संवेदना फाऊंडेशन आणि वेध

२००४ च्या फेब्रुवारी महिन्यात आमची संवेदना फाऊंडेशन एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपची पहिली मीटिंग झाली. एखादी संस्था सुरु करण्यापूर्वी तुम्हाला त्यासाठी एक नजर असणे आवश्यक असते. त्यामुळे ही संस्था सुरु करायचे जेव्हा मनात होते, तेव्हा काही महिने आधी मी ठाण्याला आय. पी. एच. येथे धाव घेतली. अर्थातच, डॉ. आनंद नाडकर्णी ह्यांना भेटायला.

माझ्या मनात एपिलेप्सी विषयीची चळवळ उभी करण्याचे विचार आहेत, आणि त्याची सुरवात सपोर्ट ग्रुप पासून करावी असं आहे, हे मी त्यांना सांगितले. तेव्हाचं डॉ. नाडकर्णींच्या चेहेऱ्यावरचे आश्वासक हसू आणि विश्वास अजून लख्ख लक्षात आहे! तेव्हा त्यांनी त्यांच्या पाकिटातून एक हजार रुपये काढून दिले, आणि म्हणाले, “ही तुझ्या संस्थेसाठी माझी पहिली देणगी.” मला भरून आलं, आणि खूपच छान वाटलं. एक मोठी जबाबदारी देखील वाटली. अजून आपण प्रत्यक्ष संस्था सुद्धा सुरु केली नाही, आणि तरी आपल्यावर डॉ नाडकर्णी एवढा विश्वास टाकत आहेत, त्यामुळे आपलं हे काम चांगलंच झालं पाहिजे, असं मनात आलं!

उजवीकडून: यशोदा वाकणकर आणि डॉ. आनंद नाडकर्णी

त्यानंतर पुढचा एक तास डॉ नाडकर्णींनी मला सपोर्ट ग्रुप कसा चालवायचा, त्यासाठी काय अडचणी येऊ शकतात, माणसांना विश्वासात कसं घ्यायचं, एपिलेप्सी विषयी काय काय विषय घेऊ शकतो आपण मीटिंग साठी, अशा खूप साऱ्या विषयांवर सविस्तर सांगितलं. आपल्या विचारांना जेव्हा सुरवातीलाच इतकी “सकारात्मक आणि योग्य” दिशा मिळते, तेव्हा केवढा हुरूप आणि आत्मविश्वास येतो, हे मी पुरेपूर अनुभवलं! शिवाय पहिली मिळालेली “शकुनाची देणगी” सुद्धा माझ्या कायम लक्षात राहिली, आणि डॉ. नाडकर्णींनी दाखवलेला विश्वास आपल्याला सार्थ करायचा आहे, ह्याची जाणीव करून देत राहिली. 

ठरल्याप्रमाणे संवेदना फाऊंडेशनचा एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप सुरु झाला, आणि मग आम्ही कुठे थांबलोच नाही. अनेक पालक आणि स्वतः एपिलेप्सी मित्र आमचे कार्यकर्ते झाले आणि बघता बघता ग्रुप वाढला. उपक्रम वाढले. एपिलेप्सी सपोर्ट ग्रुप, एपिलेप्सी काउन्सेलिंग सेंटर, एपिलेप्सी मॅरेज ब्युरो, एपिलेप्सी वधू वर मेळावे, एपिलेप्सी औषध मदत योजना, असे अनेकानेक उपक्रम सुरु झाले व गट बहरून येऊ लागला. एपिलेप्सी विषयक उपक्रम महाराष्ट्रभर पसरू लागले. मॅरेज ब्युरो आणि औषध मदत साठी तर माणसे बाहेरगावाहून आणि परराज्यातून सुद्धा येऊ
लागली.  

२०१७ पुणे वेध: “प्रतिकूल ते अनुकूल”

अर्थातच, संस्था सुरु केल्यावर अडचणीही आल्याच; पण त्या पार करत आम्ही पुढे जात राहिलो.  
या प्रवासास पंधरा वर्ष होत आली होती, तेव्हा २०१७ मधे आय पी एच च्या पुण्याच्या “वेध” प्रोग्रॅममध्ये मला मुलाखतीसाठी बोलावलं. त्या वर्षिचे सूत्र होते, “प्रतिकूल ते अनुकूल”; आणि त्यामध्ये अस्मिता मोकाशी, विद्या गोखले आणि मी, आम्हा तिघींची मुलाखत घेतली होती. डॉ. नाडकर्णी वेधचे प्रोग्रॅम्स किती सुंदर कन्डक्ट करतात, हे वेगळं सांगायची गरजच नाही! समोर एवढा मोठा प्रेक्षकवर्ग होता, त्याचं थोडं टेन्शन आलं होतं; पण
डॉ. नाडकर्णींनी सूत्र हाती घेतल्यावर अगदी सुखद वाटू लागलं. ताण नावाची चीज गायबच झाली, आणि ती मुलाखत नं राहता मनमोकळ्या गप्पाच झाल्या जशा ! ही मुलाखत प्रेक्षागृहात बसलेल्या ज्यांनी प्रत्यक्ष ऐकली त्यांच्याकडून तर कौतुकाची थाप आलीच, पण त्याहीपेक्षा त्याचं तेव्हा केलेलं शूटिंग युट्युब वर अपलोड झालं, व्हॉट्सऍप वर फिरत राहिलं, त्यामुळे जगभर पाहिलं गेलं.

उजवीकडून: यशोदा वाकणकर , विद्या गोखले आणि अस्मिता मोकाशी.
मुलाखत बघण्यासाठी click करा: https://youtu.be/nfa9U04XODo

आमच्या संस्थेत खूप फोन येऊ लागले, एपिलेप्सी सहित जगणाऱ्या नवीन व्यक्ती येऊ लागल्या, हे मला खूप महत्त्वाचं वाटलं. परदेशातून कितीतरी ईमेल्स, फोन्स आले. संस्थेला काहीजणांनी देणग्या सुद्धा दिल्या. यवतमाळ, अमरावती सारख्या लांब असलेल्या जिल्ह्यांमधून एखादा एपिलेप्सी मित्र आमचं काउन्सेलिंग सेंटर शोधत शोधत यायचा, तेव्हा खूप बरं वाटायचं. या व्यक्तीला आतातरी उपचारांची दिशा मिळेल व सकारात्मकता येईल हे आशेचे किरण दिसायचे. 

संवेदना फाउंडेशन तर्फे आम्ही एपिलेप्सी वधुवर मंडळ चालवतो, ही माहिती वेध मधून मिळाल्याने आमच्याकडे नवीन नावनोंदणी सुद्धा होऊ लागली. नॉर्मल समजल्या जाणाऱ्या वधुवर चक्रात, एपिलेप्सीची पार्श्वभूमी असलेल्यांना लग्न जमवणे खूप कठीण असते. त्यामुळे वेध उपक्रमामुळे आमची ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचल्यावर अनेकांना आशेचे किरण दिसू लागले. 

यशोदा वाकणकर

“वेध” सारख्या उपक्रमातून एवढा मोठा घडलेला बदल बघून खूपच समाधान वाटलं. वेधच्या टीमचे, व डॉ. आनंद नाडकर्णींचे आभार मानावे तितके कमीच! “वेध”ची अशीच उत्तरोत्तर प्रगती होत राहो, आणि अनेकांना आपापल्या जगण्याचे योग्य ते आशादायी मार्ग मिळत राहोत, अशा खूप खूप शुभेछा!!

यशोदा वाकणकर,
संस्थापक, विश्वस्त,
संवेदना फाऊंडेशन,
पुणे.    

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: