माझी ‘वेध’ वारी

वेध : मनाचा अखंड चार्जर !
वेध : अंतरंग दाखवणारा बिलोरी आरसा ! 
वेध : क्षण रंगवणारा, जागवणारा कॅलिडोस्कोप ! 
वेध : दुसऱ्या इनिंग्स मधला निर्णायक षटकार !

मला वाटतं ते वर्ष २०१२-१३ साल असेल. माझे बाबा व पत्नी त्या डिसेंबर महिन्यातील, ते दोन-तीन दिवस अगदी भारावून रात्री घरी परत यायचे. घरी आल्यावर त्यांचा एकच पुकारा व्हायचा की ‘ अतुल तू वेधला यायला हवेस.’ पण मी माझ्या टिपिकल कॉर्पोरेट जगात खूप काम करत  ( ! ) सततचे दौरे, इत्यादी मध्ये झापड बांधून पूर्णपणे मशगुल होतो. त्यामुळे विकेंडला बाहेर पडून, अशा कोणत्याच कार्यक्रमांना जाण्याचा मला अजिबात उत्साह नसायचा. सामान्य मुंबईकराप्रमाणेच मी विकेंडला आडवा पडून सिलिंग बघत, मनाला आलेला न जाणारा थकवा घालवण्याचा जबरदस्तीने प्रयत्न करत राहायचो.

बाबांच्या बोलण्यातून एक गोष्ट मात्र जाणवली होती की वेध हे नक्कीच काहीतरी वेगळे रसायन आहे व त्याचं कुतूहल मनात निर्माण व्हायला सुरुवात झाली होती.  त्यानंतर मला आठवतं त्याप्रमाणे साल २०१४/१५ ला माझी पहिली वेध- वारी घडली असेल. 

वेधच्या सादरीकरणाची आगळी वेगळी पद्धत, सगळ्यांनी एकत्र म्हणण्याचे वेध गीत, वेधच्या व्यासपीठावर येणारे नवनवीन पाहुण्यांचे सामान्यातले देवपण, आलेल्या या बहुरूपी पाहुण्यांकडून त्यांचे अनुभव जिवंत करून सादर करण्याचे नाडकर्णी सरांचे कसब, या सर्वांच्या साथीला तरुणाईचा एक बेधुंद वाद्यवृंद, वेधला हजर असणाऱ्या रसिक श्रोत्यांचा तो जिवंत समुदाय व पूर्ण तीन दिवस अखंड मिळणारी ही मेजवानी आणि मी माझ्या पहिल्याच वेधला स्वतःला हरवून बसलो. पुढील सलग तीन-चार वर्ष मग घरातील कालनिर्णय कॅलेंडरवर, वेधच्या त्या वर्षाच्या तारखा सर्वात पहिल्यांदा बुक होऊ लागल्या ! आजच्या धावपळीच्या, धकाधकीच्या जीवनात, नवनवीन कुतूहल जागृत करणारा व मनाला ताजंतवानं करणारा वेध एकदाचा मला गवसला. 
सामान्यातून असामान्यत्वाकडे जाणारे हे वेधचे नवनवीन पाहुणे, त्यांचे संघर्ष, लढाया व अंतिम विजयापर्यंतचा त्यांचा प्रवास व त्यातून त्यांना मिळणारा तो अद्वैत आनंदाचा ठेवा यात मला माझ्या हरवलेल्या पायवाटा हळूहळू स्पष्ट दिसू लागल्या. त्यानंतर आलेला प्रत्येक वेध हा वेगवेगळ्या क्षेत्रातील, विषयातील नवीन क्षितिज गाठणाऱ्या आनंदवेड्या माणसांचा सत्कार व त्यांच्या पाऊलवाटेवर भरकटायला प्रेरित व प्रवृत्त करणारा मार्गदर्शक सोहळा ठरला. 

जसे वेध २०१५ मध्ये ठाण्याला, अनिल अवचट सरांचे ‘बाह्यरंग ते अंतरंग ‘ ( Cover to Core ) या सूत्रावर नाडकर्णी सरांसोबतचे सत्र खूपच छान रंगले होते. या सत्रानंतर मला तेंव्हा सुचलेले काही शब्द शेअर करतोय.  त्यावर्षीचे वेधचे सूत्र होते ” बाह्यरंग ते अंतरंग ”

ll बाह्यरंगात गुंतलो मी,का हरवलो प्रतिबिंबात ?

रंगलेल्या या बाजारात, मी मलाच शोधितो आज !
जागवून संवेदना अंतरी, ‘वेध’ ने केली खरी सुरुवात !

हा ‘प्रवास’ नव दिशेला, मम बाह्यरंगातून अंतरंगात ll

आज हे वाचताना, माझ्या विचारांमध्ये हळूहळू होणाऱ्या बदलाचे प्रतीक मला त्यात दिसतंय. अशाच वेधच्या वेगवेगळ्या सत्रातुन मग नवनवीन आनंद  मिळवण्याचा मार्ग दिसू लागला. पुढे स्वतःसाठी मिळणारा हा आनंदाचा घडा भरल्यावर, तो आनंद इतरांसोबत वाटल्याने द्विगुणित होईल हे वेध रुपी वाटाड्याने दाखवून दिले.

मग २०१६ मध्ये, या बदललेल्या माझ्यातल्या मला स्व-आनंदाचे, रूपांतर कृतीत करण्यास प्रेरित केले. मी सरळ ट्रेनचे, लाल डब्याचे टिकीट काढून भाऊ ( डॉ. प्रकाश आमटे) यांच्या गडचिरोली जिल्ह्यातील हेमलकसाला जाऊन पोहोचलो. तिथे जाण्याआधी माझ्या शाळेच्या मित्र-मैत्रिणींच्या सोशल ग्रुपला आव्हान करून, लोक बिरादरी प्रकल्पातर्फे भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम अशा नेलगुंडा येथे सुरू केलेल्या आदिवासी शाळेसाठी  १,३३,५०१/- रुपये गोळा केले. आपलाही चांगल्या कामात हा छोटासा सहभाग म्हणून ते पैसे तिथे सुपूर्त केले. नंतरही SEARCH गडचिरोली, हेमलकसा व नेलगुंडाचा प्रवास होतच गेला आणि तेथील कर्तुत्ववान देवमाणसांच्या सहवासाने माझ्या जगण्याला वेगळे वळण लागले. 

हेमलकसा

पुढे माझ्या कॉर्पोरेट जीवनातला तोचतोचपणाचा भुंगा डोकं व हृदय कुरतडायला लागला आहे याची जाणीव मला झाली !  सर्व काही म्हणायला छान दिसत होतं पण मनाचा तो निवांतपणा हरवला होता. महिनाअखेर एका मोठ्या रकमेचा sms येण्याच्या सवयीने मला चक्क घाण्यावरचा बैल करून टाकलं होतं. शरीराबरोबर मन सुदृढ असतानाच शेवटी मी माझ्या मोठ्या पगाराच्या नोकरीला रामराम ठोकला. नोकरी सोडताना माझ्या अपेक्षेपेक्षा जास्त आमिष माझ्यापुढे ठेवले गेले. Nothing compels, आत्ता नाही तर कधीच नाही, अशा निर्णयाचा तो क्षण. येथे सहाजिकच वेधने, माझ्या मनाला दिलेल्या औषध-गोळ्या कामी आल्या. माझ्या वेध सोबत घडलेल्या वारीमुळे, कॉर्पोरेट जगाची ही परतवारी करायला मला हिम्मत मिळाली. अखेर माझ्या वैयक्तिक स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देत, कुठल्याही विलोभनाला बळी न पडता मी कॉर्पोरेट जगातून बाहेर पडलो. या माझ्या निर्णय प्रक्रियेत माझ्या कुटुंबीयांकडून मला संपूर्ण पाठिंबा मिळाला. 

आज मी काही NGO साठी आनंदाने काम करत आहे. सरांच्या मार्गदर्शनाखाली M.A.( सायकॉलॉजी) ला ऍडमिशन घेऊन, माझ्या या आवडीचा विषयाचा अभ्यासही सुरू केला आहे.

मागच्या वर्षी २०१८ च्या ठाणा वेधमध्ये, जेव्हा माझ्या गळ्यात volunteer चा बॅच मी मिळवला व आलेल्या प्रेक्षकांची बैठक व्यवस्था तीन दिवस उत्साहात सांभाळली, तेव्हा त्याक्षणी मला झालेला आनंद मी शब्दात सांगू शकत नाही. याज साठी केला होता अट्टाहास, शेवटचा दिस गोड व्हावा. 

थोडक्यात काय तर,  वेधने माझ्या मनात तयार झालेल्या विचार धाग्यांचा गुंता सोडवून, तो धागा एका छानशा फिरकीवर गुंडाळून दिला आणि मग मी माझ्या आनंदाचा पतंग याच धाग्याला धरून वाऱ्यावर मस्त ढील देत बिनधास्त उडवता झालो ! शुभम् भवतु. 
कधी वाटलं नव्हतं की माझा हा प्रवास ( ! ) मी कधी कोणाबरोबर या पद्धतीने शेयर करीन. इदम् न मम. 

वेधच्या (माझ्या) संपूर्ण परिवाराला खूप शुभेच्छा, आभार व सदैव  ऋणी. 

तुमच्यातला एक,

अतुल कस्तुरे.
lawgic@yahoo.com 

One thought on “माझी ‘वेध’ वारी

  1. तुमचे अनुभव वाचून छान वाटलं. तुम्ही जे ठरवलं ते कृतीत आणलं. तुमच्या पुढील प्रवासा साठी मन:पूर्वक शुभेच्छा!

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: