अपने रास्ते, आस्ते-आस्ते

करीयरच्या वाटेवर असतांना किंवा रोजच्या आयुष्यात सुद्धा एक आव्हान अनेकदा टुणकन उडी मारून अकस्मात आपल्या समोर येत असते . कोणते? आपण सध्या करीत असलेल्या कामापेक्षा अगदी वेगळे असे काम करून बघण्याची  खुमखुमी.  नोकरी करता-करता एकदम मनात आपला व्यवसाय करून बघण्याची इच्छा प्रबळ होऊ लागते  किंवा चालू असलेला व्यवसाय बदलून वेगळाच व्यवसाय करावासा वाटू लागतो. हातात असलेल्या कामापेक्षा हे काम, ही नवी संधी एकदम भुरळ घालू लागते. अवचित अशी इच्छा मनात येते तरी कुठून एकदम? कुठूनही…! ती येण्याची एकच अशी वाट नाही. कधी एखादा लेख वाचून, कोणाचे भाषण ऐकून, त्या व्यवसायात कोणाला तरी मिळालेले यश बघून, मित्र मंडळींच्या गप्पांमधून… अगदी कुठूनही ती आपल्या समोर येऊन आपल्याला अस्वस्थ करून सोडते….जाणीवपूर्वक, विचार आणि नियोजन करून नोकरी व्यवसायाची वाट बदलणे वेगळे आणि एकाएकी उबळ येऊन, हातातील कामाचा कंटाळा आला म्हणून किंवा दूरवर दिसणाऱ्या डोंगरावर हिरवे गवत दिसतेय म्हणून वाट बदलणे वेगळे. हे सूत्र घेऊन यंदाच्या वेध मध्ये काही चर्चा करूया असे नाशिक टीमच्या मनात होते आणि त्यातून जन्माला आली यंदाची थीम ‘ अपने रास्ते आस्ते आस्ते…”  करीयरच्या विचारपूर्वक निवडलेल्या वाटेवरून निर्धाराने चालणाऱ्या काही लोकांना आमंत्रित करून त्यांना त्यांच्या प्रवासाविषयी बोलते करायचे. काम करीत असतांना दिसणारी अन्य अनेक आमिषे दूर सारून निर्धाराने हातात घेतलेल्या कामाचा विचार करणारे, त्यासाठी काही गोष्टींना निरोप द्यायची वेळ आली तर तोही आनंदाने देणारे  असे पाहुणे शोधून त्यांच्याशी ह्या गप्पा ठरल्या आहेत. नव्या आणि आकर्षक दिसणाऱ्या, वाटणाऱ्या गोष्टींचा मोह दूर सारून आपल्या निवडीवर विश्वास ठेवून काम करीत राहणे सोपे नाही. नव्या काळाप्रमाणे बदलण्याचा आग्रह जग धरत असतांना तर अधिक अवघड. काळाप्रमाणे बदलणे म्हणजे कामाची धरसोड करणे कि आधुनिक काळाचा स्पर्श आपल्या कामाल देणे? आपल्या स्वतःचे सामर्थ्य ओळखून त्याचा उपयोग करीत कामात अधिकाधिक कौशल्य मिळवत जाणे हे अधिक आनंददायी की सर्वस्वी नव्या गोष्टीला आपलेसे करीत नव्याने डाव मांडणे अधिक समाधान देणारे? हे आणि असे काही  वेळोवेळी प्रत्येकाच्या मनात येणारे प्रश्न या निमिताने चर्चेला यावे या हेतूने या थीमची निवड केली आहे. त्यातून यापेक्षा आणखी काही वेगळ्या गोष्टी, मुद्दे सामोरे येण्याची शक्यता नक्कीच आहे.

या वेध साठी आमंत्रित पाहुणे वैशिष्ट्यपूर्ण आहेत. सर्वात अनवट पाहुणा आहे तो नचिकेत कुंटला हा तरुण संशोधक. एम टेक करीत असतांना त्याच्या समोर संधी आली ती निर्माल्यावर संशोधन करण्याची. आणि या संधीचे सोने करीत त्याने निर्माल्यातून फ्लोरोफोम हे असे उत्पादन विकसित केले आहे जे पर्यावरणास घातक असलेल्या थर्मोकोलला एक सशक्त पर्याय देते आहे. दिल्लीच्या वाहतुकीत प्रशिक्षित महिला कॅब चालक उतरवण्याचे साहस करणाऱ्या आझाद फौंडेशनची प्रतिनिधी अनिता माथुर  आणि या चमूतील एक निर्भय महिला चालक ओंकारी, अत्यंत प्रयोगशील सनदी अधिकारी अजित जोशी, तरुण वयात जाणीवपूर्वक रोईंग सारख्या क्रीडा प्रकारची निवड करणारी मृण्मयी साळगावकर आणि तिचे पालक आणि सुझुकी संगीत पद्धतीचा अवलंब करीत संगीताकडे आणि त्याच्या सामर्थ्याकडे बघण्याची एक वेगळी दृष्टी देणाऱ्या संगीत गुरु- कलाकार रमा चोभे आणि त्यांचे व्हायोलीन वादक छोटे उस्ताद अशी बहुरंगी पाहुणे मंडळी या वेध साठी आमंत्रित आहेत. या पाहुण्यांना बोलते करता-करता त्यातून या विचाराकडे वेगळ्याच दृष्टीने बघण्याचा जो एक अदृश्य धागा या सगळ्या संवादातून गुंफला जाणार आहे तो जेंव्हा नाडकर्णी सर उलगडून समोर मांडतात तो क्षण जणू साक्षात्काराचा असा क्षण असतो. नंतर सारे काही लख्ख दिसू लागते.

या पाहुण्यांना भेटण्यासाठी नाशिकला २९ सप्टेबर २०१९ रोजी रावसाहेब थोरात सभागृहात सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत सर्व सुहृदांना हार्दिक आमंत्रण आहे.     

वंदना अत्रे,
आयोजिका,
नाशिक वेध

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: