अपने रास्ते —- आस्ते आस्ते !

रविवार, दिनांक २९ सप्टेंबर…पहाटेचे ५ वाजले –आणि सुरु झाला प्रवास….  पुण्याहुन नाशिककडे …अर्थातच “नाशिक वेध” साठी. आमचा रस्ता धुक्यात हरवलेला . सकाळचे साडेसात वाजले तरी सर्वत्र धुके आणि धुकेचे आणि मनात नाशिक वेधचे थोडेसे हटके सूत्र –“अपने रास्ते –आस्ते आस्ते” . काय बरे असेल या सुत्रा मागचा विचार? सिन्नर पर्यंत पोहोचलो तोपर्यंत धुके विरले होते. मनात वेध सूत्र माझ्यापरीने उलगडत गेले. ससा कासवाची गोष्ट डोळ्यासमोर येत होती. जीवनातील आपल्या मार्गावरुन जाताना कासवा सारख्या संथ, पण सातत्याने जात रहावे असा विचार या सूत्रात आहे असे वाटत होते. ९.४५ ला गंगापूर रस्त्यावरील रावसाहेब थोरात सभागृहावर पोहोचलो.

सोबत पुणे वेधच्या कार्यकर्त्या ज्योती शिरोडकर व शिल्पा चौधरी या पण होत्या. त्यांचा नाशिकला येण्याचा मकसद वेध होताच पण त्याहुनही एक वेगळा हेतु होता. त्यांच्या बालपणीची मैत्रीण सोनाली साळगावकर ,सोनालीची मुलगी मृण्मयी व पती निलेश आज वेधच्या व्यासपीठावर faculty म्हणून येणार होते. या तिघांसाठी त्यांचे येणे सरप्राईज भेट होती. सभागृहाच्या आवारातच त्यांच्या गळाभेटीचे मोहक दृश्य ,आनंद व आश्चर्ययुक्त चित्कार अनुभवायला मिळाले. तेवढ्यात नाशिक वेधचे कार्यकर्ते अमोल कुलकर्णी यांनी डॉ. नाडकर्णी व्यासपिठाकडे निघाले असे सांगितले आणि आम्ही सभागृहात प्रवेश करते झालो.

आजच्या नाशिक वेधचा माहोल काही वेगळाच होता. थीमला साजेसा backdrop ,प्रकाशयोजना , नेपथ्य याने रंगमंच खुलून दिसत होता. रंगमंचाच्या डाव्या बाजूला नाशिक वेधच्या गानवृंदासाठी मांडणी, उजव्या बाजूला संवादक डॉ. नाडकर्णी, सहसंवादिका वंदनाताई व सारीताताई यांच्या साठी सोफा व त्यांच्या डावीकडे faculty साठी सोफा अशी व्यवस्था छान दिसत होती. हे निरीक्षण चालू असतानाच वंदनाताई व्यासपिठावर येतात, नाशिक वेध चा गेल्या ८ वर्षांचा आढावा घेतात आणि डॉ. आनंद नाडकर्णी यांना रंगमंचावर आमंत्रित करतात. टाळ्यांच्या गजरात डॉक्टर व्यासपीठावर येतात आणि नाशिककरांना अभिवादन करतात आणि सुरु होतो एक आगळा दिवस.

दिवसाची सुरुवातच डॉक्टरांच्या विषय सूत्रावरील निरुपणाने, “अपने रास्ते- आस्ते आस्ते, आपल्या समोर अनेक रस्ते दिसतात. ज्याने त्याने जाणीवपूर्वक आपला रस्ता निवडायचा असतो.” ‘अपने’:आपले या शब्दाचे महत्व म्हणजे तो “आपला” रस्ता आहे हे मनाने मानले पाहिजे. रस्ते अनेक असतील पण आपण चालत असलेला रस्ता ‘आपला’ मानणे खूप महत्वाचे आहे. असे केल्यास त्या रस्त्यावर चालताना टाकलेल्या प्रत्येक पावलाची आपण जबाबदारी आपण घेऊ. ‘आस्ते –आस्ते’ हा शब्द बुचकळ्यात टाकणारा आहे पण आस्ते आस्तेचा अर्थ गतीशी लावावयाचा नाही तर सावधपणाशी लावावयाचा”, असे प्रतिपादन करत डॉ. नाडकर्णी म्हणाले, “आस्ते आस्ते म्हणजे सावधतेचा, अलर्टनेस चा मार्ग. आस्ते आस्ते म्हणजे प्रत्येक पाऊल काळजीपूर्वक पण ठाम असे घेतले तर अपने रास्ते –आस्ते –आस्ते –हसते – हसते पार करता येते”.

किती समर्पक अर्थ डॉक्टरांनी उलगडून दाखवला! यावरूनच सहज कळते डॉक्टर मनोविकासतज्ञ म्हणून किती थोर आहेत. डॉक्टरांनी एका ठिकाणी म्हंटले आहे ते मला आठवले, “चिंतन ही सेवा आहे आणि सेवेत चिंतन” . महाराष्ट्रच नव्हे तर देशाला असा तत्वचिंतक विचारवंत व मानसिक आरोग्य सेवेत मग्न कार्यकर्ता लाभला ही किती भाग्याची बाब आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली, या वटवृक्षाच्यासावलीत आम्ही वेध कार्यकर्ते वाटचाल करीत आहोत हे आमचे परमभाग्य!  

आपापल्या रस्त्यावर मनस्वीपणे चालत राहणाऱ्या पाच faculty नाशिक वेधच्या मंचावर आल्या आणि रविवारचा हा दिवस एका upbeat नोट वर संपला.नाशिक वेध एका वेगळ्या उंचीवर गेला. या प्रत्येकाने मार्गक्रमण करत कसे शिखर गाठले हे मुळातून ऐकण्यासारखे आहे . (लवकरच AvahanIph या यु- ट्यूब चॅनेल वर या मुलाखती ऐकता येतील) चंडीगडहून आलेले IAS अधिकारी श्री. अजित जोशी असो की सुझुकी स्कूल च्या रमा चोभे आणि त्याचे १० विद्यार्थी असो, या सर्वांमुळे आपल्या मार्गावरून जातानाचे नवे भान मिळाले. प्रशासकीय सेवेत असतांना ‘त्याच’  चौकटीत राहून सुद्धा ‘मेरा रास्ता’ हा ‘अपना रास्ता’ कसा बनतो हे अजित जोशी यांनी दाखविले.


IITian नचिकेत कुंटला या कानपूरहून आलेल्या पण नगरच्या अस्सल मराठमोळ्या मातीतील तरुणाने विज्ञानाची कास धरत फुलांच्या निर्माल्याला संपन्नतेची जोड कशी दिली हा त्याचा व त्याचा मित्र अंकित यांचा प्रवास उलगडून दाखविला नाही तर विज्ञान हा त्याचा धर्म कसा झाला  हे अत्यंत सुंदरपणे मांडले .२०२४ च्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी, आपल्या प्रयत्नांना यश येण्यासाठी १० /१२ तास रोज प्रॅक्टिस करणारी भारतातील पहिली रोइंग कन्या बनण्याचे नुसते स्वप्नच न बघता त्यासाठी सर्वस्व देणारी मृण्मयी साळगावकर ही १६ वर्षांची मुलगी अपने रास्ते पर कशी जाते आणि तिचे पालक तिला सांगतात, “अनुभवातून शिकणं हे खरं शिकणं, लौकिक ज्ञान नंतर ही घेता येईल” . त्यानंतर आलेल्या ओंकारी व अनिता यांनी त्यांच्या स्वयं क्षमतेचा मार्ग दाखविला. ओंकारी दिल्लीत cab driving करतात .त्यांच्या सारख्या २००० स्त्रिया आज वहान चालक म्हणून काम करीत आहेत. यासाठी अनिता आझाद फाउंडेशनच्या माध्यमातून स्त्रियांना स्वयं क्षमतेचा मार्ग दाखवत आहेत. नाशिक वेधचे अंतिम सत्र होते रमा चोभे व त्यांच्या १० शिष्यांचे. सुझुकी स्कूल ऑफ व्हायोलीनच्या माध्यमातून सुरांचा संस्कार त्या मुलांमध्ये पेरतात. त्यांच्या व्हायोलीनच्या सुरांवर वेध संपन्न झाला.

डॉक्टर नाडकर्णी म्हणतात ते खरे आहे, “प्रत्येक वेध नवीन अनुभव देत असतो.आपल्या माणूसपणात भर घालत असतो. सहवेदना, सहचार्य, सहमतीची भावना निर्माण करतो वेध!!” 
हेतूविण प्रयास, दिशेविण प्रवास
O2 विना तोकूडा प्रत्येक श्वास …
डाॅक्टरांच्या वेध गीतातील या ओळींमध्ये जीवनाचे सार आहे. जगण्यासाठीचा अर्थ आहे.
अपने अपने रास्ते आस्ते आस्ते, हसते हसते चालत रहाण्याचा मंत्र आहे.

दीपक पळशीकर,
आयोजक,
पुणे वेध

        

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: