बदल पेरणारी मणसं

जवळजवळ ४० वर्ष झाली,पुणे मराठी ग्रंथालयातून वाचायला आणलेले काशीबाई कानिटकरांनी शब्दबद्ध केलेले आनंदीबाई जोशी यांचे चरित्र वाचले होते. त्यानंतर  श्री .ज . जोशींचे ‘आनंदी –गोपाळ’ वाचनात आले आणि आता काही महिन्यापूर्वी प्रदर्शित ‘आनंदी गोपाळ ‘हा चित्रपट पहिला. त्यातील एक दृश्य आता आठ्वते आहे:

आनंदीबाईंचा  पदवी प्रदान समारंभ. गोपाळराव तेथे येतात आणि अत्यंत भावनाविवश होत म्हणतात –   
“ She is from India;   
She is the first” (lady doctor).         

सुमारे १५० वर्षांपुर्वी आनंदीबाई अमेरिकेत एकट्या जातात , पेनसिल्व्हेनियातील विमेन्स मेडिकल कॉलेज मधून डॉक्टर होऊन बाहेर पडतात. बदल पेरणे म्हणजे काय? हे समजण्यासाठी एव्हडे एकच उदाहरण मला वाटते की पुरेसे आहे. बदल पेरण्यासाठी कोणीतरी महान व्यक्तीच हवी असे नाही . गोपाळराव जोशी सारख्या थोड्या विक्षिप्त ( इतरांच्या मते ) पण दृढनिश्चयी आणि ‘हमरस्ता नाकारण्याचे’ मानसिक बळ असणारी कोणतीही व्यक्ती, “ निबिडातून नवी वाट शोधीत मी निघालो”  या बाबा आमटे यांच्या उक्तीनुसार स्वतःची नवीन वाट शोधत, आपल्या अनवट वाटेवर प्रवास सुरु करते . ‘ महाजनः गतश्च येनाहं पन्थाः’ ही त्याची वृति व कृति नसते.

बदल हा निसर्गाचा नियमच आहे. कुठलीही गोष्ट या जगात शाश्वत नसते आणि नाही! सर्व काही बदलते आणि सर्व गोष्टीमधे बदल होणे हे ही अपेक्षितच असते. मानव हा उत्क्रांत होत गेला तो या निसर्गातील बदलांमुळेच ना ! समाजाला उन्नत होण्यासाठी बदल अनिवार्य आहे व असेल. त्यासाठी नवीन संकल्पनांचे महत्व जाणून ते आत्मसात करण्याविषयीचा संवाद होणे जरुरीचे असते. असा संवादासाठी, संवाद घडवून आणण्यासाठी कोणीतरी अग्रभागी येणं आवश्यक असते. स्वातंत्र्यपूर्वकाळात सामाजिक उत्थान घडवून आणण्यासाठी राजाराममोहन रॉय, महर्षी अण्णासाहेब कर्वे , महर्षी अण्णासाहेब शिंदे, ज्योतिबा व सावित्रीबाई फुले ,र.धो. कर्वे अश्या कितीतरी लोकांनी मन्वंतर घडवून आणले. बाबा आमटे एके ठिकाणी म्हणतात ते किती सत्य आहे                                 

“आणि महंत फक्त गादी चालवू शकतात   
मन्वंतरे घडवून आणू शकत नाहीत”                                                                                

बदल पेरण्यासाठी प्रथम स्वतःमधे बदल करणे जरुरीचे असते. स्वतःचे आचार, विचार यात बदल होणे आवश्यक असते. नुसतेच ‘लोकांसांगे ब्रम्हज्ञान’ असे नसावे.  “स्व” मध्ये हा बदल कसा होत जातो ? स्व तील बदलाचे वारे कसे सुरु होतात? या मागची आंतर उर्मी कोणती असते? त्या मागची प्रेरणा काय असते ?हे आपणास समजत नाही , जोपर्यंत आपण अशा व्यक्तींना भेटत नाही, बोलत नाही.

हाच विचार करून पुण्यातील या ९ व्या ( एकुणातील ९२ व्या ) वेध चे सूत्र ठरविले – “बदल पेरणारी माणसं”
ही माणसं त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील “ एकलव्य” च होय !!

“ अशी सृजनशील साहसे हवी आहेत  
की जी बीजे पेरून वाट पाहू शकतील
जी भान ठेऊन योजना आखतील   
आणि बेभान होऊन त्या अमलात आणतील”  
-बाबा आमटे ( ज्वाला आणि फुले )     

 तर चला भेटूयात अशा “एकलव्यांना”!

-दीपक पळशीकर ,
आयोजक ,
वेध पुणे.

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: