बदल पेरणारी माणसं पुणे वेध २१, २२ सप्टेंबर २०१९

ये हौसला कैसे झुके….. असं म्हणणारी माणसं वेगळीच असतात,
त्यांना चालत असताना त्यांचं ध्येय गवसत जातं
त्या ध्येयानं ते झपाटले जातात, वेडे होतात
आणि त्यांना त्यांच्या या वाटेवरून कोणीही
परावृत्त करू शकत नाही…
कारण त्यांचा निश्चय पक्का असतो,
स्वतःवरचा विश्वास अढळ असतो
ही माणसं काय मिळेल याची अपेक्षा करत नाहीत
रस्त्यातल्या काट्याकुट्यांची ते पर्वाही करत नाहीत
ती फक्त चालताना वाटेत बिया पेरत जातात
त्यातल्या काही रुजतात, काही नाही
त्या रुजलेल्या बियातून अंकुर फुटतात
आणि एका बदलाला सुरुवात होते
ज्या वेळी हे बदल दिसायला लागतात,
त्या वेळी या माणसांकडे बघून मनात येतं –
हीच ती बदल पेरणारी माणसं
कशी असतात ही बदल पेरणारी माणसं?
या वेळच्या पुणे वेधच्या दोन दिवसांत
अशी ११ बदल पेरणारी माणसं भेटली
त्यांच्या भेटीनं, त्यांच्याबरोबरच्या संवादानं
मन प्रफुल्लित झालं, ताजंतवानं झालं
आणि नकळत हात पुढे झाला
तो हात मागत होता, नवं बीज पेरण्यासाठी!

दरवर्षीच या दोन दिवसांची प्रतीक्षा असते. अखेर २१ सप्टेंबर २०१९ ची सकाळ उगवली. पावलं पुण्यातल्या यशवंतराव चव्हाण नाट्यगृहाकडे वळली. दरवर्षीप्रमाणेच परिसरापासून ते आत व्यासपीठापर्यंत उत्साही पुणे वेधवासियांची लगबग सुरू होती. मीही त्या लगबगीचा हिस्सा झाले. ओळखीचे अनेकजण भेटले. बघता बघता गर्दीनं हॉल फुलून गेला आणि व्यासपीठावरचा पडदा हलकेच बाजूला सरकला.

व्यासपीठावर डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर प्रसन्न हास्य घेऊन स्वागत करत होते. पुणे वेधचा गानसमूह सर्वांच्या स्वागतासाठी सज्ज झाला होता. या वेळी पुणे वेधसाठी डॉक्टरांनी लिहिलेलं आणि संगीतबद्ध केलेलं गीत या समूहानं सादर केलं. गीताचे बोल होते:
कुंपणे तोडून सारी, विरघळून गेले काही
काळाने द्यावी दाद, हा हट्टही धरला नाही…
वेधची या वेळची ‘बदल पेरणारी माणसं’ ही संकल्पना सिद्ध करणारं हे गाणं होतं. मन आपसूक गायला लागलं.
झपाटलेपण त्यांचे, कोंबातच मुरले होते
हर श्वासामध्ये त्यांच्या, हरण्यावर औषध होते

ही झपाटलेली माणसं किती चिकाटीनं चालत असतात, त्यांच्या शब्दकोषात हार शब्द असला तरी त्याला विशेष महत्व नसतं. त्या हारण्याचीही तमा ते बाळगत नाहीत. कुठल्या मर्यादा, कुठले अडथळे त्यांना त्याच्या वाटेवर अडवू शकत नाहीत. त्यातच कोणी तोरणं, पताका लावाव्यात आपली दखल घ्यावी अशी अपेक्षाही ही माणसं करत नाहीत.
गाणं संपलं होतं, डॉ. आनंद नाडकर्णीनी वेध आता आपल्याला सणासारखाच वाटतो असं सांगून नवीन कपडे शिवायचे असले तरी मी वेधच्या आधी शिवतो असं गमतीनं सांगितलं.

डॉक्टर उपस्थितांना वेधविषयी माहिती देत होते ः वेधची जवळपास २५० च्या वर सत्र आवाहन आयपीएच वर सर्वांना निःशुल्क बघायला मिळणार आहेत. ९ ते १० महिन्यांत २८ हजारांहून अधिक लोकांनी ही सत्रं यूट्यूबवर बघून त्याचा आनंद लुटला आहे. रोज २०० ते ३०० लोक ही सत्र बघतच आहेत. वेध आता जास्त विस्तारत आहे. पुढल्या वर्षी बदलापूर आणि मुंबई (पार्ले-अंधेरी) अशा दोन ठिकाणी वेध सुरू होत आहे. तसंच त्यानंतर खानदेश आणि विदर्भ इथेही वेध सुरू होण्याच्या तयारीत आहे. थोडक्यात महाराष्ट्रातली १५ शहरं वेधचा सोहळा दरवर्षी साजरा करतील. वेध सामाजिक आणि सांस्कृतिक गोष्टी ऑडियो/व्हिडीयो स्वरूपात डॉक्यूमेंट करत आहे आणि ते खूप गरजेचं आहे. वेधचे कार्यक्रम अनौपचारिकता जपत संपन्न होतात हेही वेधचं वैशिष्ट्य आहे.  वेधबरोबरच पुणे आणि नाशिक इथं दर महिन्याला वेध कट्टा भरतो आहे. वेधचे कार्यकर्ते कधीही व्यासपीठावर येऊन मिरवत नाहीत हे त्यांचं वैशिष्ट्य! ( मला मात्र या वेळी आवर्जून असं वाटलं की वेधची सांगता होत असताना व्यासपीठावर वेधच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी यावं. वेधच्या संपन्न होण्यामागे इतके हात, इतकी डोकी कार्यरत होती हे श्रोत्यांना कळायला हवं.) वेधमधून अनेक चांगलं काम करणार्‍यांना क्राऊड फंडिंग मिळतं. गेवराईचा संतोष गर्जे याचं सत्र ऐकून अनेक श्रोत्यांनी त्याला सढळ हातानं आर्थिक मदत केली आणि त्यातून त्याचं मुलींसाठीचं वसतिगृह उभं राहिलं. वेध एकप्रकारे एक चळवळ बनते आहे.

या वर्षीचं वेधचं विचारसूत्र बदल पेरणारी माणसं यावरही डॉक्टरांनी उपस्थितांबरोबर संवाद साधला. आपल्या कुटुंबामध्ये, समाजामध्ये काहीतरी चांगलं व्हावं, चांगला बदल व्हावा असं प्रत्येकाला वाटत असतं. बदल हा आपण चांगला असंच समजतो. यात पेरणं, रूजणं आणि रुजलेलं वरती येणं आणि फुलणं यात काही काळ जावा लागतो. बदल हा पेरणार्‍या माणसांच्या नजरेसमोरच होईल असं काही सागता येत नाही. तरीही त्या माणसाला पेरत जायचं असतं. बोरकरांची कविता ‘पेरते व्हा’ ही हेच सांगते. बदल करणारी माणसं प्रयत्न करत राहतात. कधीतरी त्या प्रयत्नांना यश मिळेल ही आशा त्यांना असते. त्यांचा पेरण्यावर, रुजण्यावर आणि कोंब उमलून वर येण्यावर विश्वास असतो. मात्र हे सगळं त्यांच्या नजरेसमोर नाही घडलं तरी त्यांना त्याची पर्वा नसते.

हा बदल कशाकशात होतो, तर पहिला बदल माणसाच्या दृष्टिकोनात होतो. दृष्टिकोनात बदल झाला की कृतीत बदल होतो. दृष्टिकोनात केवळ वैचारिक बदल होऊन चालत नाही तर त्यात भावनेचीही जोड लागते. कारण भावना नसेल तर विचार रूक्ष होतात. आणि विचारांशिवाय भावना अनाथ बनते. बदल पेरणारी माणसं आपलं आणि समाजाचं उद्दिष्ट यांना एकत्र जोडतात. ही दोन्ही उद्दिष्टं कधी एकरूप होतात हे सांगता येत नाही. बदल पेरणं म्हणजे समाजाविरोधात बंड पुकारणं असतं का, प्रवाहाच्या विरूद्ध पोहणं असतं का? कधी कधी हे पोहणं प्रवाहाच्या विरूद्धच असतं असं नाही तर ते प्रवाहालाच वेगळं वळण लावणारंही असतं. खरा बदल तोच जो प्रवाहालाच बदलतो. त्यासाठी कधी कधी स्वतःचा एक ओहोळ तयार करावा लागतो. याच ओहोळाची नंतर मोठी नदी तयार होते. प्रवाहाबरोबर चालत असतानाही अनेक अडथळे येत असतात, ते बाजूला सारावे लागतात, त्यांना पार करूनच पुढे जावं लागतं. प्रवाहाला आलेली गढूळता दूर करून पुन्हा त्या प्रवाहाला निर्मळ बनवणं ही बदल पेरणारी माणसं करत असतात. बदल खूप वेगवेगळ्या तर्‍हेचे असतात.

ही बदल पेरणारी माणसं नेमकी कशी असतात? तर ही माणसं तुमच्याआमच्यासारखीच असतात. फक्त त्यांना एक सत्य समजलेलं असतं. माझं आयुष्य फक्त वैयक्तिक स्वार्थापुरतं मर्यादित नाही आणि मला जे इतरांसाठी करायचंय ते मी माझ्या हयातीतच करेन. भले त्याचा परतावा मला मिळो वा ना मिळो. 

बदलाविषयी आणि बदल पेरणार्‍या अशा वेड्या माणसांविषयी डॉक्टरांचं बोलणं झालं आणि मन आता अशा बदल पेरणार्‍या माणसांची वाट पाहू लागलं, त्यांना बघण्यासाठी ते आतुर झालं असतानाच नुपुरा किर्लोस्कर आणि जान्हवी जोशी या अवघ्या २६ वर्षांच्या गोड तरूणी व्यासपीठावर आल्या. साधारण दोन वर्षापूर्वी जान्हवी आणि नुपुरा वेधचा कार्यक्रम बघायला आल्या होत्या. एक खराखुरा जिवंत प्रेरणादायी अनुभव त्यांना त्या वेळी वाटला होता. नुपुरा आणि जान्हवी या व्यासपीठावर स्थानापन्न झाल्या आणि लगेचच समोरच्या पडद्यावर ‘कोशिश’ या अतिशय अप्रतिम अशा चित्रपटातला एक प्रसंग दाखवण्यात आला. या चित्रपटात संजीवकुमार आणि जया भादुरी/बच्चन यांनी मूकबधिराची भूमिका केली होती. नुपुरा आणि जान्हवी यांच्याही आयुष्यात मूकबधिर मुलामुलींनी प्रवेश केला आणि त्यांच्या रोजच्या जगण्यातले अडथळे, त्यांचे प्रश्न, त्यांचा आनंद, त्यांची भाषा हे सगळं समजून घेण्याची उत्कंठा दोघींना लागली. दोघीही साईन लँग्वेज शिकल्या आणि त्याच भाषेत मूकबधिर मुलामुलींशी बोलायला लागल्या, तेव्हा त्यांच्यात एकमेकांविषयी जवळीक निर्माण झाली. सिंपथीपेक्षा एम्पथी असणं महत्वाचं. सिंपथी ही बाह्यभावना तर एम्पथी आत असते. आणि डिसेबल व्यक्तींविषयी एम्पथी असणं खूप महत्वाचं दोघींनाही वाटतं. दोघींच्याही घरात, आसपास कोणीही मूकबधिर नाही हे कळल्यावर मूकबधिर मुलामुलींना नुपुरा आणि जान्हवी यांच्याविषयी खूप आश्चर्य वाटतं आणि त्या आपल्यासाठी धडपडताहेत हे कळताच त्यांना आनंदही झाला.

काम करताना कधी कधी नैराश्याचे क्षणही आले तेव्हा दोघींनी एकमेकींना आधार दिला. ज्यांना आजपर्यंत यश मिळालंय त्यांची यशाची मोजमापं वेगळी आहेत किंवा होती, त्यांचे रस्ते देखील वेगळे होते. आपले रस्ते नवे आहेत त्यामुळे आपलं यश आणि आपली यशाची मोजमापंही वेगळी असणार आहेत. त्यामुळे इतर ठिकाणी बघून निराश होण्याचं कारण नाही आपण निराशा झटकून काम केलं पाहिजे हे दोघींना समजलं. पुढे जसा रस्ता फुटत जाईल तसं आम्ही चालत राहू असं दोघींनी सांगितलं. नुपुरानं सत्राच्या शेवटी तिच्या आजोबांनी शिकवलेलं गाणं गायलं. ‘एका तळ्यात होती, बदके पिले सुरेख, होते कुरूप वेडे पिलू तयात एक……त्याचे तया कळाले तो राजहंस एक.’

डॉक्टर म्हणाले, आपल्या सगळ्यांमध्ये एक राजहंस दडलेला असतो पण तरीही आपण आपल्याला कुरूप मानत असतो. आपणच आपल्या क्षमता नीट पडताळून बघितलेल्या नसतात. राजहंस बनणं म्हणजे फक्त बाह्यरंगातला डौल नव्हे तर राजहसं बनणं म्हणजे नव्या कल्पना आपल्या मनात बांधणं आणि त्या कल्पनांचा इतरांना उपयोग होणं ही सगळी त्या राजहंसाची भरारी असते. बुद्धीचा, कल्पकतेचा, एम्पथीचा डौल म्हणजे खरा राजहंस, आणि तो या हा दोघींना गवसला. राजहंसाचं महत्व त्याला नीरक्षीरविवेक आहे. त्याचप्रमाणे नुपुरा आणि जान्हवी यांनी मला काय करायचंय आणि इतरांसाठी काय करायचंय हे नीट विचार करून राजहंसाप्रमाणेच ठरवलंय. हा विवेक त्या जगताहेत आणि इतरांना शिकवताहेत. राजहंस सुद्धा नेहमी वेगळ्या आकाशाचा शोध घेत असतो असं म्हणत डॉक्टरांनी म्हंटलं. त्या सत्राचं क्षणचित्र पुणे वेधतर्फे दोघींना भेट दिलं गेलं आणि त्यांच्या पुढल्या प्रवासासाठी सर्वांनी टाळ्यांच्या गजरात शुभेच्छा दिल्या. नुपुरा आणि जान्हवी यांनी साईन लँग्वेजमध्ये सगळ्यांना ‘थँक्यू’ म्हटलं.

नुपुरा आणि जान्हवी यांनी दोघींनीही शालेय शिक्षण मराठी माध्यमातून घेतलं. इंग्रजीचा न्यूनगंड शाळेत असताना कधी वाटला नाही, पण एमआयटीमध्ये गेल्यावर सगळे मुलंमुली इंग्रजी बोलत असताना इंग्रजीची भीती निर्माण झाली आणि त्या वेळी नुपुरा आणि जान्हवी जास्त एकत्र आल्या. पुढे इंग्रजीची भीती हळूहळू कमी झाली. दोघींनी एक प्रोजेक्ट करायला घेतला आणि याच प्रोजेक्टनं त्यांना त्यांच्या आयुष्याचं ध्येय मिळवून दिलं. या प्रोजेक्टमुळेच नुपुरा आणि जान्हवी यांना ब्ली-टेक इनोव्हेशन्स नावाची कंपनी काढण्याची स्फूर्ती मिळाली. त्यांनी त्यानंतर तंत्रज्ञानाचा वापर करून कर्णबधिरांसाठी ब्ली वॉचची निर्मिती केली आहे. यामुळे कर्णबधिरांना समोरचा बोलत असलेली भाषा तर समजतच, पण त्यांना नृत्यही करता येतं. नुपुरानं शास्त्रीय संगीताचं शिक्षण देखील घेतलंय, तर जान्हवीनं कथ्थक नृत्यप्रकारातलं शिक्षण घेतलंय.
—-

दुसर्‍या सत्रात ध्रुवांग हिंगमिरे आणि प्रियांका गुंजीकर या जोडप्याचं आगमन झालं. पर्यावरणाविषयी संवेदनशील असणारं हे जोडपं! दोघंही आर्किटेक्ट असून लॉरी बेकरला आपला आदर्श मानतात. लॉरी बेकरच्याच वाटेवर चालत पर्यावरणपूरक काम करण्याचा ध्यास त्यांनी घेतलाय. मुंबईला त्यांनी आर्किटेक्चर या शाखेतली पदवी घेतली. वाळू, सिमेंट, लोखंड हे सगळं पर्यावरणाला घातक असल्यानं त्या वस्तू न वापरता निसर्गाला उपयोगी असणार्‍या वस्तूंचा वापर करून त्यांनी बांधकाम सुरू केलं. जगातल्या वेगळ्या वाटेवरून चालणारं हे जोडपं असल्याचं डॉ. ज्योती शिरोडकर यांनी सांगितलं. ध्रुवांगला किटक आणि पक्षी बघणं आवडतं. प्रियांकाला निसर्ग आवडतो, मात्र तिला किटकांची भीती वाटते. 
हेतूविना प्रयास दिशेविना प्रवास
ओटूविना तो उणा प्रत्येक श्वास
या वेधगीतानं ध्रुवांग आणि प्रियांका यांचं स्वागत करण्यात आलं. ध्रुवांग आणि प्रियांका यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
माणसाच्या उत्क्रांतीचा इतिहास बघितला तर वातावरणाप्रमाणे ते ते भाग विकसित होत गेले. सुरुवातीला माणूस शिकार करायचा आणि आपलं पोट भरायचा. त्यानंतर जगभरातली आदिवासी संस्कृती उदयाला आली. आदिवासी पाड्यांवर कुडाची, कार्वीच्या काड्या वापरून केलेली घरं आढळतात. नंतर माणूस शेतीकडे वळला, घरांना पक्क स्वरूप येत गेलं. शेण, माती, दगड यांचा वापर वाढला. गावगाड्यामध्ये जे बलुतदार होते त्यांचाही या लोकांच्या घरबांधणीत हातभार लागला. घरबांधणीची कला विकसित होत गेली. त्या त्या ठिकाणची, उपलब्ध असणारी संसाधनं वापरून ही घर बांधली गेली.

१८९० ते १९०० या काळात सिमेंट वापरणं सुरू झालं. भारतात तर १९१० नंतर सिमेंट वापरायला सुरुवात झाली. परंपरागत बांधकाम झुगारून माणसानं या १०० वर्षांतलं सिमेंट वापरायला सुरुवात केली. पाश्चात्य देशांना बघून आपल्या विकासाच्या कल्पना ठरत गेल्या. खरं तर मातीच्या घरात उन्हाळ्यात थंड वाटतं आणि थंडीत उबदार….असं असलं तरी केवळ इतरांना दाखवण्यासाठी लोकांनी सिमेंटची घरं बांधायला सुरुवात केली.

पर्यावरणपूरक घरं बांधण्याची सुरुवात ध्रुवांग आणि प्रियांका यांनी केली. मातीची घरं १००-२०० वर्षांहून जास्त टिकताना दिसतात. सिमेंट कसं बनवतात (दगडाचा चुरा आणि वाळू वापरून) याबद्दल ध्रुवांग यानं सांगितलं. ज्या वेळी सिमेंटच्या इमारती पडतात, तेव्हा त्या पडलेल्या बांधकाम साहित्याचा पुन्हा काहीही उपयोग होत नाही. सिमेंटचं विघटन करता येत नाही आणि विघटन करून पुन्हा निसर्गाकडे ते पोहोचवता येत नाहीत.

लॉरी बेकरची गोष्ट धृवांगनं सांगितली. भारतात येऊन या माणसानं पर्यावरणपूरक घरं कशी बांधली याबद्दल सांगितलं. गांधीजींच्या एका भेटीनं त्यांच्यावर कसा प्रभाव पडला आणि त्यांनी कशी प्रेरणा घेतली याबद्दलही उपस्थितांना माहिती मिळाली. लॉरी बेकरनं सिमेंटचा वापर न करता वा कमीत कमी वापर करून घरं कशी बांधली याबद्दल धृवांगनं सांगितलं. जिथं घर बांधायचं तिथल्या आसपासच्या संसाधनाचा वापर करावा आणि बांधकामासाठी माणसंही तिथलीच असावीत हा गांधीजींचा विचार लॉरी बेकरनं अंमलात आणला. स्वतः लॉरी बेकर बांधकाम करत आणि इतरांना कसं करायचं शिकवत. त्यातूनच त्यांनी नवनवीन पद्धती अंमलात आणल्या. लॉरी बेकर यांनी बांधकामाबद्दल लिखाणही केलं. लॉरी बेकरमुळे अनेक लोक प्रभावित झाले आणि निसर्गपूरक बांधकाम करायला प्रवृत्त झाले.

सिमेंटमुळे आरोग्यावरही कसे परिणाम होतात याविषयी देखील धृवांगनं उपस्थितांना सतर्क केलं. सिमेंटमुळे उन्हाळ्यात घर तापत राहतं आणि थंडीत ते थंड होत राहतं. हे घर श्वास घेत नाही.
धृवांगच्या म्हणण्यानुसार आपलं एखादं काम लोकांना आवडलं की आपण तसंच आणि तेच ते काम करायला लागतो. हा त्या माणसाचा कम्फर्ट झोन असतो. हा कम्फर्ट झोन सोडायला हवा. नवीन कल्पना शोधायला हव्यात. धृवांग आणि प्रियांका यांनी एकमेकांना साथ देत असतानाच हा कम्फर्ट झोन सोडायचं ठरवलं. आपल्या ज्ञानाला अनुभवाची जोड द्यायचं ठरवलं. विकास आणि वाढ म्हणजेच ग्रोथ आणि डेव्हलपमेंट यातला फरक त्यांच्या बोलण्यातून उपस्थितांना समजत गेला.
———

लालसू सोमा नागोटी आणि उज्ज्वला मालू बोगामी या गडचिरोलीहून आलेल्या आदिवासी जोडप्यानं व्यासपीठावर प्रवेश केला. लालसू हा माडिया समाजातला पहिला वकील! पुण्यातल्या फर्ग्युसन कॉलेजमधून शिक्षण घेऊन त्यानंतर कायद्याचा अभ्यास करून भामरागड इथं काम करतो आहे. त्याची पत्नी उज्ज्वला ही देखील माडिया समाजातली असून तिनं बीए डीएड केलं असून पहिलीच्या मराठीच्या पुस्तकाचं तिनं माडिया भाषेत भाषांतर केलं आहे. आपल्या पतीला त्याच्या शिक्षणापासून ते आजपर्यंत सर्वच कामांत उज्ज्वलानं बरोबरीनं सहभाग दिला आहे.

माडिया गोंड समाजातली पहिली एलएलबी झालेली व्यक्ती म्हणजे लालसू सोमा नागोटी! एमए सोशालॉजी आणि पत्रकारितेचा कोर्सही त्यानं केला. शिक्षण घेऊन पुन्हा कामासाठी तो भामरागडला गेला. उज्ज्वला शिक्षिका असून आदिवासी मुलांना शिकवते. भामरागडच्या गोटूल समितीचा लालसू सदस्य आहे. मानवी अधिकार आणि हक्क असोत वा खाणींचा प्रश्न लालसूनं याविरोधात आवाज उठवला असून त्यानं युनायटेड नेशन्स इथे भरलेल्या परिषदेत भारताचं प्रतिनिधित्व केलं. लालसू आणि उज्ज्वला या जोडप्याचा प्रवास डॉ. नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी त्यांच्याशी संवाद साधून उलगडला.
या दोघांचे स्वागत करण्यासाठी पुणे वेध क्वॉयरनं गीत सादर केलं:
कसे होतसे वाद शहाणे, चला घेऊ या त्याचा शोध
भान दिशेचे, जाण स्वतःची, लपला यातच सुंदर बोध

आदिवासी संस्कृतीमध्ये लय ताल असून ते निसर्गाच्या अगदी जवळ असतात. आदिवासी समाजातून आलेल्या लालसूनं त्यांच्या परंपरांविषयी माहिती सांगितली. ज्या वेळी शहरी लोक नाचतात, तेव्हा त्यांना बघणारे अनेक जण असतात, पण आदिवासी जेव्हा गोटूलमध्ये नाचतात तेव्हा त्यांना बघायला कोणी नसतं. त्याची त्यांना गरजही वाटत नाही. प्रत्येक गोष्टींचा आदिवासी पंडूम म्हणजे उत्सव साजरा करतात. धान्य पेरण्यापूर्वी, धान्य पेरताना अशा अनेक वेळी ते पंडूम करतात. जल, जंगल, जमीन यांच्याशी आदिवासींचं अतुट नातं आहे. निसर्गातल्या सगळ्या गोष्टींची ते मनापासून पूजा करतात.

आदिवासींमध्येही अनेक जाती आहेत. माडिया आणि गौंड या दोन्ही जाती जवळजवळच राहतात. या दोघांतही भाषेपासून अनेक गोष्टीत अनेक फरक दिसतात. गडचिरोलीमध्ये माडिया जास्त प्रमाणात आढळतात.

लालसूचा जन्म भामरागडजवळ झाला. त्याच्या घरात कोणीच शिकलं नव्हतं. लहानपणी त्याचे वडील वारले. लालसूच्या आईचं दुसरं लग्न झालं आणि ती नवर्‍याबरोबर निघून गेली. लालसू आणि त्याची भावंडं तसं पाहिलं तर अनाथ झाली आणि मिळेल ते काम करू लागली. हेमलकशाला कोणीतरी लालसूला नेलं. बालवाडीपासून ते दहावीपर्यंत त्याचं शिक्षण तिथेच झालं. ज्या वेळी लालसू हेमलकशात गेला, त्या वेळी अंगात घालायला त्याच्याजवळ लंगोट देखील नव्हता. हेमलकशाच्या शाळेत लालसूला खूप शिकायला मिळालं. सरकारी आश्रमशाळा आणि ही शाळा यात गुणात्मक फरक खूप होता. हेमलकशाच्या शाळेत अभ्यासाबरोबर लाईफ स्किल्स देखील शिकवली जातात. प्राण्यांबरोबर राहून अभ्यासही झाला. मुलं त्या वेळी साफसफाईपासून अनेक कामं कौशल्यपूर्ण रीतीनं करायची.

लालसू हुशार असल्यानं दहावीनंतर त्याला आनंदवनला पाठवण्यात आलं. आनंदवनात लालसूनं सोनाली बढे या मैत्रिणीबरोबर अकरावी-बारावी आणि प्रथम वर्ष केलं. येणार्‍या पाहुण्यांना आनंदवनची माहिती देणं, साफसफाई करणं अशी अनेक कामं तो करायचा. डॉ. भारती आमटे यांना लालसूची हुशारी लक्षात आली होती. त्यांनी लालसूला पुण्यात पाठवण्यात पुढाकार घेतला. त्यानंतर तो पुण्यात फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकायला आला. तिथे त्यानं मराठी घेऊन बीए केलं. पुण्यात विद्यार्थी साहाय्यक समितीमध्ये ‘कमवा आणि शिका’ या योजनेमध्ये तो सहभागी झाला.
भामरागडला अनेक आदिवासींना नक्षलवादी समजून पोलीस पकडत आणि त्यांना मारत, त्यांच्यावर केसेस दाखल करत. अशा अनेक घटनांनी लालसू अस्वस्थ होत असे. अशा वेळी आपण काहीतरी केलं पाहिजे या विचारानं लालसूनं कायद्याचं शिक्षण घेण्याचा निर्णय घेतला. शिकत असताना पुण्यातल्या अनेकांनी त्याला मदत केली. कधी कपडे घेवून दिले तर कधी त्याची फी भरली, तर कधी गावाकडे जायला प्रवासाला पैसे दिले. नीलिमा भडभडे, वैजयंती जोशी या प्रोफेसरनी लालसूला खूप मदत केली.

वातावरणाशी जुळवून घेताना लालसूला खूप त्रासही झाला. पुण्यात आला तेव्हा लालसूच्या कोणी ओळखीचंही नव्हतं. त्याच्याशी कोणी बोलायचं नाही. तो मराठी नाही हे लोकांना जाणवायचं. परिस्थितीनं जुळवून कसं घ्यायचं हे या काळात तो शिकला. शिक्षण झाल्यावर लालसू नागपूरला जाऊन काम करू लागला. मात्र त्या वेळी लक्षात आलं की त्याच्या समाजाचे लोक नागपूरपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यामुळे लालसूनं भामरागडला जाऊन काम करायचा निर्णय घेतला. त्याला त्याच्या समाजातल्या लोकांशी संवाद साधायचा होता, त्यांना मदत करायची होती, त्यांच्यावरचा अन्याय दूर करायचा होता.

लालसूनं राजकारणाबद्दल तिथल्या लोकांना सजग केलं. लोकांनी उमेदवार द्यायचे, पक्षानं नाही हे धोरण राबवलं. लोकांनी एकत्र येऊन मिळून पैसे उभे करायचे आणि निवडणुकीसाठी खर्च करायचं काम केलं. लोकांना जंगलाच्या कायद्याविषयी, आदिवासींच्या कायद्याविषयी ज्ञान त्यांना देण्याचं काम सुरू केलं. त्यासाठी त्यानं अभ्यासवर्ग घेण्याचं सुरू केलं. भारतात खाणीमुळे विकास झाला नाही आणि होऊ शकत नाही असं लालसूनं अभ्यासाअंती सांगितलं. लोकांनी सरकारविरूद्ध या विषयावर संघर्षाची भूमिका घेतली.

लालसूनं संयुक्त राष्ट्र संघटनेत स्वित्झलँडला भारताचं प्रतिनिधीत्व करण्यासाठी निवडला गेला.
लालसूचे सासरे राजकारणात सक्रिय होते. जिल्हा काँगे्रस कमिटीचे ते अध्यक्ष होते. तसंच अनेक पदं ते भूषवत होते. त्यांनी लालसूला बघितलं आणि त्याला सरकारी नोकरीचा प्रस्ताव दिला. पण लालसूनं त्या वेळी नोकरीचा प्रस्ताव नाकारला आणि आपल्याला आणखी शिकायचं असल्याचं सांगितलं. त्यांना लालसूचं कौतुक वाटलं. काही दिवसांनी त्यांनी आपल्या मुलीसाठी – उज्ज्वलासाठी – लालसूचा जोडीदार म्हणून विचार केला आणि पुढे दोघांचं लग्न झालं.

उज्ज्वला आदिवासी असून ती हाडाची शिक्षिका असल्याचं तिच्या भाषेवरून लक्षात येतं. बोलताना ती ‘मानवी समूह’ वगैरे शब्दांचा वापर अगदी सहजपणे करत होती. तिला शिक्षिका म्हणून ३००० रुपये मिळत आणि त्यात स्वतःचा उदरनिर्वाह करत ती लालसूला पुण्यात असल्यानं त्यालाही पैसे पाठवायचं काम करायची. सुरुवातीला उज्ज्वलाच्या भाषेवरून लोक ती आदिवासी असल्याचं ओळखत. उज्ज्वलाला आदिवासी म्हटल्याचं दुःख व्हायचं नाही, पण आपल्याला चांगलं मराठी येत नसल्याचं दुःख व्हायचं आणि तिनं आपल्या मराठी भाषेवर खूप प्रयत्नपूर्वक अभ्यास करून यश मिळवलं.

शिक्षिका म्हणून काम करताना उज्ज्वलाला मुलांच्या अडचणी समजत गेल्या. मुलांना मराठी भाषा किती किचकट वाटते हेही तिच्या लक्षात आलं. ही मुलं हुशार असूनही त्यांना या भाषेचा परिचय नसल्यानं ती भांबावून जायची. ही गोष्ट लक्षात आल्यानं मराठीची पुस्तकं माडियात करण्याचा निर्णय झाला आणि उज्ज्वलानं त्यात पुढाकार घेऊन हे काम केलं.

जंगलातून आलेला लालसू हा एक मुलगा कुठपर्यंत झेप घेऊ शकतो हे या सत्रानं सांगितलं. प्रकाश आमटे, बाबा आमटे यांनी जी बीजं पेरली त्याची फळं म्हणजे लालसू आणि उज्ज्वला. बदल पेरणार्‍या माणसांची एक साखळी असते आणि हा बदल पुढे नेत जायचा असतो. डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी लालसू आणि उज्ज्वला यांना पुढल्या प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या तर उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटात त्यांना निरोप दिला!

२२ सप्टेंबर २०१९, रविवार

पूणे वेधचा दुसरा दिवस! रविवारची सकाळ! सकाळी साडेनऊ वाजताच हॉल फुलून गेला होता. व्यासपीठावर डॉ. आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर यांनी नाट्यकर्मी अतुल पेठे यांचं स्वागत केलं. अतुल पेठेला अख्खा महाराष्ट्र ओळखतो. सूर्य पाहिलेला माणूस, कचराकोंडी, सत्यशोधक, रिंगण आणि समाजस्वास्थ्य या नाटकांनी विशेष ओळख मिळवलेला हा मूल्य जपणारा आणि पेरणारा अभिनेता, दिग्दर्शक! दलपतसिंग येती गावा हे माहितीच्या अधिकारावर आणि रिंगण हे अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित पथनाट्यंही त्यांनी गावोगाव केली. एसईझेडपासून अनेक माहितीपट बनवले. अतुल पेठे संपूर्ण महाराष्ट्राला सुपरिचित असले तरी पुणे वेधमध्ये त्यांच्याशी झालेला संवाद खूपच संस्मरणीय ठरला. पुणे वेधमधलं सर्वोत्कृष्ट सत्र कुठलं असा प्रश्न कोणी विचारला तर निर्विवादपणे अतुल पेठेचं सत्र असंच उत्तर द्यावं लागेल.

नाटक आणि अतुल पेठे गेली ३८ वर्षांचा प्रवास! खर तर नाटक जगणारा माणूस म्हणजे अतुल पेठे!
अतुलनं पुणेवेधच्या सत्रामध्ये सगळ्यांचं स्वागत केलं आणि वेध मध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याबद्दल आभारही मानले. अतुलच्या आयुष्यात नाटक ही कला किती महत्वाची आहे हे त्यानं सांगितलं. त्यानं चिनी म्हण उदृत केली. तुम्हाला दोन पैसे मिळाले तर एक पैसा धान्य खरेदी करण्याकरता करा आणि दुसर्‍या पैशात फूल विकत घ्या. धान्य तुम्हाला जगवेल आणि फूल तुम्हाला कसं जगायचं ते शिकवेल. हे फूल म्हणजेच कला! कलेनं दृष्टिकोनातला बदल घडतो. डोळे सगळ्यांनाच असतात, पण दृष्टी सगळ्यांना नसते. डोळे नसलेला एरिकसेन नावाचा माणूस होता. त्याला सगळ्या जगाची माहिती असायची. जेव्हा त्याला एकानं विचारलं, तुला डोळे नाहीत, तुला कसं काय कळतं? तो म्हणाला, तुम्हाला सगळ्यांना डोळे आहेत, मला दृष्टी आहे.

अतुलचे आजोबा अनंत हरी गर्दे यांची नवनाटिकाहार नावाची नाटक कंपनी होती. त्यांनी हाऊसफुल हा शब्द मराठीत रूढ केला. तीन अंकी नाटक रंगमंचावर आणलं. तसंच  निर्भिड नावाचं मासिक त्यांनी काढलं होतं. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबरोबर काळाराम मंदिराच्या सत्याग्रहासाठी ते बसले होते. अत्रेनी त्यांचं वर्णन महागमतीदार माणूस असं केलं होतं. अनेक क्षेत्रांशी आजोबांनी स्वतःला जोडून घेतलं होतं. अतुलच्या आजोळी अत्रे, रांगणेकर, खाडीलकर, सावरकर, मामा वरेरकर यांसारखी अनेक दिग्गज माणसं येत. लहानपणापासून त्यानं नाटक खूप बघितलं. शनिवार पेठ ओलांडली की बालगंधर्वला शाकुंतल, काशीनाथ घाणेकर, सौभद्र, संशयकल्लोळ ही नाटकं बघितली. शांकुतलमधली नांदी सुरू झाली की एक अदभुत जग समोर आल्यासारखं अतुलला वाटायचं. अंगावर रोमांच उमटायचे. नाटकाचं हे जादूमय जग त्याला खूप आवडायचं. वसंतराव देशपांडे यांचा थेट सूर हृदयाला भिडायचा. या सगळ्यांचा अतुलच्या मनावर खूप प्रभाव पडला.

अतुलला शाळेची अजिबात आवड नव्हती. दीपक पळशीकर सरांमुळे तो दहावीत पास झाल्याचं अतुलनं सांगितलं. त्याला भाषा खूप आवडायची. आपली शिक्षणपद्धती त्याला नको वाटायची. अतुल आणि त्याचे मित्र यांना नदीतले मासे कसे पकडायचे, पतंग कसे उडवायचे, कबुतरं कशी उडवायची, ट्रेकिंग या सगळ्या गोष्टींची आवड होती. अतुलच्या मनात त्या वयात आत्महत्येचेही विचार अनेकदा डोकावायचे. या जगात आपलं काही खरं नाही असं त्याला वाटायचं. मग अतुल कविता करत राहायचा. मी कोण आहे हे जाणून घेण्याची त्याची धडपड चालू होती.

शाळेमध्ये असताना त्याला नाटकात काम करण्याची संधी मिळाली. वसंत ऋतूची भूमिका त्याला करायची होती. वाक्य पाठ केली, वसंत ऋतू मी वसंत ऋतू अशी वाक्य त्यानं पाठ केली, पण व्यासपीठावर गेल्यावर मात्र त्याची तंतरली आणि तो ‘मी आंबा आहे’ एवढंच म्हणत लोकांचा हशा घेऊन व्यासपीठावरून खाली उतरला. आपल्यामागे तेजपुंःज वलय वगैरे काहीही नसल्याचं अतुलनं मीश्कीलपणे सांगितलं. पुढे एका बालनाट्य संस्थेशी तो जोडला गेला. तिथे त्याला नाटकातलं पहिलं बक्षीस मिळालं. कोणीतरी केलेलं कौतुक त्याला खूप काही देऊन गेलं. पुरुषोत्तम करंडकला अतुलनं ‘चेस’ नावाची एकांकिका केली. ती त्यानंच लिहिली. व्यक्त होण्यासाठी त्याची अनेकदा घुसमट व्हायची. धोपटमार्ग सोडावा आणि नव्या मार्गावरचे नवे ध्वनी त्याला ऐकावे असं त्याला वाटत असायचं. चेसबद्दल त्याला अनेक बक्षिसं मिळाली. अतुलनं शिक्षण अर्धवट सोडलं. त्याच्या वडिलांना तर अतुलनं सीए व्हावं असं वाटत होतं. अतुलला मात्र ते अशक्य वाटायचं. पुढे अतुलनं त्याच्या बायकोचं आव्हान स्वीकारून एमए डिस्टिंग्शन केलं.

अतुलचा नाटकाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. तो केवळ मनोरंजनासाठी नाटकं करत नाही. ज्या विषयांना सामाजिकता आहे ती नाटकं तो करतो. हे भान अतुलला कसं आलं हे डॉक्टरांनी अतुलला विचारलं. आजूबाजूचे मित्र आणि वाचन यांनी अतुलवर प्रभाव पाडला. दृष्टिकोन बदलायला मदत झाली. त्याला स्वभाषा महत्वाची वाटते, स्वभाषेमुळे इतर भाषा कळायलाही मदत होते. पडघम, बेगम बर्वे, घाशीराम कोतवाल या नाटकांमुळे अतुलचा दृष्टिकोनात बदल झाला. सतीश आळेकर, महेश एलकुंववार आणि विजय तेंडूलकर यांनी नाटक काय, त्याचा दर्जा काय हे दाखवलं. एखादं नाटक, एखादी कादंबरी, एखादा चित्रट हे बघण्याआधी आणि नंतर बघितल्यानंतर आपल्यात काय बदल होतो, आपल्याला काय जीवनमूल्य मिळालं हे महत्वाचं. नाटकामुळे करमणूक तर झाली पाहिजे पण त्यातून त्याला जे जग दिसलं आहे, जाणवलं, विचार दिसले, असं नाटक किंवा साहित्य यानं मी समृद्ध होणार आहे. चांगलं का वाचायचं, तर ते आपल्या मनाला आणि डोक्याला गरजेचं असतं, असं अतुल म्हणाला.

१९९९ साली सादर झालेलं ‘सूर्य पाहिलेला माणूस’ यातला सॉक्रेटिसनं विषाचा प्याला प्यायलाचा प्रसंग यानंतर पडद्यावर दाखवण्यात आला. अतुलनं केलेलं हे नाटक नाटक नव्हतंच, तर तो एक जिवंत अनुभव होता. तो काळ, ती माणसं, त्यांच्यातले हेवेदावे, सॉक्रेटिसचं शांतपणे विषाचा प्याला तोंडाला लावून स्वतःला संपवणं हे सगळं समोर उभं करण्याची ताकद या नाटकात दिसत राहिली. हेच नाटक अतुलनं करायचं का ठरवलं, तर  १९९० च्या आधी वेगळा एकसूत्र समकाल होता, तर १९९० जागतिकीकरण, उदारीकरण आलं आणि जग बदललं. टाईम आणि स्पेस याचे अर्थच बदलले. समाजात अनेक गोष्टी घडत होत्या. बाबरी मशीद पडली, इंदिरा राजीव गांधीचा खून अशा अनेक घटना घडल्या. या घटनांचे पडसाद अतुल सारख्या संवेदनशील माणसांवर होत राहिले. मेधा पाटकरांचा नर्मदा बचाव आंदोलनाचा लढा सुरू होता. अशा विस्कळित समाजामध्ये मी जगू कसा हा प्रश्न अनेक माणसांना पडला होता. इतिहासात डोकावलं असता त्या त्या वेळी तुकाराम, सॉक्रेटिस, रधो कर्वे ही माणसं कशी वागली हे अतुलला बघावं वाटलं आणि अशा वेळी एका क्षणी डॉ. श्रीराम लागूंनी अतुलला ‘सूर्य पाहिलेला माणूस’ ची स्क्रिप्ट हाती दिली आणि त्यानं ती करायचं ठरवलं. श्रीराम लागूंनी सॉक्रेटिसची भूमिका वयाच्या ७० व्या वर्षी अतिशय अप्रतिम अशी केली. सॉक्रेटिसमुळे सत्य, सदाचरण आणि नैतिकता यांचा वेध मिळाला. जगायचं कसं तर विष घेतलं तरी चालेल, पण सत्यानेच हेही कळलं. श्रीराम लागूंनी वाचिक आणि शारीरिक अभिनय प्रभावीपणे दाखवला. मृत्यूशी सामोरं जातानाही सत्याशी प्रामाणिक राहायचं, समोरची दमणकारी व्यवस्था आहे तिला शरणही जायचं नाही. मी जीवनाचं दान करायला तयार आहे, पण माझ्या विचारांचं करणार नाही.

अतुल म्हणाला, ‘जगताना काहीतरी बरं केल्याचं समाधान वाटतं. नाटक प्रत्येकवेळेला उन्नत करतं. मला काय येतं पेक्षा मला काय येत नाही हे तपासून बघण्यासाठी मी नाटक करतो असं अतुलनं सांगितलं. कला तुमच्या आयुष्यात क्रांती करते. शिल्प कळायला लागतं, जग कळायला लागतं. फ्रस्टेशन, डिप्रेशन काहीही येत नाही. व्यक्त् होणं जे असतं ते आपण अलिप्त राहून दुरून बघतो. नाटक म्हणजे साक्षीभाव! नाटक हे एकच असं माध्यम आहे असण्याचं होणं होतं. इतर कलांमध्ये तुम्ही आहे तसेच राहता. नाटक दिग्दर्शित करताना खूप मजा येते. स्वतःला तपासून बघता येत.’

अतुल पेठे प्रयोगिक नाटक करतो. खरं तर सगळेच प्रकार त्याला छान वाटतात. अतुलची प्रवृत्ती प्रयोग करायची आहे. अपयश येऊ शकतं ही जाणीव अशा प्रकारची नाटकं करताना असते. प्रायोगिक नाटकात एक प्रयोगशाळा असते. कलेमध्ये प्रायोगिक नाटकात आपल्या जगण्यामध्ये त्रास देणारे प्रश्न कोणते हे कळतं. आधी केलं ते पुन्हा तेच करणं किंवा कम्फर्ट झोन या नाटकांत सोडावा लागतो. सुरक्षितता जिथे वाटेल तिथून पळ काढला पाहिजे. काही सुचत नसेल तर अंधारात सरळ उडी टाकावी हे अर्ध वाक्य झालं. ही उडी टाकताना डोकं आणि भान भानावर पाहिजे. म्हणजे पाठीवर पॅराशूट आहे का ती उघडते का हे तपासून बघणे. अतुलला लक्षात आलं की आपण सध्या तेच ते करतो आहोत.  मग त्यानं कनकवली, जालना इथं जाऊन नाटकं केली. मधल्या काळात डॉक्युमेंट्रीज केल्या.

कचराकोंडी ही फिल्म करत असताना सफाई कर्मचारी म्हणजे काय, गटारात उतरणं म्हणजे काय हे अतुलला कळलं. आपल्या आजूबाजूला असं विश्व आहे ज्याला आपण भिडलं पाहिजे. ती लोकं राजकीय सांस्कृतिक दृष्टया अतिशय प्रखर आहेत. छंदामध्ये ताबडतोब लगेच गाणं ती रचू शकतात. पारंपरिक लोकगीतं ही त्यांची ताकद असते. या फिल्म मुळे त्याचा सफाई कामगारांशी संबंध आला आणि त्यातून वपू देशपांडे यांनी लिहिलेलं सत्यशोधक हे नाटक करायचं ठरलं. त्याचं मुक्ता मनोहरशी बोलणं झालं आणि सत्यशोधक हे नाटक सफाई कामगारांना घेऊन करायचं ठरलं. हे नाटक करताना आपलं आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचं आताचं नातं काय हे बघावं वाटलं. जातियता आणि धर्मांधता अलिकडल्या काळात खूप वाढलेली दिसते. अतुल म्हणाला, ज्योतिबा माळ्यांचे नाहीत, तुकोबा फक्त कुणब्यांचे नाहीत आणि ज्ञानेश्वर हे ब्राह्मणांचे नाहीत. ते आपल्या सगळ्यांचे, अवघ्या जगाचे आहेत. हा क्लेम आपण केला पाहिजे.

या नाटकात ८० टक्के लोक हे पुणे महानगरपालिका कामगार युनियनचे सफाई कामगार होते. ज्यांना वाचता येत नाही, ज्यांना लिहिता येत नाही, ज्या लोकांनी आजपर्यंत लोकांचा मैला डोक्यावरून वाहिला त्याच लोकांनी संस्कृतीचा भार वाहिला आणि म्हणून या नाटकाचे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ११८ प्रयोग झाले. नाटकाचा प्रयोग बघितल्यानंतर नसिरूद्दिन शाह, डॉ. श्रीराम लागू या सफाई कामगारांच्या पाया पडले आणि म्हणाले, आम्हाला असा अभिनय करता आला पाहिजे. कारण तो अभिनय नव्हताच, त्यात एक जिवंतपणा होता, व्याकुळता होती. सावित्रीबाई फुले शाळेत शिकवताहेत असा एक प्रसंग सभागृहातल्या उपस्थितांना दाखवण्यात आला. या वेळी पडद्यावरचे रंगकर्मी गात होते,
भिडे वाडा केला मोकळा, चला शाळेत जाऊ चला
अक्षरांचा लागला लळा, ज्ञानाचा मार्ग झाला खुला
आपल्या मुलीला शाळेत तर शिकायला पाठवायचंय, पण लोकांच्या विरोधाचीही भीती वाटतेय, अशा वेळी तो बाप आपल्या चिमुरड्या मुलीला चक्क पोत्यात घालून लोकांच्या नजरा चुकवून शाळेत घेऊन येतो. ते दृश्य बघितल्यावर मनात आलं, किती प्रतिकूल काळ होता तो! आज किती सहजपणे आपण शिक्षण घेतो आहोत, किती शाखांमधलं….सावित्रीबाईंच्या जोतिबांच्या त्यागाची, कष्टाची किंमत आपण खरोखरंच जाणलीय का?

यानंतरचं अतुलनं केलेलं नाटक म्हणजे ‘समाजस्वास्थ्य’! रघुनाथ धोंडो कर्वे हा सत्य शोधणारा एक विलक्षण माणूस! हे नाटक कसं सापडलं, याबद्दल बोलताना अतुल म्हणाला, जोपर्यंत आपल्याला आपल्या परंपरा माहीत असत नाहीत, तोपर्यंत आपल्याला नवं कळत नाही. त्या माहीत करून घेतल्या तर मजा येते. आपली वाट वेगळी आहे हे कधी कळेल, तर आधीच्या वाटा माहीत असल्या तर. सत्यशोधक कन्नडमध्ये केलं. लोकांना जाऊन भिडलं पाहिजे या विचारानं ठिकठिकाणी प्रेक्षकांना जावून अतुल भेटला, त्यातून कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून त्याची समज वाढली. गाडगे महाराज आपले गुरु असल्याचं अतुल सांगतो. गाडगेमहाराज हे विज्ञाननिष्ठ किर्तन करायचे. या वेळी गाडगे महाराजांची एक गोष्ट अतुलने सांगितली. चालत असताना अपयशाला घाबरायचं नाही, थोडक्यात मिळाला हत्ती तर हत्तीवरून जाऊ नाहीतर चालत जाऊ. काम करताना हत्ती भेटतात. विश्वास ठेवला पाहिजे आणि चालायलाही मजा येते हेही लक्षात घेतलं पाहिजे.

र.धो. कर्वे – लहानपणापासून लहानपणापासून अतुलला ते माहीत होते. त्यांनी सुरू केलेल्या ‘समाजस्वाथ्य’ या मासिकाला अतुलच्या आजोबांनी जाहिरातीसाठी मदतही केली होती. र.धो. वाचल्यावर अतुल थरारून गेला. र.धो.चं आयुष्य वादळी होतं. १९३० या काळात पहिली लैंगिक शिक्षणाविषयी पहिली क्रांती त्यांनी भारतात केली. लोकसंख्या नियंत्रण आणि गर्भनिरोधक साधनं वापरणं, समाजस्वास्थ्य हे लैंगिक विषयावर मासिक २७ वर्षं एकहाती चालवणं असं अफाट काम त्यांनी केलं. परंपरा म्हणजे फुगड्या घालणं आणि झिम्मा खेळणं नव्हे तर परंपरा म्हणजे चांगल्या साहित्याची आणि विचारांची परंपरा. अतुलला  वैचारिक परंपरा जास्त महत्वाची वाटते. बाह्यस्वरूपी परंपरा जपण्यापेक्षा अंतर्गत स्व-परंपरा जपणं जास्त महत्वाचं वाटतं. आजही लैंगिक शिक्षण द्यायचं कसं, शाळेत लैंगिक शब्द वापरायचे कसे  असे शाळेत शिकवताना आजही प्रश्न पडतात. म्हणून र.धो. पुन्हा तपासले पाहिजेत असं अतुलला वाटलं. र.धो.वर चार खटले भरले गेले. नाटक फक्त करमणूक करत नाही तर ते सामाजिक अभिसरण करतं. तत्कालीन विषय मांडून त्या विचारांची घुसळण करतं.

आपल्याकडलं मराठी नाटक खूप सशक्त आहे. शारदा विषय घेतला तर बाल-जरठ विवाहाचा प्रश्न आहे, एकच प्याला घेतलं तर तिथं नैतिकतेचा आणि स्खलनाचा प्रश्न आहे. किचकवध हे नाटक असं पहिलं नाटक होतं की त्यावर सेन्सारशिप लादली होती. महात्मा फुल्यांचं तृतीय रत्न हे नाटक संपूर्ण जातिव्यवस्था आणि शेतकर्‍याची लुबाडणूक करण्यांबद्दल बोलणारं होतं. नाटकामध्ये हा एक प्रवाह मराठी नाटकामध्ये जोरकस आहे. आपण त्याचे पाईक आहोत त्यामुळे अतुल अशा प्रकारचं नाटक करतो. र.धो.वरचा दुसरा खटला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चालवला. आंबेडकर हे स्त्रियांच्या बाजूनं उभे राहतात, ते लैंगिकतच्या बाजूनं उभे राहतात आणि असे बाबासाहेब या नाटकात उभे केले. हा इतिहास सर्वसामान्यांना माहीतच नव्हता.

या वेळी ‘समाजस्वास्थ’ नाटकातलाही एक प्रसंग उपस्थितांना पडद्यावर दाखवण्यात आला. डॉ. आनंद नाडकर्णी म्हणाले बदल पेरणारी जी माणसं असतात त्यांनी पुढे आपल्यासाठी काय वाढून ठेवलंय, मग तो प्रत्यक्ष विषाचा प्याला असेल, किंवा अडचणींचा डोंगर असेल त्यांना तोंड देण्याची तयारी ते आधीच करून ठेवतात.

अतुलला डॉक्टरांनी फिल्म माध्यमाच्या वैशिष्ट्याविषयी अतुलला प्रश्न विचारला. अतुल चांगले फोटो काढायचा. विजय तेंडूलकर यांनी त्याला कॅमेरा घ्यायला सांगितलं आणि ते म्हणाले, फोटो काढताना कॅमेरा कसा आहे यापेक्षा तो वापरणारा त्यामागचा माणूस कसा आहे हे महत्वाचं आहे. तंत्र चालवणारा माणूस कसा आहे यावर ते तंत्र अवलंबून असतं. अतुलनं कॅमेरा विकत घेतला आणि त्याला वेगळंच जग दिसायला लागलं. कॅमेर्‍यातून बघणं इतकं स्वतःकडे बघण्यासारखं अतुलला वाटलं. अतुलनं स्पेशल इकॉनॉमिक झोन (एसईझेड) या विषयावर फिल्म केली. उल्का महाजन या कार्यकर्ती मैत्रिणीने अतुलला तू या विषयावर फिल्म बनवशील का असं विचारलं. २००० मध्ये शेतकर्‍यांच्या जमिनी हडप होत होत्या. लोकांच्या जमिनी फसवून घेतल्या जातात आणि त्यामागचं राजकारण अतुलला अस्वस्थ करून गेलं. एखाद्या कलाकाराला आपल्या समाजातले प्रश्न माहीत असणं अतुलला खूप गरजेचं वाटतं. त्यामुळे त्या कलाकाराच्या जगण्याच्या कक्षा रुंदावतात. ही फिल्म अतुलनं केली आणि ती खूप गाजली. अनेक लोकांचं लक्ष वेधलं गेलं.

मुक्ता मनोहरनं ही फिल्म बघितली आणि सफाई कामगारांवर फिल्म करशील का असं अतुलला विचारलं आणि अतुलनं सहजपणे हो म्हटलं. मात्र सहज वाटलेली आणि महिनाभरात होणारी ही फिल्म नव्हती. अतुल सफाई कामगारांबरोबर दीड वर्षं राहिला. मैला वाहून नेणं हे अमानवी कृत्य असल्याचं आपल्या घटनेनं सांगितलंय, मात्र आजही ही प्रथा बंद झालेली नाही. हे सफाई कामगार, त्यांचं जगणं, हे जवळून बघताना अतुल स्वतः गटारात उतरला. तिथून त्यानं कॅमेर्‍यातून बाहेरचं जग बघितलं. अतुल त्यानंतर अंतर्बाह्य बदलला. सगळा अहंकार नष्ट झाला. त्याचा आवाज बदलला. कलाकाराला कुठली भाषा, धर्म, देश नसतो हे त्याला कामगारांनी शिकवलं. चौकटीतलं सुरक्षित जीवन जगतो म्हणजे काय आणि याला तडा द्यायचा असेल तर या लोकांबरोबर राहिलं पाहिजे. त्यांना जवळ केलं पाहिजे. एम्पथीचा खरा अर्थ म्हणजे सहअनुभूती! रेड्याच्या पाठीवर उमटलेले वळ ज्ञानेश्वरांच्या पाठीवर उमटले हे एक रूपक आहे, खरं तर ज्ञानेश्वर रेड्याशी सहअनुभूत झाले होते. आज जे शहर स्वच्छ दिसतं त्यासाठी कित्येक लोक मरतात. असे कामगारांचे कित्येक मृत्यू झालेले आहेत. समाजातले वंचित, पीडित कितीतरी स्तर समाजात आहेत. ही माणसं कोण आहेत याचा शोध घेताना अतुलला एक वेगळं जग दिसलं. आपण कचरा टाकतो, थुंकतो, त्यात एक माणूस असतो. आपल्याला हे जग दिसत नाही. ही फिल्म करताना अतुल हादरून गेला. ही फिल्म बघून अनेक चांगल्या गोष्टी घडल्या. २० लाख लोकांनी ही फिल्म बघितली. कामगारांचे पैसे वाढले. कचराकोंडी ही फिल्म बघून अनेक कामगारांना घरं मिळाली, काम करण्यासाठी लागणारी साधनं कामगारांना मिळाली.

समाजामध्ये समाजविधायक बदल जसे घडतात, तसेच समाजविघातक बदलही घडतात. समाजविघातक बदलात घडलेली एक घटना म्हणजे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्त्या! या प्रसंगानंतर अतुल एका वेगळ्या भावनेनं प्रेरित झाला आणि त्याच्या हातून रिंगण नाटक उभं राहिलं. अतुल म्हणतो, गोपाळ गणेश माहीत असतील तर र.धो. कर्वे माहीत होतात. र.धो. माहीत असतील तर मग तुम्ही दाभोलकरांपर्यंत जाऊन पोहोचता. विसाव्या शतकात आगरकरांची जिवंत असताना प्रेतयात्रा काढण्यात आली. र.धों.वर चार खटले भरण्यात आले आणि एकविसाव्या शतकात दाभोलकरांवर गोळी झाडण्यात आली. ही समाजाची अधोगती आहे की प्रगती असा प्रश्नही अतुलनं उपस्थित केला. अनिल अवचटांचं ‘संभ्रम’ पुस्तक वाचून अतुल एका रात्रीत बदलून गेला होता. ‘संभ्रम’मध्ये आजूबाजूच्या अंधश्रद्धानवर आघात केले होते. या गोष्टींना अंधश्रद्धा म्हणतात हे कळलं. एका एका पुस्तकानं एकएका चांगल्या साहित्यानं आपलं आयुष्य होत्याचं नव्हतं. ते अतुलनं अनुभवलं. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची अनेक व्याख्यानं अतुलनं ऐकली होती. त्यांचे लेख वाचले होते. अतुलची त्यांच्याशी मैत्री झाली. आपल्या मित्राचा असा भर सकाळी रस्त्यात खून होतो याचा त्याला धक्का बसला. आपल्या हातात निषेध करण्यासाठी काय आहे तर ते म्हणजे नाटक! आपण दगडं मारू शकत नाही, विधायक मार्गानं सुद्धा निषेध करता येतो हे गांधीजींनी सांगितलं. सविनय कायदेभंग हे त्याचचं एक उदाहरण. अतुल म्हणाला, तुमची पहिली गोळी असेल तर आमची एक कविता असेल, तुमची दुसरी गोळी असेल तर आमची एक कांदबरी असेल, तुमची तिसरी गोळी असेल तर आमचं एक नाटक असेल आणि तुमची चौथी गोळी असेल तर आमचा एक चित्रपट असेल. ही कलेची ताकद असते. कला म्हणजे नुसती गंमत नसते, तर ती तुमचं जीवन शोषून घेते.

अतुल म्हणाला, ‘जळो जिणे लाजिरवाणे, भिक्षापात्र अवलंबणे’ हे तुकाराम म्हणतो,’ बुडती हे जन न देखवे डोळा’ असंही तुकाराम म्हणतो, याच तुकारामाला अभंग लिहिण्याबद्दल शिक्षा म्हणून तेरा दिवसांचा उपवास इंद्रायणीच्या काठी घडवलेला होता. तुकारामांनी ही त्यांच्या अभंगांसाठी चुकवलेली किंमत होती. त्यानंतर ते अभंग तरून वर आले म्हणजेच लोकांनी ते तारले. कारण त्या अंभगांमधून जगण्याचं शहाणपण आणि जीवनाचा दृष्टिकोन होता. पणाला लावल्याशिवाय काही होत नाही. चुकीच्या परंपरांचा त्याविषयी लोकांना जागृत करणं हे दाभोलकर करत होते.

अतुल म्हणाला, विकासाची व्याख्या म्हणजे विवेकाची कास धरलेली समृद्धी. चार पदरी रस्ते आणि मॉल्स म्हणजे विकास नाही. आपण तकर्निष्ठ विचार करतो की नाही हे तपासून बघायला पाहिजे. समाजातला विवेक जागृत करणं हे काम दाभोलकरांनी केलं, तेच काम डॉ. आनंद नाडकर्णी देखील करताहेत. जगण्यासाठी शास्त्रीय दृष्टिकोन असणं खूप महत्वाचं आहे. मनाचे आजार होतात, पण ते बरेही होतात. त्यासाठी बुवा, साधू वैदू यांच्याकडे जाण्याची गरज नाही. असे अनेक विचार अतुलच्या मनात येत राहिले. नरेंद्र दाभोलकरांच्या मृत्यूचं दुःख तर झालंच होतं, पण लोकांसमोर त्यांनी केलेल्या गोष्टी आणणंही गरजेचं होतं आणि यातूनच उभं राहिलं ते रिंगण नाट्य! या वेळी अतुल पेठेनं बादल सरकारची, सफदर हाश्मी यांचीही आठवण काढली. त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांविषयी, अडचणींविषयी जे काम केलं त्यावर अतुलनं सांगितलं. यानंतर रिंगणनाट्य यातलाही एक प्रसंग पडद्यावर सादर करण्यात आला.

रविवार सकाळचं हे सत्र म्हणजे उपस्थित श्रोत्यांना आपल्याबरोबरच अक्षरशः झपाटून टाकण्याचं होतं. डॉ. आनंद नाडकर्णी काही प्रश्न विचारत होते, त्यावर आपली मतंही मांडत होते आणि त्याच वेळी अतुल हा चौफेर फटकेबाजी करत होता. त्याच्या बोलण्यात उत्स्फूर्तता होती, तळमळ होती, वेदना होती, अस्वस्थता होती आणि मी आयुष्यभर पेरत जाणार हे म्हणण्याची आणि करण्याची ताकदही होती. डॉ. आनंद नाडकर्णी यांनी अतुलला नाटक जगणारा माणूस असं म्हणतानाच रंगकर्मी न म्हणता रंगधर्मी असं संबोधन वापरलं.

डॉक्टरांनी अतुलला रॅपिड फायरमध्ये आवडता विचारवंत विचारताच अतुलनं गाडगेमहाराजांचं नाव घेतलं. आवडत्या पुस्तकाविषयी विचारताच ‘माझा प्रवास’ हे गोडसे भटजींचं पुस्तक सांगितलं. आवडते नाटककार विचारताच विजय तेंडूलकर हे शब्द अतुलच्या तोंडातून बाहेर पडले. आवडता रंगभूमीवरचा मराठी कलाकार म्हणून डॉ. श्रीराम लागू आवडतात, तर भारतीय रंगमंचावरचे नासिरुद्दिन शाह आणि ओम पुरी हेही आवडतात असं अतुलनं सांगितलं. प्रेरणास्थान संत तुकाराम असल्याचं अतुल म्हणाला. नाटकानं मला माणूस म्हणून काय काय शिकवलं या प्रश्नाचं उत्तर देताना ‘आपल्याला माणूस व्हायला शिकवलं’ असं अतुल म्हणाला. मला ज्या गोष्टींचा राग येतो त्या गोष्टीत ‘शब्द न पाळणं आणि वेळ न पाळणं’ हे उत्तर त्यानं दिलं. नाटक चांगलं झालं की त्याला आनंद होतो. नाटकाव्यतिरिक्त करायची आवडती गोष्ट म्हणजे अतुलला भांडी घासायला आवडतात. जेव्हा मी खूप अस्वस्थ होतो, तेव्हा मी नाटक करतो असं उत्तर अतुलनं दिलं. अस्वस्थतेतूनच नाटक निर्माण होतं. सुखाचं आयुष्य जगता आहातच तुम्ही, चिमटा काढण्यासाठीच नाटक आहे. चांगली कला ही ताकदवान असते, ती राजकीय असते, ती सामाजिक असते. ती विधान करते, ती हादरवते. तुम्हाला परत परत विचार करायला लावते. नेमाडेंची कोसला वाचणं, सत्यजीत रेंचा चित्रपट बघणं, कुमार गंधर्वांचं गाणं ऐकणं या गोष्टींनी आपल्यात नितांत बदल होतात, आणि हेच तर कलेचं सामर्थ्य आहे.

मी एक कलाकार आणि मी एक कार्यकर्ता या दोघांचे नातं काय हा प्रश्न डॉक्टरांनी अतुलला विचारला, तेव्हा ‘मी मूलतः कलाकार आहे, पण कलेचा कार्यकर्ता आहे’ असं उत्तर अतुलनं दिलं. याच वेळी अतुलनं सिनेमा, सिरीयल आणि नाटक यातला फरक सांगितला. सिनेमात तुम्ही आहे त्यापेक्षा मोठे दिसता, तर मालिकेत तुम्ही संकुचित होता.  नाटक हे एकमेव असं माध्यम आहे की जे तुम्ही असता, तसे तुम्ही दिसता. एकदा पडदा दूर झाला की इथं कटपेस्ट चालत नाही. शेतकरी जसा शेतात राबतो तसे आम्ही नाटकात राबत असतो असं शेवटी अतुल पोटतिडकीनं म्हणाला. कुठलाही कलाकार त्या कलेमध्ये राबत राहिला तर नवं पीक जोमात येतं. आणि मग त्या दोन पैशातून घेतलेलं फूल तुमच्या मेंदूला कार्यरत ठेवण्यासाठी चालना देतं.

डॉक्टर म्हणाले, आपण अस्वस्थ होतो आपल्या संकुचित छोट्याशा जगातल्या गोष्टींबद्दल. आपण अस्वस्थ होतो आपणच संकुचित केलेल्या नात्यांबद्दल. आपला अस्वस्थपणा आणि अतुलचा अस्वस्थपणा यातला मूलभूत फरक म्हणजे आपला अस्वस्थपणा आपल्या स्वकेंद्रिपणामधून येतो, तर अतुलचा अस्वस्थपणा त्याच्या आणि इतरांच्या अपूर्णतांकडे, त्यातल्या विसंगतीकडे, त्यातल्या विषयतेकडे पाहत असताना येतो. अतुलचा अस्वस्थपणा हा सर्जनशील असतो आणि उत्तर शोधणारा असतो. आणि त्याला माध्यम हवं असतं ते त्याच्या जगण्याचा भाग असतं. या व्यक्तीमध्ये नाटक आहे, तो नाटक जगतो आहे. ‘अस्वस्थ नाटक जगणारा माणूस आज आपल्याला अतुलच्या रुपात भेटला’ असं शेवटी डॉक्टरांनी म्हटलं आणि  हे झंझावाती सत्र संपन्न झालं. 

रविवारच्या दुसर्‍या सत्रात अनिश नाथ आणि असिता नाथ यांनी आपलं दिल्ली शहरातलं स्थिर, सुरक्षित आयुष्य सोडून शेती करण्याचा निर्णय घेतला. अनिश जाहिरात क्षेत्रात काम करत होता. कामाचा लोड खूप असायचा. प्रमोशन मिळवायचं म्हणजे आणखी जास्त वेळ आणि आणखी ताण असं अनिशच्या लक्षात आलं. आठवड्यातले शनिवार रविवार आपल्या कुटुंबाला वेळ देता यायचा. पण तोही पुरेसा नसायचा. अनिशला या सगळ्या कामापासून बदल हवा होता. अनिशचं शिक्षण लखनौमध्ये झालं होतं आणि पुढलं शिक्षण आणि कामासाठी तो दिल्लीत गेला.

शेतीतलं काहीही ठाऊक नसताना, अनिश आणि असिता यांनी लखनौजवळच्या ३५ किमी दूर अशा एका छोट्याशा गावात दोन एकर जमीन विकत घेतली आणि तिथंच राहून शेती सुरू केली. या गावातले लोक स्वतःच्या उपजिविकेपुरतं शेतीत पिकवत होते. गावात जातीयवाद मोठ्या प्रमाणात दिसला. जवळपास मागास जातीचे लोक या भागात होते. अनिशच्या लक्षात आलं की या लोकांना आपल्यापासून मुद्दाम दूर ठेवण्यात आलं होतं. लहानपणापासून अनिशनं अशा गोष्टी अनुभवल्या नव्हत्या. त्यामुळे त्याच्यासाठी हे सगळं नवीन होतं. माणसानं माणसांमध्ये असा फरक करणं या गोष्टींबद्दल आपण इतकी वर्षं अनभिज्ञ होतो याचं त्याला वाईटही वाटलं. हळूहळू अनिशने गावातल्या लोकांशी बोलायला सुरुवात केली. सुरुवातीला अनिश आणि असिता यांनी लखनौवरून रोज जाणंयेणं सुरू केलं. पण काहीच दिवसांत त्यांच्या लक्षात आलं की रोज जाऊन येऊन त्या गावाशी, त्यातल्या शेतकर्‍यांशी मुलांशी आपलं जवळचं नातं निर्माण होऊ शकणार नाही. या गावातले लोक आपली शेती विकून शहरात जाऊन काम शोधायच्या विचारात होते आणि हे बघून अनिश आणि असिता यांना वाटलं की यांनी गावातच राहिलं पाहिजे. त्यांना शेतीचं महत्व कळलं पाहिजे. आपला देश कृषिप्रधान असून आपण शेतीवर किती अवलंबून आहोत हेही या लोकांना समजलं पाहिजे. आपण शेती चांगल्या प्रकारे करू शकतो ही गोष्ट त्यांच्या मनात रूजवणं अनिश आणि असिता यांना महत्वाचं वाटलं. एका सर्व्हेक्षणात ९८ टक्के तरूण वर्ग शेती करण्यासाठी उदासीन असल्याचं अनिशच्या लक्षात आलं. आणि ही खूप गंभीर गोष्ट असल्याची जाणीव त्याला झाली. आपण जर दहा वर्षांनी बाहेरच्या देशातून अन्नधान्य ही आयात करायला लागलो तर काय परिस्थिती ओढवलेल या विचारानं तो अस्वस्थ झाला.

असितानं एमएस्सी झुऑलॉजी या विषयात केलं आणि तिनं दिल्लीत अनेक स्वयंसेवी संस्थांबरोबर शिक्षणावर काम केलं होतं. अनिश आणि असिता यांनी शेती करत असतानाच त्यांनी गावातल्या मुलींसाठी कृषीशाळा सुरू केली. या मुलींना आयुष्यात पाय रोवून उभं राहता यावं यासाठी आवश्यक ते शिक्षण देत त्यांना शेतीमधलं शास्त्रशुद्ध शिक्षण देण्यास सुरुवात केली. मुली खूप खंबीर असतात. कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीचा त्या सामना करू शकतात, कामाच्या बाबतीत त्या खूप प्रामाणिक असतात या गोष्टी ठाऊक असल्यानं अनिश आणि असिता यांनी मुलींना शिकवण्याचा निर्णय घेतला. गावातल्या मुलींना आपण मोफत शिकवायचं असंही त्यांनी ठरवलं. त्यांचा हा प्रवास सोपा मुळीच नव्हता. मात्र गावातलं जीवन, विशेषतः मुलींकडे बघण्याची दृष्टी, या गोष्टींकडे त्यांचं लक्ष गेलं आणि त्यांनी हळूहळू एक एक गोष्टी करायला सुरुवात केली. सुरुवातीला गावातले पालक बाहेरून आलेल्या या जोडप्यावर अविश्वासानं बघत राहिले. त्यानंतर आपल्या मुलींना पाठवायलाही ते तयार नव्हते. हळूहळू गावातल्या लोकांची मानसिकता बदलली आणि आपल्या मुलींमधला फरक त्यांना जाणवायला लागला. एक एक करत मुलींची शाळेतली संख्या वाढली आणि एका बदलाची सुरुवात झाली.
—-
रविवारच शेवटचं सत्र गाजलं ते रूमा देवी या राजस्थानमधल्या बाडमेर या गावातून आलेल्या स्त्रीमुळे! रुमादेवी ‘कौन बनेगा करोडपती’ शो मुळे आणि राष्ट्रपतींच्या हस्ते मिळालेल्या नारीशक्ती पुरस्कारामुळे भारतीयांना सर्वपरिचित आहेच. आठवीपर्यंत शिकलेली तीस वर्षांची एक तरूणी प्रतिकूल परिस्थितीला शरण न जाता सामोरी जाते आणि स्वतः तर स्वतःच्या पायावर उभी राहतेच, पण आपल्याबरोबर आसपासच्या आणि आसपासच्या गावातल्या २२ हजारांपेक्षा जास्त स्त्रियांना एकत्र करून त्यांनाही सक्षम करते त्याची गोष्ट या सत्रात होती. रुमादेवी बरोबरच विक्रम सिंग हे ग्रामीण विकास चेतना संस्थेचे सचिव या सत्रात सहभागी झाले होते. विक्रम सिंग यांनी रुमादेवीमधले नेतृत्वगुण ओळखले आणि आपल्या संस्थेतर्फे राजस्थानमधल्या कलेला उत्तेजन देत महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी काम सुरू केलं.

या सत्राला सुरुवात करताना पुणे वेधच्या क्वॉयरनं समूह गीत गावून रूमा देवी आणि विक्रम सिंग यांचं स्वागत केलं.
अपनी धुन मे मगन रहो तो सुखदुख से क्या लेना देना
घनी रात या नया सवेरा आसमान को बस है छूना

रूमा देवी आणि विक्रम सिंग हे राजस्थानमधल्या ज्या बाडमेर गावाहून आले होते, ते बाडमेर राजस्थान आणि पाकिस्तानच्या सीमेवर आहे. रुमा देवी अतिशय हसतमुख आणि प्रसन्न व्यक्तिमत्वाची तरूणी श्रोत्यांना दिसत होती. ती पारंपरिक राजस्थानी पोशाखात आली होती.

रुमा देवीचं बालपण गरिबीतच गेलं. आई लहानपणीच वारली. आठवीपर्यंत तिचं शिक्षण झालं. पायात घालायला साधी चप्पलही नव्हती. पण मैत्रिणींबरोबर गप्पा मारत जाणं ही खूप आनंदाची गोष्ट होती. आठवीनंतर आणखी दूर शिक्षणाची व्यवस्था होती. इतक्या दूर मुलीला पाठवणं आणि आर्थिक परिस्थिती त्यामुळे रुमादेवीला पुढे शिकता आलं नाही. वयाच्या १७ व्या वर्षी तिचं लग्न झालं. बाडमेरजवळच गुडामाली या गावात रुमादेवीला सासरी जावं लागलं. पाण्याची टंचाई याही गावात होती. शेतीत फारसं पिकत नव्हतं. रुमादेवीचा पहिला मुलगा जन्मानंतर ४८ तासातच उपचाराअभावी मरण पावला. आता काही तरी करायलाच पाहिजे ही गोष्ट तिच्या लक्षात आली. पण करणार काय हेही कळत नव्हतं. गावात घुँघट प्रथा असल्यानं स्त्रियांनी बाहेर पडणं चांगलं समजलं जात नव्हतं. रुमादेवीनं गावातल्या चार स्त्रियांशी बोलून राजस्थानी कला म्हणजे भरतकाम करून पैसे कमवू असं सांगितलं. त्या वेळी ग्रामीण विकास एकता संस्थेविषयी रुमा देवीला समजलं. विक्रमसिंगला रुमा देवी आणि तिच्या मैत्रिणी जाऊन भेटल्या. विक्रम सिंगकडे काम होत। पण काम करणारी माणसं नव्हती. २००५ पासून संस्थेची सुरुवात झाली होती. रुमा देवी विक्रम सिंग यांना २००८ साली भेटली आणि विक्रम सिंग यांनी रुमा देवीला काम दिलं आणि चार दिवसांचा अवधी दिला. मात्र विक्रम सिंगला आश्चर्य वाटलं कारण रुमा देवी आणि तिच्या मैत्रिणी दुसर्‍या दिवशी सकाळी १० वाजताच संस्थेच्या कार्यालयात हजर झाल्या होत्या. दिलेलं काम त्यांनी रात्रीतून पूर्ण करून आणलं होतं. त्यांचं कामही चांगलं असल्यानं विक्रम सिंग यांनी या स्त्रियांना आणखी काम दिलं, तेही एका दिवसांत त्यांनी करून दिलं. त्याच वेळी विक्रम सिंगच्या लक्षात रुमा देवीमधले नेतृत्वगुणही लक्षात आले. सुरुवातीला घरातूनही विरोध झाला. अनेक अडचणी समोर उभ्या राहिल्या. घरातल्या लोकांना समजवून सांगणं, वेळप्रसंगी भांडणही करणं या गोष्टी कराव्या लागल्या. पण हळूहळू घरातले तयार झाले. या स्त्रिया घरातच काम करत असल्यानं पुरुषांचीही फारशी तक्रार नव्हती. तसंच घरात या कामानं पैसाही यायला लागला. रुमा देवीला वाटलं आपलं जगणं या कामानं बदलत आहे तर बाकी स्त्रियांचंही आयुष्य बदललं पाहिजे. गावात लोक दूरदूरवर राहत असल्यानं त्या बायकांना भेटणं, बोलणं ही इतकी सोपी गोष्ट नव्हती. पण रुमा देवी चिकाटीनं ती करत राहिली. अशा रीतीनं अनेक स्त्रिया जोडल्या गेल्या. या कामातून लोकांना नेहमी लागणार्‍या कपड्यांवर, वस्तूंवर कलाकुसर करण्याची सुरुवात झाली. या वस्तूंमधलं वैविध्य वाढलं. पैसा हातात यायला लागल्यावर स्त्रिया आपल्या मुलांना शिक्षणासाठी शाळेत पाठवायला लागल्या. घरातली आर्थिक परिस्थिती सुधारली.

रुमा देवीला नारीशक्तीचा पुरस्कार राष्ट्रपतींकडून प्रदान करण्यात आला. तसंच तिला जर्मनीमध्येही फॅशन शोसाठी निमंत्रित करण्यात आलं. फॅशन शो बद्दल काहीही माहिती नसताना रुमा देवीनं चिकाटीनं माहिती मिळवली आणि राजस्थानी कलेला जगासमोर फॅशन शोच्या माध्यमातून सादर करायचं ठरवलं. या फॅशन शो चं परदेशातही खूप भरभरून कौतुक झालं. कौन बनेगा करोडपती या बहुचर्चित शोमध्ये अमिताभ बच्चन समोर हॉटसीटवर बसून सहभागी होण्याची संधी रुमा देवीला मिळाली. आज रुमा देवीच्या अस्तित्वामुळे तिच्या कुटुंबात तिच्या घरात बदल तर झालाच आहे, पण तिच्या स्वतंत्र अस्तित्वामुळे कुठल्याही निर्णयप्रक्रियेत आता तिचं मत विचारात घेतलं जातं. तिला घरात मान दिला जातो आणि हा खूप मोठा बदल आहे असं रुमा देवीला वाटतं. आणि हा बदल तिच्याच बाबतीत नाही तर २२ हजार स्त्रियांच्या जीवनात घडला आहे.

डॉक्टर नाडकर्णी यांनी या फॅशन शोला फॅशन शो न म्हणता संस्कृतीचा उत्सव असं नाव दिलं. पुणे वेधची सांगता होताना रुमा देवीच्या सहकारी मैत्रिणींनी राजस्थानी पारंपरिक पेहरावात हा संस्कृतीचा उत्सव सादर केला. तो बघणं एक आनंददायी अनुभव होता.
२१, २२ सप्टेंबर पुणे वेधचे हे दोन दिवस कसे संपले हे कळलंच नाही. मनात पुढल्या वर्षीच्या वेधची प्रतीक्षा बाहेर पडतानाच सुरू झाली होती. खूप भरभरून मिळाल्याच्या समाधानात पावलं घराचा मार्ग कापू लागली!

दीपा देशमुख, पुणे
adipaa@gmail.com
9545555540

वेध हा उपक्रम डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकारानं सुरू झाला. हळूहळू त्याचा विस्तार महाराष्ट्रभर झाला. पुणे वेधची टीम नेहमीप्रमाणेच याही वेळच्या वेधसाठी गेली सहा महिने झटत होती. दीपक पळशीकर आणि वेध टीम यांच्या परिश्रमाला तोड नाही. तसंच वेध परिवारातले महाराष्ट्रातले वेधचे कार्यकर्तेही पुणे वेधसाठी आवर्जून आले होते. त्यांची उपस्थितीही उत्साह वाढवणारी होती. पुणे वेधची समूहगीत गाणारी टीम तर लाजबाब! आता पुण्याच्या लोकांनाही वेधचे वेध लागलेले असतात आणि एक वेध झाला, की पुढल्या वेधची प्रतीक्षा असते. ही सवय लावणार्‍या, वेधची सांस्कृतिक-सामाजिक चळवळ जनमानसांत रुजवणार्‍या, मूल्याधारित जगणं शिकवणार्‍या, माणसातलं माणूसपण जागं ठेवू पाहणार्‍या, सुदृढ मनासाठी झटणार्‍या अशा डॉ. आनंद नाडकर्णी या आनंद पेरणार्‍या माणसाला आणि त्याच्या टीमला शत: शत: प्रणाम!

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: