वेध नावाच्या चळवळीची पंचवीस वर्षे….

25years-logo

आपली संस्था म्हणजे आय्. पी. एच्. अर्थात इन्स्टिट्यूट फॉर सायकॉलॉजिकल हेल्थ स्थापना झाली तेव्हा जागतिकीकरण नावाचा शब्द नव्याने येऊ घातला होता. कॉम्प्युटर म्हणजे माहिती साठवण्याचे खोलींएवढे अवाढव्य यंत्र अशी समजूत होती. टेलिव्हिजन रंगीत झाला होता पण शहरातल्या काही मोजक्या घरांचा अपवाद वगळता ‘स्टार टिव्ही’ ने म्हणजेच सॅटेलाईट चॅनल्स् नी आपले बस्तान बसवले नव्हते. आज आपण इंटरनेट आणि सोशल मिडीया खिशात घेऊन फिरतोय् त्यापेक्षा फक्त सव्वीस वर्षे पाठीमागे जायचं…फक्त?… अनेक युगे मागे गेल्यासारखे वाटेल आपल्याला. म्हणजेच माहितीची देवाण-घेवाण खूप मर्यादित होती. ‘लोकल’ हेच जणू ग्लोबल होते.

ह्या पार्श्वभूमीवर मानसिक आरोग्याची व्याख्या अशी केली जायची ते आता पाहू. आपली संस्था जिथे सुरू झाली ते ठाणे शहर तर महाराष्ट्रामध्ये ‘वेड्यांच्या हॉस्पिटल’चे शहर म्हणूनच ओळखले जायचे. मानसिक आरोग्याकडे पाहण्याचा समाजाचा दृष्टिकोनच मुळी ह्यातून ध्वनीत व्हायचा. पण मानसिक आरोग्याचा पाया आहे मनोविकास (Development). त्यासाठी लागणारी वैयक्तीक, सामुहीक मदत-सल्ला-प्रशिक्षण हा खरा मानसिक आरोग्याचा गाभा. दैनंदिन आयुष्यामध्ये येणार्‍या बाह्य परिस्थितीमधून तसेच स्वतःच्या मनातून उत्पन्न होणारा तणाव असह्य झाला की येते मानसिक विकलता (Distress). ह्या टप्यावरही गरज असते आधाराची आणि मार्गदर्शनाची. खरे तर कोणत्याही समाजामध्ये ह्या दोन पातळ्यांवर सशक्त मदत मिळाली तर मनोविकृती (Disorder) ह्या तिसर्‍या पातळीला कमीत कमी लोक पोहोचतील.

आपल्या देशातील मानसिक आरोग्याची प्रचलीत व्यवस्था मात्र नेमकी उलटी मांडणी करते. सगळ्यात महत्व मनोविकृतीला म्हणजे Disorder ह्या गटाला. इतर पातळ्या तर व्याख्येतच बसत नाहीत. बरं ह्या मानसिक आजारांवरच्या उपचारांची पद्धत कशी तर त्यांना समाजापासून दूर काढून फक्त गोळ्याऔषधांचे उपचार करण्याची. त्यातला कुटुंबाचा सहभाग, समाजाची जागृती ह्या गोष्टींना महत्व शून्य! आय्. पी. एच्. संस्थेचे वैचारीक महत्व हे की प्रचलीत व्यवस्थेला आव्हान देणारी चौकट पहिल्या दिवसापासूनच स्वीकारली गेली. विकास (Development) आणि विकलता (Distress) ह्यावर भर देणारे कार्यक्रम, उपक्रम, प्रकल्प, आणि सेवा. विकृती अर्थात् आजाराच्या उपचारांमध्ये कुटुंबाच्या सहभागाने पुनर्वसनावर भर. मग आजार स्किझोफ्रेनियाचा असो की व्यसनधीतेचा. विकासाच्या वाटांवर मार्गदर्शन करणारे उपक्रम सुरु झाले ते विविध वयोगटातील विद्यार्थी, पालक, शिक्षक ह्यांच्यासाठी. संस्थेच्या उपक्रम केंद्रामधल्या प्रत्येक सेवेबरोबर सुरु झाला लोकांपर्यंत पोहोचण्याचा एकेक प्रकल्प. १९९० साली ‘व्यवसाय मार्गदर्शन चाचण्या’ अस्तित्वात असतात हेच बहुसंख्य लोकांना ठाऊक न्हवते. आमच्या केंद्रामध्ये अशी सेवा सुरु झाली. पण तिचे महत्व कळायचे कसे?… चला आपण सुरु करुया एक व्यवसाय प्रबोधन परिषद. विद्यार्थी-पालक-शिक्षकांना माहिती देऊ करीयरच्या वाटांबद्दल.

आर्टस्, सायन्स, कॉमर्स ह्या शाखांमधल्या पर्यायाबद्दल… नाव काय बरं देऊया… वेधअर्थात् ‘Vocation Education : Direction and Harmony‘ इंग्रजी आणि मराठीतले बारसे झाले. शांताराम राऊत सरांसारख्या आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बोधचिन्ह कलाकारांनी वेधचा सुबक ‘लोगो’ तयार केला. १९९१ साली वेधचे पहिले अधिवेशन भरले ठाण्याच्या शिवसमर्थ शाळेच्या शिवदौलत सभागृहामध्ये. त्यावेळी अर्थातच् भर होता विविध व्यवसायांची माहिती देणारी संवादसत्रे करण्यावर. एकाच वेळी वेगवेगळ्या वर्गांमध्ये छोटी सत्रे होत. सुरुवातीचे आणि सांगतेचे सत्र मात्र एकत्र होई. पहिल्या दोन वर्षातच प्रतिक्रिया आल्या की “असे करु नका.” मत बनवायचे तर विविध मते ऐकायला हवीत. एका वेळी समांतर सत्रे असली तर सर्वांनाच सारखी माहिती मिळत नाही. त्यामुळे संवादाचा बाज कायम ठेवून एकत्रच कार्यक्रम होऊ लागला. हा उपक्रम लोकप्रिय करायला मी आणि सहकारी शाळाशाळांमधून फिरायचो. वर्गावर्गातून तीच ती रेकॉर्ड दिवसाला वीस-तीस वेळा वाजवायचो.

12140601_814049675387467_8376417635188350719_n

होताहोता सहा वर्षानंतर प्रथम ह्या परिषदेला दिड हजार विद्यार्थी पालक जमा झाले. आता उपक्रम बाळसे धरु लागला होता. पुढच्या वर्षापासून आम्ही प्रत्येक वर्षीच्या परिषदेचे सूत्र निश्चित करायला सुरुवात केली. आता खर्‍या अर्थाने ‘Event Designing’ सुरु झाले. अर्थपूर्ण संवाद हे माध्यम. पाहुण्यांबरोबरच्या विविध सत्रांची मालिका तयार व्हावी आणि त्यातून सूत्राचे अनेक पैलू बाहेर यावेत असा हा प्रयत्न होता…

12375230_836724586453309_6110098456319394420_o


२०१५ च्या ठाण्याच्या वेध परिषदेचे सूत्र होते ‘बाह्यरंग ते अंतरंग’ अर्थात् Cover to the Core. त्याआधीच्या वर्षीचे सुत्र होते ‘इच्छा तेथे पूर्ती’ अर्थात् ‘Intention to Completion’. आम्ही नेहमी इंग्रजी आणि मराठी अशा दोन्ही भाषेमध्ये सूत्र देतो… ‘घागर ते सागर’ ह्या सूत्राचे रुपांतर होते ‘From Dream to Team’. सूत्राप्रमाणे पाहुणे… पाहुण्यांप्रमाणे संवादाची आखणी… प्रत्येक सत्राला सुत्रामध्ये गुंफणे असा आशयपट रचायचा. त्याचे दृश्यरुपही प्रभावी हवे. वेध परिषदेचा सेट नेहमी टीव्ही शो सारखा असतो. नेहमीच्या चर्चा-परिसंवादांसारखा नसतो. त्यातले Mikes सुद्धा TV Show सारखे. प्रकाशयोजनाही तशीच. कारण आज अशा प्रतिमेबरोबर मने पटकन जोडली जातात आणि हा इफेक्ट देणे प्रचंड खर्चिक नसते. वेधच्या व्यासपीठावर संगीत असते. खास रचून संगीतबद्ध केलेली गाणी असतात. ती ही असतात त्य-त्या सूत्राच्या भोवताली गुंफलेली. नजरेनेच लोकांना कळले पाहिजे की हा रटाळ भाषण-परिसंवाद-व्याख्यानाचा कार्यक्रम नाही. तरीही वेधचा सेट साधा असतो.

ठाण्याच्या एका वेधचे सूत्र होते ‘Work Life Balance : जगण्याचा ताल आणि तोल.’ रंगमंचाचा अर्धा भाग घराचा सेट होता तर अर्धा भाग होता ऑफीसचा…हळूहळू हजारोच्या संख्येने लोक येऊ लागले तसे प्रचंड मोठे स्क्रीन्स आले. तीन कॅमेरांचा सेट-अप आला. प्रत्येक परिषदेनंतर नेमाने प्रकाशित होणारा DVD चा दृक् श्राव्य पॅक विक्रीला आला. आता ह्या सगळ्या संवादसत्रांची प्रतिष्ठापना यू-ट्यूबवरही होत आहे…. स्क्रीन्स् आल्यामुळे आशयाला आकार देण्यासाठी आता जवळजवळ सत्तर टक्के सत्र आम्ही visually आखतो. फोटोग्राफस्, पीपीटी, फिल्मस् ह्यांचा वापर करतो. फक्त शब्दाने अवधान धरुन ठेवण्याचे दिवस इतिहासजमा झाले आहेत. शब्दाला दृश्याची जोड हवीच. वेध परिषदेचा फोकस प्रथम माहिती देण्यावर होता. माहितीचे दरवाजे जसे खुले होत गेले तसा भर दिला जाऊ लागला दृष्टिकोनावर. तो टप्पाही मागे पडला. आता गरज वाटू लागली सशक्त जीवनमूल्ये विद्यार्थी-पालकांपर्यंत पोहोचवण्याची. खर्‍या अर्थाने मानसिक विकासाची उर्जा जागृत करण्याची… म्हणून प्रत्येक सत्रावर आम्ही मेहनत घेतो. येणारे पाहुणे ज्या क्षेत्रातील असतील त्याचा अभ्यास करतो. त्या पाहुण्यांच्या जीवनप्रवासाबद्दलचे संसर्भ मिळवतो. त्यांना भेटतो. चर्चा करतो. प्रश्न तयार करतो. ते वक्त्यांना पाठवून दृश्य भाग तयार करतो. ठाण्याच्या वेधमध्ये चौदा सत्रे असतात. इतर सात शहरांमधले वेध असतात प्रत्येकी पाच सत्रांचे म्हणजे दर वर्षाला मी आता ४९ मुलाखती घेतो… २०१६ मध्ये दोन शहरे वाढल्याने ही संख्याही दहाने वाढेल. ह्यामध्ये काही वक्ते एका शहरातून दुसरीकडे रिपीट होतात असे धरले तरी सरासरी पस्तीस नव्या
व्यक्तींबरोबर मी दरवर्षी संवाद साधतो. म्हणजेच आजवरच्या ६३ वेधमधून मी एकूण पाचशेच्या वर मुलाखतसत्रे घेतली आहेत. सर्व शहरांमधल्या वेधच्या व्यासपीठावर जरी मी सूत्रसंचालन करताना दिसत असलो तरी प्रत्येक शहरामध्ये ही परिषद संपन्न करणारी निःस्वार्थ कार्यकर्त्यांची मोठी फळी सतत कार्यरत असते. त्यामुळेच ठाण्याबरोबर आता नगर, औरंगाबाद, पुणे, नाशिक, लातूर, कल्याण, परभणी अशा शहरांमध्ये वेधची चळवळ पसरली आहे. ठाण्याचा वेध असतो तीन दिवस, अठरा तास, चौदा सत्रांचा… उपस्थितीही साडेतीन-चार हजाराच्या घरात. ठाणे शहरात तर आता वेधला ‘ठाण्याचे सवाई गंधर्व’ असे म्हटले आहे. ह्या परिषदेमधून मिळणारी सकारात्मक उर्जा घेऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले भविष्य घडवले आहे. त्यातले अनेक जण आज वेधला स्वकमाईतून देणगी देऊ लागले आहेत. काही जण तर विद्यार्थी म्हणून वेधला आले आणि आता ‘young achievers’ म्हणून वक्ते झाले असेही घडले अहे… वक्ता म्हणूनही जी व्यक्ती वेधशी जोडली जाते ती कायमची ह्यापरिवाराची होऊन जाते. सकारात्मक उर्जा घेऊन हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आपले भविष्य घडवले आहे. त्यातले अनेक जण आज वेधला स्वकमाईतून देणगी देऊ लागले आहेत. काही जण तर विद्यार्थी म्हणून वेधला आले आणि आता ‘young achievers’ म्हणून वक्ते झाले असेही घडले अहे… वक्ता म्हणूनही जी व्यक्ती वेधशी जोडली जाते ती कायमची ह्यापरिवाराची होऊन जाते.

वैचारीक कार्यक्रमांना लोक येत नाहीत अशी सार्वत्रिक तक्रार ऐकू येत असताना एक नव्हे तर दहा शहरांमध्ये हजारो माणसे ह्या बिना करमणुकीच्या आणि बिनाराजकीय-बिनाअध्यात्मिक कार्यक्रमासाठी जमतात हे दृश्यही आशादायक म्हणायला हवे. 

डॉ. आनंद नाडकर्णी

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: