बोलिले जे ऋषी, साच भावे वर्तावया

माझा जन्म झाला तो अशा कुटुंबामध्ये जिथे धार्मिक कर्मकांडांना फारसे महत्त्व नव्हते. आमच्या घरात देवाच्या तीन-चार प्रतिमा लावलेल्या होत्या. त्यांना रोजचा दिवा लावण्याचे काम आई वडील करायचे. ते दोघे गुरुवारचा उपवास करायचे. त्या वारी घरी, दत्ताची आरती असे. त्यानंतर नेमाने पेढा मिळायचा. हा सारा वारसा माझ्या भावाकडे गेला. मला कधी कोणी असे कर किंवा करू नको असे सांगितले नाही. परिणामी कधी पर्यटनाच्या निमित्ताने देवळात जाण्याची वेळ आली किंवा गणपती देवीच्या उत्सवांमध्ये कुठे दर्शनाला गेलो तरच नमस्काराची कृती घडत असे. त्यामुळे प्रौढ आयुष्यामध्येही कर्मकांड, मूर्तिपूजा, उपवास,  नवस ह्या सार्‍या पासून दूर राहिलो. हे सारे करणाऱ्यांचा दुःस्वास मात्र कधी केला नाही. अनेक तीर्थस्थळांमधला बकालपणा, विषमता अन व्यापार पाहिल्यावर तर अजूनही विषण्णता येते आणि चिडचिडही होते.

मेडिकलचा विद्यार्थी असताना, डॉ. रवीन थत्ते सरांच्या घरी ‘ज्ञानेश्वरी’ वर नियमित ज्ञानसत्रे असायची. आम्ही काही मित्र तिथे हजेरी लावायचो ते नंतरच्या सुग्रास जेवणावर डोळा ठेवून. सुमारे बावीस वर्षांपूर्वी, तणावनियोजनावरच्या प्रशिक्षण कार्यशाळा घेताना, भगवतगीतेमधील कर्मयोगावर प्रश्न विचारले जायचे. ‘मुकाट्याने आपलं कर्म करत राहायचं’ असा हा दैववादी सूर नक्की नसावा असे वाटले. पण बहुतेक जण त्याच पद्धतीने प्रश्न विचारायचे. सत्य शोधण्यासाठी म्हणून अभ्यास सुरु केला. संस्कृतमधली भगवतगीता डोक्यावरून गेली. आणि विनोबा भेटले. गीताई, गीता प्रवचने, गीताई चिंतनिका असे टप्पे पार करत विनोबांच्या समग्र साहित्याच्या, सहित म्हणजे सोबत चालायला सुरवात केली. हळूहळू गाथा, दासबोध, ज्ञानेश्वरी वाचनात आली. आधुनिक मानसशास्त्रातील Rational Emotive Behavior Therapy म्हणजे विवेकनिष्ठ मानसोपचार पद्धती आणि भारतीय अध्यात्म ह्याची सांगड घालताना, ‘विषादयोग,’ ‘मनोगती’ आणि ‘कर्मधर्मसंयोग’ अशी पुस्तके लिहिली गेली. त्या निमित्ताने विनोबांच्या सोबतच ओशोंपासून ते विवेकानंद, महात्मा गांधी, योगी अरविंद, जे. कृष्णमूर्ती, रामकृष्ण ह्याच्याबद्दल वाचत गेलो. महाराष्ट्राच्या भागवतधर्माचाही थोडा अभ्यास झाला.

असे होता होता गाडी वेदान्त-तत्त्वज्ञानाच्या टप्प्यावर आली. निमा आणि सूर्या असे वेदान्त शिकवणारे दोन विद्वान गुरु भेटले. (www.discovervedant.com ही त्यांची साईट पहा.) म्हणजे भारतीय परंपरेप्रमाणे ‘गुरु भेटणे’ हा टप्पाही पूर्ण झाला. आपल्या भारतीय तत्वज्ञान परंपरेमध्ये ‘दर्शने’ आहेत. म्हणजेच perspectives आहेत. हिंदू, बौद्ध, जैन, शीख असे चार धर्म ह्या संस्कृतिमधून निघाले. दरम्यानच्या काळात गौतम बुद्ध आणि त्याची मांडणी ह्याची जोड REBT ला कशी देता येईल ह्यावरही अभ्यास सुरु झाला. हे सारे अभ्यास कधीच पूर्ण होणारे नसतात.

सुमारे वर्ष-सव्वावर्षापूर्वी डोक्याने असं घेतलं की वेदान्ततत्वज्ञानाची मूळ मांडणी आहे उपनिषदांमध्ये. त्याचा अभ्यास केला तर आजवरच्या शोधाचे खोलवरचे मूलभूत अंग कळेल आपल्याला.

जे स्वतःला कळते आहे किंवा ‘कळले आहे असे वाटते आहे’ ते इतरांपर्यंत पोहोचवायचे हा माझ्यातल्या ‘कार्यकर्त्याचा’ किंवा ‘Activist’ चा भाग असला पाहिजे. आधुनिक मानसशास्त्राचा सांधा अध्यात्म-तत्वज्ञानाशी घातला पाहिजे हा हेतू घट्ट होण्याचे महत्वाचे कारण असे . . .  आमच्या मनआरोग्यक्षेत्राला स्वतःचा पाश्चिमात्य चेहरा न बदलता आल्यामुळे मनआरोग्य क्षेत्राचा ‘सांस्कृतिक’ आणि ‘सामाजिक’ ठसा निर्माण झाला नाही. अध्यात्मक्षेत्रातील शहाण्या आणि चतुर उद्योजकांनी (हा शब्द उपरोध नव्हे तर वास्तववादी आदराने वापरला आहे.) मात्र परंपरेतल्या शहाणपणाला positive psychology ची फोडणी विनासायास देऊनस्वतःचे Branding अतिशय भक्कम केले. म्हणून मनआरोग्यक्षेत्रातल्या अभ्यासकाने ह्या शास्त्राच्या अंगाने, अध्यात्माची आणि वेदान्ताची मांडणी करायला हवी.

सामाजिक वास्तवामध्ये, हिंदु धर्माचे व्यापारी, असहिष्णु आणि कर्मठवादी रूप नव्याने डोळ्यासमोर येत असताना इथल्या बहुसंख्य मंडळींसमोर धर्मामधल्या शहाणपणाची (wisdom) मांडणी नव्याने करणे जरूरीचे वाटले हा दुसरा मुद्दा. अशा कट्टरवादी रूपाची भूल सुशिक्षित तरुणांना पडत आहे तेव्हा ह्या निमित्ताने, वेदांत विचारातली कोणती तत्त्वे आपण दैनंदिन जीवनात समजून-उमजून वापरू शकतो हे सांगणे गरजेचे वाटले.

माझं पांडित्य सुशोभित पणे सादर करणे हा हेतू ह्या अभ्यासा मागे नाही. मी अजूनही स्वतःला अभ्यासक मानतो, ‘मुमुक्षु साधक’ नव्हे. ही माझी मर्यादा आहे आणि ती मी स्वीकारली आहे. ‘जिज्ञासू’ भक्त असल्याशिवाय तो ‘ज्ञानी’ होणार नाही ही गीतेतलीच मांडणी आहे. तर उपनिषदांच्या या शोधामध्ये पुन्हा वेगवेगळे धर्म व्यक्ती ते नव्याने भेटले.

माझ्या जगण्याचं नेमकं काय करायचं?

हा एक साधा पण मूलभूत प्रश्न हळूहळू प्रकाशात आला. माझ्या जगण्यामध्ये येतात माझी उद्दिष्टे (करीयर इत्यादी) माझी जीवनशैली, माझे नातेसंबंध . . .  ह्या सगळ्याबरोबरच दोन प्रश्न आपल्या डोक्यात असतात . . . मृत्यू म्हणजे काय? मृत्यूनंतर काय? पुनर्जन्म असतो का?

ह्या सगळ्या विषयांवर वेदान्ततत्वज्ञानाची निश्चित भूमिका आहे. उपनिषदे रचणाऱ्या ऋषींनी ती नम्रतेने पण प्रचंड विश्वासाने मांडली आहे. त्यांची मांडणी समाजापर्यंत, खास करून तरुणांपर्यंत पोहोचवणे महत्वाचे आहे. तसेच “मुर्तीमधल्या देवाचे (तिथे तो असला तर) काय करायचं?”

“तिथे नसला तर काय करायचं?”

असे प्रश्न आहेतच. “माझा देवावर तसा विश्वास नाही पण काहीतरी शक्ती आहे हे खरं” असं म्हणणारे कित्येक जण मला रोज भेटतात. पण आपल्याला ना देवाबद्दलची जण असते ना त्या ‘अद्भुत’ शक्तीबद्दल. ह्या विषयांवरही उपनिषदांपासूनची एक मांडणी आहे.  त्याची प्रतिबिंबे, पडसाद हजारो वर्षे पडत आले आहेत.  ईशावास्त्रामधली तत्वे थेट शंकराचार्यांपासून, ज्ञानेश्वर, तुकाराम, परमहंस, विवेकानंद लोकमान्य, गांधीजी, विनोबा, ओशो, चिन्मयानंद, पांडुरंगशास्त्री, जग्गी वासुदेव, असे सारेजण त्यांच्या त्यांच्या शैलीमध्ये सांगूनही आशयाची एकात्मता कशी राखतात हे पाहिल्यावर मन थक्क होतं.

वेदान्त विचार आपल्याला अत्यंत रसरशीत, समृद्ध आणि व्यापक जीवन जगायला शिकवतो असे माझं मत बनलं आहे.  अर्थातच असं जीवन जगण्याचा तो एकमेव रस्ता आहे असा दावा ते शहाणे ऋषी करत नाहीत. आजच्या मानसशास्त्रामध्ये ‘Positive Psychology’ अर्थात ‘सकारात्मक मानसिकताशास्त्र’ नावाची शाखा रूढ होऊ पाहत आहे. आज ज्या वेगाने काळाचे आणि त्यातल्या तंत्रज्ञानादी घटकांचे गतिमान परिवर्तन होत आहे ते लक्षात होता, परंपरेमधल्या नेमक्या कोणत्या भूमिकांच्या मुले आंजचे आजचे जगणे अधिक समजूतदार आणि सहिष्णु होईल हे ठामपणे मांडणे गरजेचे वाटले.

त्यासाठी गेल्या सव्वा वर्षांमध्ये नव्याने साधन सामुग्री जमवली. वाचन सुरु केले. टिपणे काढत गेलो. डोळ्यासमोर काही, मूर्त असा पुर्वबिंदु दिसल्याशिवाय माझं मन सातत्याने काम करत नाही. Institute for Psychological Health, अर्थात् .आय.पी.एच. ह्या ठण्यातल्या संस्थेला २३ मार्च २०२० ला तीस वर्षे पूर्ण होत आहेत.  त्या निमित्ताने एक ‘ज्ञानयज्ञ’ करावा असा बेत केला. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी मी आमच्या संस्थेच्या स्वतःच्या मालकीच्या जागे साठी निधी उभारणी करावी म्हणून, तीन संध्याकाळी अशी नऊ तासांची ‘सायंकाळची संवादमाला’ सादर केली होती.  तशीच मांडणी आताही करावी असे वाटले. पॉवरपॉइंटचे सादरीकरण करून बोलत गेलो तर कळायला सोपे जाते.  म्हणून ह्यावर्षी, १३, १४, १५ डिसेंबरच्या शुक्र, शनी, रविवारी रोज साडेतीनतास सादरीकरण  करावे असे उद्दीष्ट ठेवले आहे.

‘वेदान्तविचार आणि व्यक्तित्वविकास’ असे भारदस्त शीर्षक देऊन हे सादरीकरण करावे असे डोक्यात आले. पण ह्या शीर्षका मुळेच तरुणवर्ग आकर्षित होणार नाही असे लक्षात आले.  ‘माझ्या जमण्याचं नेमकं काय करायचं? हा प्रश्न मी ‘सह-शीर्षक’ म्हणून ध्यायचं ठरवलं. ह्या सादरीकरणातून आय.पी.एच संस्थेच्या, त्रिदशकापूर्वी निमित्त एक पायाभूत निधी उभारावा आणि तीस वर्षे पूर्ण होत आहेत तर पुढल्या वर्षभरामध्ये किमान तीस लाख रुपयांचे संकलन करावे असे योजले आहे.

अध्यात्मसाधनेतील प्रवासाला विनोबांचे नाव दिले आहे. ‘ब्रम्हविद्या’ एक दिवस विज्ञान आणि ब्रम्हविद्या एका भाषेत बोलतील असा त्यांचा विचार आहे. आधुनिक मेंदुविज्ञानाने माणसाच्या भावना आणि माणसाच्या Consiousness चा विविध अवस्था ह्यावर प्रकाश टाकला आहे. ह्या संस्थेचा धागा परंपरेतल्या सहाणपणाशी जोडणे हेही मला अतिशय अश्वासक करतं. माणसाची ‘माणुसकी’ जर विज्ञान आणि वेदांत एकाच पद्धतीने सांगू लागले तर ते किती मोलाचे ‘ऐक्य’ असेल. किती मोलाचे ‘अद्वैत’ असेल. वेदान्ताची परंपरा फक्त ‘ऐक्या’ची नाही तर तादात्मय ‘अद्वैता’ची आहे. द्वैत म्हणजे दुभाजन …. विभाजनाची सुरवात. एकदा शकले पडायल सुरवात झाली की एकता हरवते. मानवी संस्कृतीच्या हजारो वर्षांच्या यात्रे मध्ये ‘एकरूप करणारे’ आणि ‘फोडून तोडून विलग करणारे’ असे परस्पर विरोधी प्रवाह प्रत्येक काळामध्ये उपस्थित राहिले आहेत. अध्यात्मिक सहजपणा शिकण्याची धुरा संतांच्या खांद्यावर होती आणि सामाजिक जबाबदारी त्या त्या क्षेत्रातल्या समाजसेवकांवर …. कधी ही दोन्ही रूपे अनेक माहात्म्यांमध्ये एकरूपही झाली… परंतु ह्यामध्ये मनमेंदु विज्ञानाला प्रत्यक्ष स्थान मिळाले नाही. आजच्या संक्रमणावस्थे मध्ये म्हणूनच ह्या अभ्यासाचे आणि सादरीकरणाचे एक दखलपात्र स्थान आहे असं म्हणावं लागेल.

“तु दहा-साडेदहा तास नेमकं काय बोलणार आहेस?” असा प्रश्न मला विचारलात तर त्याचे ‘सम्पुर्ण उत्तर माझ्या मनात नाही. माझ्या अभ्यासात मला जरा कुठे ‘share करायलाच हवं’ असे तत्व, तपशील, विचार मिळाला कि मला तो फक्त माझ्यापुरता सीमित ठेवणं स्वाभाविक वाटत नाही …. म्हणून व्यक्त व्हायचं. मनः पूर्वक मांडणी करायची: धागे जोडत जायचं.

आम्ही वैकुंठवासी। आलो या चि कारणासी।।
बोलिले जे ऋषी। साच भावे वर्तावया।।

असे तुकोबा म्हणतात. माझ्याकडे तुकारामांमधली कर्मयोगाची उंची आणि खोली नाही हे निखालस. पहिल्या ओळीमध्ये तुकाराम सांगतात तो आहे कर्मफलाचा आणि स्वामित्वधनाचा त्याग. परंतु दुसऱ्या ओळीमध्ये सांगितलेला हेतू मात्र माझ्या हेतुशी जुळणारा विवेक माझ्या पाठीशी आहे. हा दिलासा घेऊन, मी तुम्हा सर्वांसमोर सादर करणार आहे, तीन संध्याकाळी आणि साडेदहा तासांची ही ‘मनउत्कर्ष संवादमाला.”

– डॉ. आनंद नाडकर्णी.

Venue: Samarth Sevak Mandal Ground, Shiv Samarth School, Talao Pali, Thane West.Time: 6.30p.m. to 9.30 p.m. on all three day i.e 13,14,15th Dec 2019.
Entry Pass: Rs.500/- for all three days.
For Booking your seat :
Contact: 9870600075  /  810447063. Whatsapp 9870115693
Mail id: vedhthane@gmail.com
For more details: vedhiph.com

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: