गेलो देण्यासाठी पण…

दरवर्षी पंढरीला लाखो भक्त जातात आपल्या भक्तीचे दान द्यायला, पण अनुभव असा येतो, की-

विठ्ठलाच्या दारी यावे असे जाऊनिया
गेलो देण्यासाठी पण आलो घेऊनिया ||

अशी अनुभूती प्रत्येकच भक्ताला येते. आपल्या भक्तीचे दान द्यायला जावे पण उलट खूप काही मिळवूनच यावे. अगदी खरे सांगायचे तर २००७ साली ठाणे वेधमध्ये मी पहिल्यांदाच गेलो तेव्हाची माझी अनुभूती अगदी नेमकी याच शब्दात सांगता येईल. मी मारे ऐटीत गेलो मुलांना आणि पालक- शिक्षकांना मार्गदर्शन करायला, माझ्या यशाचे आणि अनुभवांचे संचित वाटायला, पण परत आलो तो स्वतःच समृद्ध होऊन. खूप काही मिळवून. याचे श्रेय आनंद नाडकर्णी या मित्राला. दोन अर्थाने- एक म्हणजे वेधची ही अफलातून संकल्पना त्याचीच म्हणून आणि दुसरं म्हणजे तो ज्या पद्धतीने मुलाखती घेतो त्यासाठी. सगळाच भन्नाट प्रकार आहे.

त्याचं झालं असं की २००६ साली, वयाच्या अवघ्या ४३ व्या वर्षी मी लाखो रुपयांची नोकरी सोडून पूर्ण वेळ लेखन वाचन करत श्रेयसाची कास धरली आणि अनुभव मासिकात यावर लेख लिहिला. या उफराट्या निर्णयाचे मनोगत वाचून आनंदचा मला फोने आला, “अरे बाबा, आमच्या मुलांना सांग की तुझ्या या भन्नाट निर्णयाविषयी, तुझ्या कॉर्पोरेट क्षेत्रातील कामगिरीविषयी, आणि आता कसा मस्त जगतो आहेस  त्या विषयी.” मला काय, मी मोकळाच होतो आणि नव- निवृत्त असल्याने उत्साहाने फुरफुरत होतो. लगेच होकार कळवळा. (होकार कळवळा वगरे आता लिहितोय. त्या वेळी  मात्र मलाच इतका उत्साह आला, की काही करून आता आनंदचे मन बदलू नये आणि माझी ही संधी जाऊ नये अशीच प्रार्थना करत होतो!) आणि त्यानंतर आनंद आणि त्याच्या सहकाऱ्यांनी दिलेला अनुभव शब्दातीत होता.

एखाद्या मुलाखतीची इतकी तयारी? बाप रे! मला लेखी प्रश्न काय पाठवले, मला वेधविषयी बरेच काही लिटरेचर काय पाठवले…. शिवाय आधी फोनेवर सविस्तर बोलणे काय झाले, शिवाय कोणत्या मुद्द्यावर जास्त बोलायचे आहे त्याविषयी चर्चा काय…. त्या तयारीने मी थक्कच झालो! मीही माझ्या कॉर्पोरेट पद्धतीने तयारीला लागलो. त्याच्या प्रश्नावलीची सविस्तर ऊत्तरे लिहून तयार तर केलीच, शिवाय माझ्या परीने काही विचार लिहून काढले. चक्क एक इन्स्पिरेशनल गाणे लिहून काढले. आयत्या वेळी त्या मुलांना सरप्राईज द्यायला म्हणून. चक्क त्याला चाल वगैरे लावून प्रॅक्टिस देखील केली. रूपक तालात बांधलेले ते ‘आओ चलो अब साथियो, मिलकर बढाएँ हौसला…’, अश्या ओळी असलेले ते गीत अजूनही आठवते मला. शिवाय माझा तपशीलवार बायोडाटा सुद्धा तयार करून आनंदला पाठवला.

प्रत्यक्ष वेधच्या दिवशी त्यांचे नियोजन पाहून  तर थक्कच झालो.  ठाण्यात राहणाऱ्या उमा पत्की या सख्ख्या मैत्रिणीला घेऊन मी कार्यक्रम स्थळी पोहोचलो आणि तिथला प्रचंड मोठ्ठा मंडप आणि जवळजवळ साडेतीन- चार हजारची गर्दी पाहून तर मी आश्चर्याने चकितच झालो. बापरे! मला कल्पनाच नव्हती मला इतक्या मोठ्या समूहासमोर बोलायचे आहे ते. त्यात साताठशे पालक आणि शिक्षक आणि उरलेली सर्व मुलं होती. इतक्या मोठ्या गर्दीसमोर जायचा हा माझा पहिलाच प्रसंग. ( कंपनीत साताठ कॅलीग्स समोर पावरपॉईंट प्रेझेंटेशन देण्यात मी वाकबगार होतो, पण इतक्या लोकांसमोर बोलायचा हा पहिलाच प्रसंग!) आनंदने मला स्टेजवर बोलावताच माझ्या शंका, भिती वगैरे सगळं कुठच्या कुठे पळून गेलं आणि मी चक्क त्याच्याशी मस्त गप्पा मारायला लागलो.

वेधमधल्या एका विलक्षण प्रथेनं मला सर्वप्रथम धक्का दिला. आनंदने त्या हजारो मुलांना सूचना दिली होती. वक्त्याच्या भाषणातले काही खूप आवडले की शांतपणे फक्त उजवा हात वर करायचा. आणि खूप गम्मत वाटली की टाळ्या वाजवायच्या. ( मी रीतसर तयारी करून गेलो असल्याने पहिल्या दोन- तीन मिनिटातच काही चमकदार बोललो तेव्हा एकदम समोर हजारो हात वर झालेले दिसले तेव्हा अक्षरशः अंगावर काटा आला.) मग मी आनंदला विनंती केली की मी या मुलांसाठी एक गाणे लिहून आणले आहे ते म्हणू का? आनंदने परवानगी दिली आणि माझ्याबरोबर ती सर्व मुले ते गाणे एक एक ओळ म्हणायला लागली तो अनुभव रोमांचक होता.

तसा आनंद मोठा चतुर आणि लबाड आहे बरं का! वेधमध्ये बोलावलेल्या वक्त्यांना तो खुश करतोच, पण ह्या माणसाकडून आपल्या मुलांसाठी काय काढून  घ्यावे हे त्याला नेमकं माहित असतं. थोडक्यत त्याचा ही ‘होमवर्क’ एकदम पक्का असतो. तो अश्या चतुराईने मुलाखत घेतो की आपल्या बोलण्यातून मुलांसाठी अगदी नेमकं आणि ‘फोकस्ड’ मागदर्शन तर व्हावंच, पण त्याला ‘पंतोजी छाप’ मागदर्शनाचा वास देखिल येऊ नये. मुलांना कशात रस आहे आणि त्यांना कशाचा फायदा होईल या दोन अपेक्षांचे भन्नाट मिश्रण करून ही मैफल रंगत जाते. खरंतर आनंदने १०/ १५ दिवस आधी वेधची संकल्पना, पद्धत वगैरे  सर्व लिटरेचर पाठवले होते. त्यात याआधी येऊन गेलेल्या वक्त्यांची यादी होती. ती नावे पाहूनच मला प्रचंड दडपण आले होते. कारण  ती यादी म्हणजे भारतातल्या एकेक लोकांचे ‘हूज हू’ वाटावे. मी तर इतका सामान्य की त्या यादीत माझे नाव मला तरी शोभून दिसेना. पण मुलाखतीच्या आधी, मुलाखती दरम्यान आणि त्यानंतर आनंद नाडकर्णी, वेधचे कार्यकर्ते आणि आयपीएच संस्था यांपैयकी कुणीच मला तसे जाणवू दिले नाही. लातूरच्या वेधमध्ये देखील मला तसाच अनुभव आला. धनंजय कुलकर्णी, दीपक पळशीकर वगैरे वेधच्या निष्ठावान कार्यकर्त्यांनी इतके विलक्षण आदरातिथ्य केले की गहिवरून यावे. अश्यावेळी आपण देखिल अंतःकरणाच्या तळापासून वेधमध्ये सामील होतो. मुलांना देता येईल तितके द्यायचा प्रयत्न करतो. हेच वेधच्या यशाचे रहस्य आहे.

ठाण्याच्या माझ्या पहिल्याच वेधमध्ये एक गम्मत झाली. मी बोलता बोलता सांगितले की ऑफिसमध्ये प्रचंड कष्ट करतानाच मी नेहमीच माझे छंद जोपासायचो. वयाच्या पस्तीसाव्या  वर्षी मी तबला शिकलो. तिथे आनंदने मला अचानक थांबवले आणि मिस्किलपणे म्हणाला , “अरे, संजय, खरंच तबला शिकलास का आमच्या पोरांवर इम्प्रेशन मारायला खोटंच  सांगतो आहेस?” त्यावर मी हसत म्हणालो, “अर्थातच खरंच शिकलो, कोई शक?” त्यावर तो गंमतीदारपणे म्हणाला, “आणि मी आता तुला इथे तबला वाजवून दाखवायला सांगितलं तर?” मी ही ऐटीत म्हणालो, “आणि मी खरंच वाजवून दाखवला तर?” खरी गम्मत पुढे आहे. त्याने खरंच कुणा कार्यकर्त्याला स्टेजवर तबला आणायला सांगितला आणि हसत हसत माला म्हणाला, “हं, वाजवा बरं!” तेव्हा मी एकतालातला एक कायदा वाजवला आणि समोर हजारो हात उंचावलेले पाहताना काय वाटले ते शब्दात सांगणे अवघड आहे.

वेधची कल्पना मुळात करिअर मार्गदर्शन असेलही पण मला दिसलेले वेधचे स्वरूप खूप व्यापक आहे. मुलांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगिण विकास हे वेधचे खरे ध्येय आहे. कोणतीही भंपक औपचारिकता, ‘ग्यान देतोय’ असा आव, किंवा मार्गदर्शनाचा अभिनिवेश न बाळगता वेध मुलांसमोर काहीतरी चांगले मांडत  असते. त्यातून किती घ्यायचे, काय घ्यायचे आणि त्याचा कसा उपयोग करून घ्यायचा ते मुलांच्या इच्छा आणि क्षमतेवर अवलंबून असते. त्या दिवशी माझ्या नंतर एका तरुण मुलीचे सत्र होते. असेल जेमतेम पंचविशीची. भारतातील अत्यंत ख्यातकीर्त (आसारामबापूला पकडण्यात आघाडीवर असल्याने अक्षरशः  सिलेब्रिटी म्हणावी अशी!) पोलीस अधिकारी असलेली ती मुलगी बोलायला लागली आणि माझ्यासह सगळे वाक्या वाक्याला दाद देत होते, टाळ्यांचा कडकडाट करत होते. आम्ही सगळेच भारावून गेलो होतो. वेधमध्ये असा अनुभव वारंवार येतो.

एक मात्र आहे,वेधच्या दर्शनी स्वरूपात केवळ आनंद नाडकर्णीचे नाव दिसत असले तरी या मागे कार्यकर्त्यांची, आयोजकांची एक मोठीच फळी कार्यरत असते. आता तर वेध ठाण्यापुरते मर्यादित नाही तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी होतो. त्या त्या ठिकाणी देखिल असे वेधक कार्यकर्ते मजबूत टीम बनवताना  दिसतात. शिवाय काळाबरोबर वेध अधिक तंत्रज्ञानाधारित आणि स्मार्ट होताना दिसत आहे. अतिशय नगण्य फी भरून मुलांना या प्रकल्पात  इतके काही मिळते की विश्वासच बसू नये. खरं सांगायचं तर वेधविषयी खूप दीर्घ लिहायला हवं, पण जता जाता एक सांगावेसे वाटते, की मी वेधचा भाग आहे या विषयी मलाच खूप अभिमान वाटतो, आनंद वाटतो. या पुढे मात्र हे कार्य अधिकाधिक संस्थात्मक होत जावे आणि योग्य ते डॉक्क्युमेंटेशन वेळच्या वेळी व्हावे (वेधचेच नाही तर आयपीएच करत असलेल्या विविध उपक्रमांचे) असे मात्र सुचवावेसे वाटते. उत्तम काम करणाऱ्या अनेक संस्था/ व्यक्तींप्रमाणेच आयपीएच आणि वेध प्रसिद्धीतंत्रात फारच पिछाडीवर आहेत हेही जाता जाता नमूद करतो. अश्या चांगल्या कार्यक्रमांचे यथायोग्य ‘मार्केटिंग’ करणे, अधिकाधिक दात्यांचा शहभाग मिळवणे या गोष्टी करण्यात काहीच गैर नाही. त्यातून हा उपक्रम अधिकाधिक मोठा  होत जाईल.  आधीच कुमार आणि किशोरवयीन मुलांसाठी आपल्याकडे फारसे काही होत नाही, तेव्हा अश्या उपक्रमांची (आजच्या आणि उद्याच्या) समाजाला नितांत गरज आहे. फार मोलाचे काम आहे हे. भविष्यात हे अधिकाधिक वाढत जायला हवे…… वाढतजाईल असा विश्वास आहे, त्यासाठी माझ्या मनःपूर्वक शुभेच्छा. मी स्वतःला वेधचा अभिमानी सदस्य समजतो त्यामुळे भविष्यातही वेधक काम करायची संधी मिळावी अशी इचछा  तर आहेच . जाता जाता वेधविषयी इतकेच:

वेगवेगळी फुले इथे या सुरेख बागेत    
नाड्य आणि गरीब नांदती एका जागेत.
शाकडे सर्वांना न्यावे बागच बहारावी
ब्द असे की अलगद त्यांची गीते ही  व्हावी
स्वीकारावे चिमटीने आणि द्यावे दो  हातांनी.
होकारच द्या उद्यास, येईल यश सर्व दिशांनी ||

संजय भास्कर जोशी,
पुणे 

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: