सप्टेंबर पासूनच वेधचे वेध सुरु होतात. यावर्षी सप्टेंबरमध्ये नाशिकचा वेध संपन्न झाला आणि काल रविवारी १७ नोव्हेंबरला अहमदनगरचा वेध संपन्न झाला. नेहमीसारखी या रविवारची पहाट आळसावलेली नव्हती. पहाटे साडेचारला उठलो कारण रात्री पासूनच वेध लागले होते अहमदनगर वेधचे ! सुनील बरोबर साडेपाचला गाडी घेऊन दारात हजर झाला आणि मग डॉक्टरांना (आनंद नाडकर्णी) घेण्यासाठी पत्रकार नगरमधील बाबाच्या (अनिल अवचट) घरी, तेथून प्रवास सुरु झाला नगरच्या दिशेने. वाटेत गप्पा –टप्पा सुरु असतात, ७ -७.१५ ची वेळ- डॉक्टर सुनीलला एका हॉटेलकडे गाडी वळवण्यास सांगतात. डॉक्टर मला माहिती देतात, कानिफनाथची (हॉटेल) मिसळ तात्यांना (सदाशिव अमरापूरकर) फार आवडायची. आम्ही अनेक वेळा येथे थांबतो. अर्थातच मिसळीवर ताव मारला व पुढे नगरकडे प्रस्थान ठेवले. ८.३० ला नगरच्या ‘माउली’ सभागृहावर पोहोचलो. आत रीमा अमरापूरकर,केतकी व सायली अमरापूरकर यांची स्टेज, लाईट्स, ध्वनी व्यवस्था यांची पहाणी व सूचना देणे सुरु होते.
९ वाजले आणि प्रेक्षागृह विद्यार्थ्यांनी भरून गेले. जवळ जवळ ६०० विद्यार्थी वेधसाठी शालेय युनिफाॅर्म मध्ये उपस्थित झाले. आणि ९.१५ ला वेधचा आरंभ स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या छायाचित्रास व समर्थांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून सरस्वती वंदनाने झाला. नगरचा हा १४ वा वेध. १३ वर्षांपूर्वी स्व. सदाशिव अमरापूरकरांनी नगर वेधचा पाया रचला. आज ‘सदाशिव अमरापूरकर मेमोरियल ट्रस्ट’ व ‘श्री समर्थ विद्या प्रसारक मंडळ’ याच्या संयुक्त विद्यमाने स्व. सदाशिव अमरापूरकर यांच्या स्मरणार्थ वेधचे आयोजन करण्यात येते .

१४ व्या वेधचे सूत्र एकदम भन्नाट –“No Excuses नो सबबी” न हरता –न थकता –न थांबता असे होते. आपण नेहमीच काही तरी सबबी सांगत असतो. काही टाळण्यासाठी नवीन नवीन सबबी सुचतात. पण इथे तर नो सबबी हे सूत्र! उत्सुकता होती फॅकल्टींची! नावं तर माहिती होती, पण न थांबता –थकता काय केले यांनी, सबबी का नाही पुढे केल्या यांनी – हे जाणून घेण्याची उत्सुकता मनात जोर करत होती…..आणि व्यासपीठावर आली पुण्याची तरुणी राखी कुलकर्णी! पर्यावरणाला हानी करणाऱ्या प्लास्टिकचा वापर कमी होण्यासाठी जनजागृती करण्याच्या हेतूने संपूर्ण भारताची “सोलो जर्नी” करणारी राखी एका ध्येयाने प्रेरित झाली आणि ५ नोव्हेंबर २०१७ ते ५ नोव्हेंबर २०१८ या वर्षात ३६५ दिवसात २९ राज्य तिने पालथी घातली –bag packer –म्हणून ! पाठीवर २२ किलोचे वजन, त्यात टेंट व समान! कधी पायी, कधी बस ,तर कधी रेल्वेने प्रवास ! कुठेही थांबावे ,टेंट टाकावा माणसांबरोबर मुक्त संवाद –भाषा येओ, न येओ –भाषेची मर्यादा नव्हतीच ! एकच इच्छा- देश जाणून घ्यावा, माणसांचे अंतरंग उमजून घ्यावे. या सर्व प्रवासात अनेक अनुभव आले. “अतिथी देवो भव” या संस्कृतीचे दर्शन पूर्ण भारतात दिसले तिला . ईशान्य भारताबद्दल अनेक गैरसमज आपल्या मधे आहेत ते या प्रवासात दूर झाले असे ती म्हणते. सिक्कीम चे त्यावेळचे राज्यपाल श्री. श्रीनिवास पाटील यांच्या आदरातिथ्याने ती भारावून गेली. तिच्या बोलण्यावरून असे वाटले की सबबी आपण उगाचच तयार करतो. सबबींमुळे आपण आळशी बनतो. नखरे करू लागतो.

राखी नंतर इसरोचे शास्त्रज्ञ प्रदीप देवकुळे यांनी चांद्रयान -२ च्या भारताच्या उपलब्धींचा मागोवा घेतला. “चूक करायला संधीच द्यायची नाही”, या विचारांवर आत्तापर्यंत काम करत आल्याचे ते म्हणाले.

या नंतरचे सत्र होते “माणदेशी चॅम्पियन” चे प्रभात सिन्हा, अभय केळकर व रेश्मा केवटे या तिघांचे. अभय केळकर याने नुकताच नॉर्वेचा “Iron Man” हा किताब मिळवला आहे. रेश्मा ही ट्रिपल चेस या प्रकारात राष्ट्रीय खेळात सुवर्णपदक विजेती माणदेशी कन्या. ग्रामीण रत्नांना शोधून त्यांचे mentoring करण्याचे काम प्रभात सिन्हा त्याच्या संस्थे द्वारे करत असतो. त्यांच्या मुलाखतीचे निरुपण करतांना डॉ. नाडकर्णी म्हणाले ,”खेळ- हरायला शिकवतो, खेळ जिंकायला शिकवतो, मैत्री करायला शिकवतो. आयुष्याची लय सापडते- न हरता,न थकता,न थांबता !!!”

नंतरचे सत्र होते “बीजमाता” राहीबाई पोपरे यांचे. राष्ट्रपतींच्या ‘नारी शक्ती सन्मानाने’ गौरवीत झालेल्या आहेत त्या. त्यांच्या खास ग्रामीण बाजात आपणास पर्यावरण रक्षणाचे महत्व सांगतात, “आपली जमीन खराब झाल्यावर डॉक्टर कोठून आणणार?” .साध्या ,सोप्या बोलण्यातून त्यांनी जीवनविषयक तत्वज्ञान मांडले. मी अशिक्षित आहे असे सांगणाऱ्या राहीबाईंचे अनुभवातून आलेले शहाणपण त्यांच्या पारदर्शक शब्दातून व्यक्त होत होते.

नगरच्या १४ व्या वेधची सांगता सुप्रसिद्ध संगीतकर कौशल इनामदार यांच्या मुलाखतीने झाली.
दीपक पळशीकर.