहतो. लहान-लहान गोष्टी करत आपण या व्यक्तीच्या कामात आपला खारीचा वाटा उचलू शकतोच ना? 

पर्यावरणासाठी काम करणारी जाधव पायांग यांच्यासारखी अनेक व्यक्तिमत्व आपल्याला वेध मधून भेटतात. पर्यावरणाविषयी आस्था बाळगणाऱ्यांमुळे आपल्यात जाणीव जागृती झाली तरी खूप झालं. प्लास्टिक बंदी सारख्या गोष्टी मग मी काटेकोरपणे पाळण्याचा प्रयत्न करते.

संतोष गर्जे सारखी प्रतिकूल परिस्थितीतून बाहेर पडत, आपल्याबरोबर अशाच इतरांनाही यातून बाहेर काढणारी माणसं ग्रेटच. संतोषला भेटल्यावर आम्ही मैत्रिणींनी बीडला जायचं ठरवलं. एक पूर्ण दिवस सहारा मध्ये या मुलांबरोबर आम्ही घालवला. समाजाचं मागासलेपण, गरीब-श्रीमंत यातली दरी, शोषण, या सगळ्यामुळे या मुलांवर अशी वेळ येते आणि अशा समाजाचा आपणही एक भाग आहोत हा विचार आपल्याला अस्वस्थ करत राहतो. यानंतर आम्ही मैत्रिणी जाणीवपूर्वक काही गोष्टी करतोच आहोत . 

वेगळा विचार करणारी वेध मधली माणसं आपल्याला थक्क करून टाकतात. वेगळा विचार सुचणं ही तर जन्मजात मिळालेली देणगीच असते मला वाटत. नुपुरा – जान्हवी यांचं Bleewatch …. किती सुंदर कल्पना आणि किती चांगला विचार….   

दिशा शेख,  बिंदुमाधव खिरे यांच्यासारखी वास्तवाचा स्वीकार करणारी आणि त्यासाठी लढा देणारी व्यक्तिमत्व तर आपल्याला अंतर्मुख करून जातात. लहान-सहान गोष्टींचा स्वीकार करताना आपली असणारी अस्वस्थता मग या व्यक्तींमुळे कमी व्हायला लागते.

समाजातल्या अशा व्यक्तींना शोधून समाजापुढे आणणं  हे वेध टीमचं काम ग्रेटच. सतत स्वतःमध्येच गुंतून पडणाऱ्या  आपल्यासारख्यांना हे भान देण्याचं काम “वेध”  सातत्याने आणि निरंतर करत आलंय. प्रत्येक सत्राचं  मर्म अगदी नेमक्या शब्दात पोहोचवण्याचं डॉक्टर नाडकर्णी  यांचं कसब म्हणजे दुधात साखरच.  वेगवेगळ्या वेध सेंटर्सना जेव्हा मी जाते तेव्हा तिथल्या कार्यकर्त्यांचं dedication पाहून नवीन ऊर्जा मिळत राहते आणि मग वेधच्या या उपक्रमात आपणही सहभागी आहोत याचा आनंद द्विगुणित होतो.

वैदेही भिडे 
9820099787
Vaidehi.bhide@gmail.com 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: