‘वेध…….वेधचा’

भाग १.

ओळख… वेध ची आणि डॉ. ‘वेधानंद’ नाडकर्णी यांची

थोडंसं आनंद बद्दल.

१९७६ ते ७८ च्या कालावधीत मी ठाण्याच्या बा. ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात बी.एस्सी. च्या पदवीसाठी  प्राणीशास्त्र हा विषय शिकत होतो. आम्हाला त्यावेळी प्रा. म. द. नाडकर्णी नावाचे प्राचार्य होते. अतिशय कडक शिस्तीचे आणि अत्यंत कुशाग्र बुद्धिमत्ता व सामाजिक जाणीव असलेले प्राचार्य म्हणून त्यांची ख्याती होती. त्याचं वर्षी आनंद नावाचा त्यांचा धाकटा मुलगा आमच्या महाविद्यालयातून बारावीची परीक्षा उत्तीर्ण होऊन, उत्तम गुण मिळवून, मुंबईच्या के.ई. एम. रुग्णालयाशी संलग्न असलेल्या अतिशय ख्यातनाम आणि प्रतिष्ठित, अश्या जी. एस. मेडीकल कॉलेज मधे वैद्यकीय शिक्षणासाठी गेला आणि मग पुढे अनेक वर्षे आमचा काहीच संपर्क राहिला नाही.  तेंव्हा हा नाडकर्णी सरांचा मुलगा एवढीच त्याच्याबद्दल माहिती होती. येता जाता क्वचित भेट झाली तरी केवळ स्मितहास्याव्यतिरिक्त काही वेगळी interaction होण्याची शक्यता नव्हती किंवा तशी अपेक्षा पण नसायची. कालांतराने मी मुंबई विद्यापीठाची बी.एस्सी.ची पदवी प्राप्त करून पुणे विद्यापीठात प्राणीशास्त्र विभागात उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतला. १९८१ साली मी एम. एस्सी. पदवी प्राप्त करून पुन्हा बांदोडकर विज्ञान महाविद्यालयातील कनिष्ठ महाविद्यालयात जीवशास्त्र विषयाचा शिक्षक म्हणून नोकरीला सुरुवात केली. नाडकर्णी सर देखील त्या काळात सेवानिवृत्त झाले होते.

दरम्यानच्या काळात आमचं अमेरिकेत चार पाच वर्ष वास्तव्य झाला त्या काळात सुप्रसिद्ध लेखक आणि सामाजिक कार्यकर्ते डॉ. अनिल अवचट अमेरिकेत जवळपास दोन अडीच महिने आमच्याच गावात वास्तव्यास होते. त्यामुळे ऑलमोस्ट रोज आमच्या भेटी, गप्पागोष्टी होत असत. या गप्पांमध्ये अनेकदा आनंद नाडकर्णी चा विषय निघायचाच. कारण तोपर्यंत आनंद मुक्तांगण आणि अवचट कुटुंबाचा एक अविभाज्य घटक होऊन गेला होतं. १९९१-९२ मधे आम्ही अमेरिकेतील संशोधन कार्य संपवून भारतात, आमच्या कर्मभूमी ठाण्यात परतलो. मग अनिल आणि डॉ. सुनंदा अवचट अनेक वेळा ठाण्यात आले कि आमच्या घरी एखादी चक्कर असायची. अशाच एका भेटीदरम्यान आम्ही आनंदच्या ठाण्यातल्या घरीच गेलो आणि त्यावेळेस आनंदची पहिली भेट झाली आणि मग बांदोडकर महाविद्यालायचे संदर्भ निघाले आणि हळूहळू आमची मैत्री झाली.

आय. पी. एच. आणि वेध

डॉ. आनंद नाडकर्णी

आनंदचं “सुदृढ मन सर्वांसाठी” हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेलं आय.पी.एच. स्थिरावत होतं. मानसिक आरोग्यासंबंधी लोकांच्या मनात प्रचंड गैरसमज होते. मानसिक आजाराने ग्रस्त होणं आणि त्याहून देखील अशा आजारावर डॉक्टरांकडे जाऊन उपचार घेणं यावर एक मोठा सामाजिक न्यूनगंड होता. यावर मानसोपचारतज्ज्ञ डॉ. आनंद नाडकर्णी (एम.डी.)  मधे असलेला प्रयोगशील, चळवळ्या, समाजाचं उत्तरदायित्व मानणारा कार्यकर्ता स्वस्थ बसणार कसा? व्यावसायिक प्रक्टिस सुरु ठेवून इतर मानसोपचारतज्ञ ज्याचा विचार देखील करणार नाहीत ते आनंदनं प्रत्यक्षात आणायचं ठरवलं. कुशाग्र बुद्धिमत्ता, निर्मितीशील आणि उत्साहाने ओतप्रोत भरलेलं मन असलेला असा हा जगावेगळा डॉक्टर समाजाचं मानसिक आरोग्य सुधारण्याच्या ध्येयाने झपाटला. मग ‘मनोविकास’, ‘स्पंदन’, ‘पालक शाळा’, ‘त्रिदल’, ‘जिज्ञासा’ हे व असे विविध उपक्रम आनंदच्या आय. पी. एच. मधे सुरु झाले. अल्पावधीतच हे उपक्रम म्हणजे मानसिक आरोग्याची नवी दालनं समाजापुढे खुली करणारी कल्पक साधनं म्हणून अल्पावधीतच लोकप्रिय झाले. शालेय जीवनात विविध मानसिक समस्यांना सामोरे जाणारे विद्यार्थी, त्यांचे पालक, आणि इव्हन त्यांचे शिक्षक देखील या उपक्रमांचा लाभ घेऊ लागले. आय. पी. एच. च्या या अथक प्रवासादरम्यान गवसलेले एक महत्वाचे साधन म्हणजे ‘वेध व्यवसाय प्रबोधन परिषद’. ‘VEDH’ (Vocation. Education.. Direction and Harmony). १९९०च्या च्या दशकात जागतिकीकरणाचे, खुल्या अर्थव्यवस्थेचे  वारे वाहू लागले होते. संगणक युगाचा उदय होऊ लागला होता, शैक्षणिक क्षेत्रात अनेक  बदल होत होते, शिक्षणाच्या नव्या नव्या वाटा खुल्या होऊ लागल्या होत्या, रोजगाराच्या, करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होऊ लागल्या होत्या, विद्यार्थी आणि पालक यांच्या मनात संभ्रम निर्माण होत होता. अशा वेळेस डॉ. आनंद ने पुढाकार घेऊन एक व्यवसाय मार्गदर्शन  परिषद सुरु करण्याचं ठरवलं. त्याधीपासूनच आय. पी. एच. मधे शालेय विद्यार्थांसाठी बुद्यांक चाचणी (Aptitude Test) सुरु केलीच होती. त्याचप्रमाणे दर पंधरा दिवसांनी ‘टफ टीन क्लब’ या उपक्रमांतर्गत विविध व्यावसायिकांना बोलावून टीनएजर्स बरोबर संवाद साधण्याचा कार्यक्रम सुरु झाला. हा कार्यक्रम खूप विद्यार्थीप्रिय झाला. याला पूरक म्हणून अशी व्यवसाय, करिअर संबंधी मार्गदर्शन करणारी परिषद भरवण्याचे ठरले.त्याचा संपूर्ण आराखडा तयार झाला. सुरुवातीच्या काही मिटींग्ज ना मी हजेरी लावायचो पण दुर्दैवाने नंतर मी माझ्या इतर व्यापामुळे खूपच अडकलो आणि मला पुरेसा वेळ देता येईना.

डॉ. श्रीराम लागू

१९९१ च्या डिसेंबर महिन्यात ठाण्यातील शिव समर्थ विद्यालयाच्या एका सभागृहात पहिली वेध परिषद संपन्न झाली. त्याच्यात मात्र मी एक प्रेक्षक म्हणून सहभागी झालो होतो. समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या नामांकित व्यक्तींना आमंत्रित करून शालेय विद्यार्थांची आणि या व्यक्तींची थेट भेट घालून देण्याचा हा उपक्रम नवीनच होता. पहिल्याच वेध ला अमर चित्रकथा चे अंकल पै, डॉ. श्रीराम लागू, पोलीस आयुक्त सोमण, अशी दिग्गज मंडळी या परिषदेत मार्गदर्शन करण्यासाठी सहभागी झाली होती. त्या पहिल्या वेध चं व्यासपीठ म्हणजे  शिक्षकांना शिकवतांना उभा राहण्यासाठी जसं  स्टेज असत नं तसं स्टेज, त्याच्यावर अगदी साधी टेबल आणि अगदी साध्या खुर्च्या, मागे एक छोटा, वेध व्यवसाय परिषद असं लिहिलेला अगदी साधा कापडी फलक, आणि वर उल्लेख केलेली दिग्गज मंडळी! आणि  या सगळ्यांच्या जोडीला ज्यांच्यासाठी हा अनोखा जगावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला ते शालेय विद्यार्थी खूप मोठया संख्येने उपस्थित होते. सभागृह तुडुंब भरलं होतं. हा उपक्रम आयोजित करण्यामागे आनंद च्या मनात   ‘संवादातून जागृती निर्माण होईल, जागृतीतून कृती, योग्य कृतीतून विकास आणि या विकासाचं माध्यम असेल निवडलेला व्यवसाय!’ असा वैचारिक प्रवाह होता असं त्यानी नमूद केलं आहे. यादरम्यान एका बाजूला  उद्दिष्टांची दिशा दाखवणारा      बाण तर दुसऱ्या बाजूला जीवनातील सूर आणि लयीचं महत्व अधोरेखित करणारं स्वरमंडळ असं आकर्षक बोधचिन्ह तयार झालं. आनंदच्या मनातील या संकल्पनेला मूर्त स्वरूप दिलं ते ठाण्यातील सुप्रसिद्ध कलाकार आणि ऋषितुल्य व्यक्तिमत्व असलेले आदरणीय श्री. शांताराम राऊत यांनी. 

संजय जोशी,
ठाणे..

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: