नगर वेध २०१९

आय. पी. एच संस्थेचा वेध म्हणजे मुळातच अर्थपूर्ण , ऊर्जादायक संवादाची मैफल. जीवनात संघर्ष करून यशस्वी ठरलेल्या गुणी, मेहनती व्यक्ती, जेव्हा त्यांचे अनुभव, स्वतः प्रेक्षकांसमोर मोकळेपणाने सांगतात, तेव्हा ऐकणारा प्रेक्षक जणू नकळत एका अनोख्या ऊर्जातरंगाने प्रफुल्लित होऊन, स्वतःला काय करावंसं वाटतं आहे, काय करायला आवडेल, काय करता येईल, याचा विचार करू लागतो. 

नगर वेधचे हे चौदावे वर्ष . या वर्षीची थीम होती “नो एक्सक्यूझेस – नो सबबी” – न हरता, न थकता, न थांबता. 

I I सबबी सुंदर लोभसवाण्या, मनाभोवती घालती पिंगा I I
I I कशी मिळावी दिशा उद्याची, सुरु जोवरी यांचा दंगा I I 

पहिल्या सत्राची सुरुवात या खणखणीत वेध गीताने झाली. दीड मिनिटांची पाहुण्यांची ओळख करून देणारी सुंदर ध्वनी चित्रफीत दिसली .आणि स्टेजवर आली “राखी कुलकर्णी ”. एखाद्या ‘नाजूक, सुंदर, लोभसवाण्या’ कॉलेज कन्येसारखी वाटणारी राखी, ‘ प्लास्टिक मुक्तीबद्दल’ जनजागृती करण्यासाठी वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस सलग भारताच्या सर्व राज्यात एकटी फिरली, ही गोष्टच खरंतर चकित करणारी! पण प्रत्यक्षात तिचे अनुभव ऐकताना तिच्यातली जिद्द, हिंमत, आत्मविश्वास आणि जगाच्या चांगुलपणावरचा विश्वास, यांनी प्रेक्षक भारावून गेले. 
स्वतःच्या डोळ्यांनी जग बघितल्याचा अनुभव माणसाला संपन्न बनवतो. जगात वाईटापेक्षा चांगले लोक जास्त आहेत. या भ्रमंतीनंतर, मनातले अनेक भ्रम दूर झाले आणि ती अधिक नितळपणाने लोकांमध्ये मिसळू लागल्याचं राखीने सांगितलं. 

दुसरे सत्र … पुन्हा एक मनात घोळत राहणारं वेध गीत…. 

I I मन की धुन में मगन रहो तो, सुख दुख से क्या लेना देना I I
I I घनी रात या नया सवेरा, आसमान को बस हैं छूना I I
I I अपनी धुन में मगन ही रहना…. I I 

दीड मिनिटांची परिचय चित्रफीत आणि स्टेजवर आले श्री. प्रदीप देवकुळे – भारत सरकार च्या ‘ मिशन मंगल’ आणि ‘चांद्रयान – २’ मध्ये सहभागी झालेले शास्त्रज्ञ. मुळचे नगरचे रहिवासी असलेल प्रदीप देवकुळे यांना, मुलांच्या आणि मोठ्यांच्या मनातले अनेक कुतूहल प्रश्न विचारत डॉ. नाडकर्णींनी बोलतं केलं. नगर जवळच्या भिंगार गावात शिकलेला मुलगा इसरो सारख्या आंतरराष्ट्रीय अंतराळ संशोधन केंद्रात काम करून आपला वेगळा ठसा उमटवू शकतो, हे उमजल्याने मुलांच्या मनातला हुरूप कितीतरी वाढला असेल. 
प्रामाणिकपणे, मन लावून कष्ट केले तर त्याचे चांगले फळ मिळतेच. कोठेही राहिलं, तरी साधेपणाने, कुटुंबीय आणि जन्मभूमी यांना न विसरता राहिले पाहिजे. आपले निर्णय, योग्य विचार करून स्वतःच घ्यावेत. फक्त पैसा, हे करीयरचे ध्येय असता कामा नये. अशा अनेक गोष्टी या संवादातून स्पष्ट झाल्या. 

तिसरे सत्र …. आणखी एक सुस्वर वेध गीत….

I I कुंपणे तोडुनी सारी , विरघळून गेले काही I I
I I काळाने द्यावी दाद, हा हट्ट ही धरला नाही I I 

अमिरकेत शिकल्यावर, भरपूर पैसे मिळवून देणारा जॉब आणि व्यवसाय सोडून, स्वतःच्या मूळ गावी, म्हणजे म्हसवडला परत आलेले आणि स्वतःच्या गावातल्या, तळागाळातल्या समाजातले गुणी खेळाडू निवडून त्यांना प्रशिक्षित करून ‘माण देशी चॅम्पिअन्स’ घडवणारे प्रभात सिन्हा स्टेजवर आले.
सोबत होती, जनावरांमागे धावता धावता राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय मॅरेथॉन मध्ये पदके मिळवणारी वैष्णवी सावंत आणि दुधाचे रतीब घालता घालता,नॉरवेचा ‘आयर्न मॅन’ झालेला अभय केळकर. त्यांचे अनुभव ऐकताना, प्रेक्षक एकाच वेळी अचंबित आणि रोमांचित होत होते. या तरुणांचे धाडसी अनुभव आणि डॉ. नाडकर्णींची अवखळ संवादशैली, या मुळे हे सत्र विशेष रंगले. ‘मेंदू, मन आणि मनगट यांच्या एकरूपतेमुळे तुम्ही कोणतेही अचाट वाटणारे साहस सुद्धा करू शकता’, हे अभय केळकरचे वाक्य प्रेक्षकांच्या मनावर जादू करून गेले. 

मध्यंतरानंतर सुरु झाले चौथे सत्र … चौथे वेध गीत… 

I I मानमान्यता सुखसुविधांची आली झालर रुबाबदार, ध्यास उरातील तरी ना संपे, देत रहाव हाच विचार I I
I I कसे होतसे वादळ शहाणे,चला घेऊया त्याचा शोध,मने फलवतो, प्रेरक होतो, अंतरातला प्रकाशझोत I I 

स्टेजवर आपल्या नहमीच्या पारंपारिक नऊवारी साडी आणि नथ घालून आल्या, संपूर्ण जगातल्या कर्तबगार महिलांमध्ये समावेश झालेल्या कोंभाळणे गावातल्या बीजमाता, राहीबाई पोपेरे. त्यांच्या साध्या सुंदर ग्रामिण भाषेत त्यांनी ‘जुने ते सोने’ समजून त्याची नव्याशी सांगड कशी घालावी, हे छान समजावून दिले. शेतीमध्ये शिरलेलं हायब्रीडचं भूत उतरवायला त्यांनी प्रथम एकटीने पदर खोचून आणि नंतर गावच्या महिलांना एकत्र करून, पुढे चक्क देशी बियाणांची बॅंक कशी सुरु केली, हे सांगितलं. आयुष्यात शिक्षणाची संधी न मिळालेल्या राहीबाईंकडे दशी विदशी विद्यापीठातले विद्यार्थी शिकायला येतात आणि राहीबाई त्यांना शिकवतात, हे सगळं ऐकून प्रेक्षक थक्क झाले. 

त्यानंतर पाचवे आणि अखेरचे सत्र सुरु झाले… 

I I लाभले आम्हास भाग्य, बोलतो मराठी I I
I I जाहलो खरेच धन्य, ऐकतो मराठी I I 

सर्व माणसांच्या मनातलं मराठीपण जागं करणाऱ्या मराठी अभिमान गीताच्या पार्श्वभूमीवर संगीतकार कौशल इनामदार स्टेजवर आले आणि त्यांनी गाण्याबद्दलच्या गप्पांनी वातावरण मोहरून टाकलं. सव्वा वर्ष जे गाणं तयार करायला घालवलं, देशभरातले ५०० च्या जवळपास लहान मोठे गायक – वादक यांच्याकडून गाऊन घेताना, कोणत्या अडचणींना तोंड दिलं, पण अखेर पूर्ण जगातल्या मराठी माणसांच्या मनात ते गाणं जाऊन बसलं आणि आर्थिक अडचण आली तेव्हा लोकांनीच मोठा निधी जमा करून दिला.. स्वतः संगीतकार होऊ असं त्यांना शिक्षण पूर्ण होईपर्यंत वाटलच नव्हतं. अशा अनेक गमती जमती या व्यासंगी संगीतकाराने सांगितल्याच आणि मध्ये मध्ये सुस्वर गाणीही गायली … सत्र संपताना प्रत्यक्ष संगीतकारासमवेत विद्यार्थी , पालक, आमंत्रित… सगळे प्रेक्षागृहच 

I I हीच आमुची प्रार्थना अन हेच आमुचे मागणे I I
I I माणसाने माणसाशी माणसासम वागणे I I 

या प्रार्थनागीतात मुक्तकंठाने सामील झाले आणि ‘नगर वेध २०१९’ वेगळ्याच उंचीवर पोहोचला. 

प्रत्येक सत्रात डॉ. आनंद नाडकर्णींची संवाद शैली अनुरूप पद्धतीने सुयोग्य रूप घेत होती. कधी खेळकर, कधी गंभीर, कधी अवखळ – मिश्किल, तर कधी विनोदी. पण प्रत्येक मान्यवराशी संवाद त्यांनी ‘नो एक्सक्यूझेस, नो सबबी’ या घोषवाक्यावर ज्या पद्धतीने आणला, ते कौशल्य अप्रतीम! डॉक्टरांचा स्टेजवरील प्रसन्न वावर आणि प्रगल्भ रसपूर्ण विवेचन यामुळे वेधचे प्रत्येक सत्र प्रेक्षकांसाठी आनंदानुभव ठरला. 

२०१९ पासून सुरु झालेली , नेमक्या शब्दात मान्यवरांची ओळख करून देणाऱ्या ध्वनिचित्रफिती ही नगर वेधची एक चांगली प्रथा. कोणत्याही सबबी न सांगता, न थांबता, न थकता, न हरता, आपल्या ध्येयाकडे चालत रहायचं, हा विचार उपस्थित प्रेक्षंकाना प्रभावीपण समजल्याचे ते सांगतात. या व्यतिरिक्त इतरही अनेक सदविचार या मुलाखतींतून व्यक्त झाले. 
● जी गोष्ट व्हावी असं आपल्याला वाटतं, ती इतरांनी करावी म्हणून न थांबता, स्वतःच सुरुवात केली पाहिजे. 
● संकट प्रसंगी स्वतः निर्णय घेऊन खंबीरपणे निभावले पाहिजेत. 
● सद्हेतूने केलेल्या प्रयत्नांना आपोआप लोकांची साथ मिळते. 
● आपण जीवनात जे कर्तृत्व करतो, यश मिळवतो, यात आपले जन्मदाते आणि कुटुंबीय यांचा महत्वाचा वाटा असतो, हे लक्षात ठेवले पाहिजे. 
● साहस करावं, पण सावध विचार आणि तयारी करूनच. 

पाचही सत्रांचा विचार केला तर एक समान सूत्र मिळते. तुम्ही कतीही लहान असा, तमचं राहण्याचं ठिकाण कोणतंही असो, तुमच्यापाशी पैसा किंवा साधने कमी असोत, परंतु निश्चय, मेहनत आणि प्रामाणिक प्रयत्न यांच्या जोरावर, तुम्हाला यश मिळतेच मिळते आणि त्यातून मिळणारे समाधान तुमचे जीवन समृद्ध करते. 

अशा रीतीने ‘माणसाने माणसाशी माणसासम वागणे’ या सुंदर गीताचे स्वर मनात घेऊन प्रेक्षक माउली सभागृहाबाहेर पडले, आणि ‘नागर वेध २०१९’ ची सांगता झाली . 

– सुनंदा अमरापूरकर

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: