वेध अर्थपूर्ण जगण्याचा

त्या वेळी मी औरंगाबादमध्ये होते. अंजली चित्रपटगृहात एका चित्रपटाचा खास शो आयोजित केला होता. चित्रपटाचं नाव होतं ‘देवराई’! अभिनेता अतुल कुलकर्णी, सोनाली कुलकर्णी, देविका दफ्तरदार, तुषार दळवी आणि डॉ. मोहन आगाशे यांच्या अभिनयानं नटलेला ‘देवराई’ हा चित्रपट मला खूप आवडला. तोपर्यंत स्किझोफ्रेनिया हा विकार काय असतो ते ठाऊकच नव्हतं. कितीतरी दिवस मन सुन्न झालं होतं. या चित्रपटाचे मार्गदर्शक, सल्लागार डॉ. आनंद नाडकर्णी हे मानसोपचारतज्ज्ञ होते. तिथूनच या माणसाशी माझी ओळख होत गेली. डॉ. आनंद नाडकर्णींची ओळख म्हणजे ते एक प्रथितयश मानासोपचारतज्ज्ञ, विख्यात लेखक, प्रभावी समुपदेशक, संवेदनशील कवी, दृष्टे नाटककार, कुशल संगीतकार आणि गायक, सामाजिक कार्यकर्ता, कुशल व्यवस्थापक, ओजस्वी वक्ता आणि प्रशिक्षक आणि अर्थातच ही यादी अशीच वाढत जाणारी!

त्यानंतर पुढल्या प्रवासात डॉक्टरांची अनेक पुस्तकं वेळोवेळी भेटत राहिली. त्या पुस्तकांमधून माणूस म्हणून डॉक्टरही कळत चालले होते. त्यांचं अनेकविध रंगांनी बहरलेलं आयुष्य आणि काम कळत चाललं होतं. त्यानंतर एकदा मुंबईत असताना आयपीएचचा वर्धापन दिनानिमित्त एक कार्यक्रम होता. आत्तापर्यंत अनुभवलेले रूक्ष, कोरडे, औपचारिक गोष्टींनी ठासून भरलेले आणि कंटाळवाणे कार्यक्रम तोपर्यंत मी अनेक बघितले होते. या कार्यक्रमानं माझ्या त्या पहिल्या अनुभवांना तडा देण्याचं काम केलं होतं. व्यासपीठावरचा डॉक्टरांचा वावर अत्यंत कमी होता. सुरेखशा साडीतला सुरेखसा आयपीएचचा स्त्रीवर्ग आयपीएचबद्दल मनापासून बोलत होता, त्यांचे अनुभव सांगत होता. मी या कार्यक्रमात रंगून गेले आणि तेव्हाच ठरवलं यापुढे आयपीएचचे कुठलेही कार्यक्रम शक्य तो मिस करायचे नाहीत. त्यानंतर डॉ. अभय बंग यांच्या निर्माण उपक्रमात काम करत असताना पुन्हा एकदा डॉ. आनंद नाडकर्णी तरुणांशी संवाद साधताना भेटले आणि मग मला ते सतत भेटतच गेले. कोणा एका क्षणी पुण्यात यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात वेध – मस्ती की पाठशाला या आयपीएचच्याच एका कार्यक्रमात अनिल अवचट आणि अच्युत गोडबोले उदघाटक होते. त्यांना बोलतं करण्यासाठी डॉ. आनंद नाडकर्णी व्यासपीठावर होते. समोरचा माणूस कितीही दिग्गज असो, मोठा असो किंवा अगदी सर्वसामान्य, साधा तरूण असो त्यांना बोलतं करावं ते डॉक्टरांनीच असं मनोमन त्या वेळी वाटून गेलं. कार्यक्रम अतिशय रंगला होता. मी डॉक्टरांची चाहती झाले होते.

पुढे ‘मनात’ या मानसशास्त्रावरच्या पुस्तकावर काम करत असताना डॉ. अल्बर्ट एलिसचा अभ्यास करता आला आणि त्याची विवेकनिष्ठ वर्तनवादी उपचारपद्धती (आरईबीटी) समजली. डॉक्टरांनी यावर अभ्यासक्रम तयार केला असून त्याचा अनेकांनी लाभ घेतल्याचंही समजलं आणि मीही आरईबीटी करायला हवं असं वाटायला लागलं. मनातल्या तीव्र इच्छेनं मला हा कोर्स पूर्ण करता आला. पुण्याहून प्रत्येक शनिवार-रविवार पहाटे सहाच्या शिवनेरीनं ठाण्यात पोहोचायचं असा मग तो कार्यक्रमच होऊन गेला. तिथे गेल्यावर तर दोन दिवस कसे भुर्रकन उडून जात ते कळतच नसे. महाराष्ट्रातून ठिकठिकाणांहून हा कोर्स करण्यासाठी सर्व वयोगटातले स्त्री-पुरुष येत. सकाळी नऊ वाजता नाश्ता करून हॉलमध्ये स्थानापन्न झालं की त्यानंतरचा सायंकाळी पाच-साडेपाचपर्यंतचा वेळ स्वतःला डॉक्टरांच्या आणि डॉ. शुभा थत्तेंच्या स्वाधीन करायचं असाच तो काळ होता. डॉ. शुभा थत्ते यांचं व्यक्तिमत्व इतकं प्रसन्न की त्यांच्याकडे बघून आपल्या आयुष्यातून नैराश्यानं आपोआप काढता पाय घ्यावा असं! त्या सकाळी हॉलमध्ये येत, तेव्हा त्या आपल्या त्या दिवशीच्या ड्रेसवर मॅचिंग कानातले घालत. फार किमती, मौल्यवान नसलेले ते कानातले, इतके सुरेख असत की त्यांच्यातली सौंदर्यदृष्टी बघून ‘वा, क्या बात है’ अशीच प्रतिक्रिया मनात उमटत असे. शुभा थत्ते यांनी मला ‘वय कुठलंही असो, नीटनेटकं कसं राहावं, साध्या राहण्यातही कसं सौंदर्य असू शकतं, आपल्या चेहर्‍यावरचं हास्य आजूबाजूचं वातावरण कसं प्रफुल्लित करतं’ हे शिकवलं.

डावीकडून : डॉ. शुभा थत्ते आणि दीपा देशमुख

तासा-दीडतासानंतर कुठल्याही व्यक्तीचं बोलणं ऐकायचं म्हणजे जांभया यायला लागतात, एका जागी बसून राहणं कंटाळवाणं वाटायला लागतं. पण इथं आरईबीटीच्या सत्रात मात्र जादूची कांडी या दोघांनी बहुदा फिरवली असावी. एकामागून एक सत्रं पुढे सरकत राहायची आणि मन त्यात गुंतून पडायचं. मेंदूमधली किचकट रचना असो, वा मानवी शरीरातल्या बाकी गोष्टी यातलं विज्ञान सहजपणे शिकवत डॉक्टर समोरच्याला आपल्या बरोबर सैर करायला घेऊन जायचे. त्यांच्या बोलण्यातून तो विषय तर समजायचाच, पण त्याचबरोबर तो किती रोचक आहे याचं भान डॉक्टरांनीच पहिल्यांदा करून दिलं. गाणी, गप्पा, गोष्टी, चर्चा अशा सगळ्यांमधून दिवस कसा संपायचा आणि आपण हसत खेळत कसं शिकलो हे आठवून मन अचंबित व्हायचं. त्यामुळे कितीही अडचणी आल्या, मुसळधार पाऊस आला तरी ओढ लागल्याप्रमाणे एकही सत्र न बुडवता हा कोर्स पूर्ण करता आला.

आरईबीटी या कोर्समुळे मनातलं द्वंद्व संपलं. कोर्स करण्याआधीची मी आणि नंतरची मी यातला बदल मलाच जाणवत होता. आधी अनेक प्रसंगांनी, आजूबाजूच्या परिस्थितीनं, आसपासच्या माणसांच्या वागण्यानं मी व्यथीत होत असायची. माझ्या छातीतली धडधड विनाकारण वाढायची, माझं डोकं प्रचंड दुखायचं. मात्र यावरचे उपाय माझ्या हातात नव्हते आणि औषध-गोळ्यांनी तात्पुरतं बरं वाटायचं. माझ्याबाबतीतच नव्हे, तर निर्माणमुळे आणि यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई यांच्यामुळे महाराष्ट्रातले अनेक युवा माझ्या संपर्कात आले होते, त्यांच्याशी एक नातं जुळलं होतं. ही सगळी मंडळी त्यांच्या जगण्यात वाट्याला आलेले प्रेमप्रसंग, प्रेमभंग, वैयक्तिक कटकटी मला सांगत. काही वेळा त्यांना सल्ला हवा असायचा. काहीजण नैराश्याकडे वाटचाल करत असायची. अशा वेळी मला प्रश्न पडायचा, की मी त्यांना साथ देतेय, माझा खांदा त्यांच्या सुखदुःखात डोकं ठेवायला देतेय, पण हे किती प्रमाणात करायला हवंय. मी कुठे चुकत तर नाही ना? या प्रश्नांची उत्तरं देखील मला आरईबीटी करताना सहजपणे मिळाली. माझ्यासाठी आणि इतरांसाठी मी कसा विचार करायला हवा, कुठपर्यंत जायला हवं हे डॉक्टरांनी मी न विचारताही मला सांगितलं. माझी सुखदुःखं माझ्या हातात आहे, माझं आनंदी राहणं माझ्या हातात आहे या एका विचारानं मी खूप निश्चिंत झाले. शांत झाले. माझ्या सहवासातल्या, मी ओळखत असलेल्या, ओळखत नसलेल्या अनेकांमधले मी गुणच लक्षात घ्यावेत आणि अवगुण/दोष कटाक्षानं दूर करावेत हेही मी शिकले. प्रत्येकातले गुण लक्षात ठेऊन त्यांच्यातल्या दोषांना मी मोठं करायचं नाही या विचारांमुळे ही सगळी मंडळी माझ्याजवळ कायमची जवळ राहिली.

या वेळी मी डॉक्टरांना खूप जवळून बघत होते. दिवसभराचा तो सहवास त्यांचं निरीक्षण करण्यातही नकळत जात होता. सतत उत्साही, प्रसन्न, हसतमुख असलेला माणूस! त्या वेळी पायावर शस्त्रक्रिया झालेली नसल्यानं डॉक्टरांचं वाढलेलं वजन आणि सुजलेला पाय या दोन्ही गोष्टींनी त्यांच्यावर अनेक मर्यादा येत. पण त्या मर्यादांचा बाऊ न करता डॉक्टर दिवसभर कसे उत्साही राहू शकतात याचं मला आश्चर्य वाटायचं. ते आमचेच होऊन जात. बरं विद्वत्तेचा कुठेही आव चेहर्‍यावर नसायचा आणि आपण फार मोठं शिकवून उपकार करतोय असंही काही जाणवायचं नाही. आमच्यातलेच एक होऊन हसतखेळत ते आम्हाला शिकवायचे. दिवसभराची वेळ संपली की मात्र एकही मिनिट न रेंगाळता ते तिथून कधी निघून जायचे कोणालाही कळायचं नाही.

या काळातच मी ‘तुमचे आमचे सुपरहिरो’ या मालिकेत त्यांच्यावर पुस्तक लिहायला घेतलं होतं. आमच्या कोर्सचं वेळापत्रक संपलं की संध्याकाळी ते मला गाडीत बसण्यापूर्वी फोन करत आणि ‘दीपा, चल आपण निघूया’ असं विचारत. मी धावतच माझ्या वर्गमित्र-मैत्रिणींच्या गराड्यातून निघून त्यांच्याबरोबर पुढला प्रवास करण्यासाठी सज्ज होत असे.

मुखपृष्ठ: ‘तुमचे आमचे सुपरहिरो’

आम्ही त्यांच्या घरी जात असू. पाचच मिनिटांत डॉक्टर फ्रेश होऊन माझ्यासमोर येऊन बसत. मग मी विचारलेल्या अनेक गोष्टींवर ते बोलत राहत. आम्ही रात्रीच्या अकरा-साडेअकरा वाजेपर्यंत बोलत राहायचो. मध्ये डॉ. सविता आपटे (डॉक्टरांच्या सुविद्य पत्नी) यांच्या आग्रहामुळे बोलणं जरा वेळ आटोपतं घेऊन आम्ही जेवण करायचो आणि पुन्हा बोलणं सुरू. डॉ. आनंद नाडकर्णी यांच्यावर पुस्तक लिहिताना त्यांची सगळीच पुस्तकं पुन्हा नव्यानं वाचून झाली. या माणसामधली विद्वत्ता जेवढी भावली, त्यापेक्षाही त्याच्यामधला माणूस मला अधिक भावला. ‘बोले तैसा चाले’ या पंक्तीचा प्रत्यय मला या माणसाला भेटून आला. यथावकाश मी त्यांच्यावर लिहिलेलं पुस्तक प्रकाशित झालं, त्याच्या अनेक आवृत्याही निघाल्या. हे पुस्तक अगदी खेड्याखेड्यापर्यंत जाऊन पोहोचलं. त्याचबरोबर माझा आरईबीटी कोर्सही पूर्ण झाला.

यानंतर मात्र मी आयपीएचशी – विशेषतः ‘वेध’ परिवाराशी जोडली गेले ती कायमची! वेधचे दोन दिवस म्हणजे भरभरून घेणं, मनात ते रुजवणं आणि समृद्ध होणं असा माझा प्रवास सुरू झाला.  पुणे वेधचे संचालक दीपक पळशीकर यांची भेट झाली. दीपक पळशीकरांबरोबरच पुण्यातली वेधची डॉ. ज्योती शिरोडकरसह अख्खी टीम, इतकंच नाही तर महाराष्ट्रातल्या इतर शहरांत संपन्न होणार्‍या वेधच्या नियोजन करणार्‍या सर्वच व्यक्तींबरोबर एक नातं निर्माण झालं. दीपक पळशीकर पती-पत्नी तर पहिल्याच भेटीत ते समोरच्याला आपलंसं करतात. त्यांच्यातली सहजता, स्नेह तुम्हाला बांधून ठेवतो. दीपक पळशीकर यांचे पुण्यात दातार क्लासेस आहेत. विद्यार्थ्यांसाठी वेगळी तळमळ असणारं आणि त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी झटणारं पळशीकर दांपत्य मला जवळून बघायला मिळालं. मी त्यांच्या अनेक विद्यार्थ्यांनाही या दरम्यान भेटले आणि शिक्षकवर्गालाही! तसंच या निमित्तानं नाशिकच्या लढाऊ वृत्तीच्या वेध संयोजक वंदना अत्रे असोत, कल्याणचे देवेंद्र असोत, वा परभणीचं नायक कुटुंब, पेणचे सदानंद धारप असोत, की लातूरचा धनंजय कुलकर्णी या सगळ्यांशीच माझं नातं जुळलं. प्रत्येक वर्षीच्या वेधसाठी माझं मन धाव घेऊ लागलं.

वेध उपक्रम काय आहे, याविषयी मी जास्त बोलणार नाही. पण वेध उपक्रमाची सुरुवात डॉ. आनंद नाडकर्णी यांच्या पुढाकारातून झाली. प्रत्येक शहरात (१० शहरांमध्ये!) वेध उपक्रम ‘विद्यार्थ्यांसाठी करियर मार्गदर्शन करायचं, तिथंपासून जीवनकी पाठशाला’ असा वेधचा प्रवास होत गेला. पूर्वी या उपक्रमात फक्त विद्यार्थी सहभागी असायचे, आता विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि कुठल्याही वयोगटाचा व्यक्ती यात सामील होऊ लागल्या. वेध उपक्रमाला सगळीकडेच उदंड प्रतिसाद मिळताना मी बघत होते. वेध सुरू करताना डॉक्टरांच्या नजरेनं प्रत्येक शहरासाठी सुयोग्य माणसांची निवड केली. वेधचं एक विस्तारित कुटुंब यातून आकार घेत राहिलं.

वेध अनुभवताना डॉक्टर आनंद नाडकर्णी आणि त्यांची टीम यांच्यातली अफाट ऊर्जा अनुभवायला मिळते. ही सगळीच माणसं कधी थकलेली, चिडलेली, कावलेली, वैतागलेली बघायला मिळत नाहीत. प्रत्येक वेधची एक थीम असते आणि त्या थीमवर आधारित एक गाणं त्या त्या वेधसाठी, त्या त्या शहरात रचलं जातं, संगीतबद्ध केलं जातं आणि समुहाद्वारे गायलंही जातं. या गीताची रचना, संगीत डॉक्टर आनंद नाडकर्णी स्वतः करतात. त्यासाठी ते कुठून वेळ काढतात कोण जाणे!

कसे होतसे वादळ शहाणे, चला घेऊ या त्याचा शोध,

भान दिशेचे जाण स्वतःची लपला यातच सुंदर बोध

वेधमध्ये डॉक्टरांचं एक नवं रूप बघायला मिळालं. शेकडो/हजारो मुलांना, युवांना, पालकांना, प्रौढांना, कार्यकर्त्यांना, रुग्णांना दिलासा देणारा, त्यांच्या समस्यांवर हळुवार फुंकर घालणारा, त्यांचा दिशादर्शक होणारा, त्यांना जगण्याची मूल्यं आणि खर्‍या यशाची व्याख्या सांगणारा माणूस म्हणजे एकच नाव – डॉ. आनंद नाडकर्णी!

या वेध उपक्रमात पहिल्या दिवशी दिग्गज मान्यवरांच्या हस्ते वेधचं उदघाटन होतं आणि डॉक्टरांनी घेतलेली त्यांची मुलाखत रंगते. दुसर्‍या दिवशी दिवसभर अनेक भरगच्च कार्यक्रमांची रेलचेल असते! दुसर्‍या दिवशी देशभरातून वेगळ्या वाटेनं प्रवास करणार्‍या व्यक्ती वेधसाठी निमंत्रित केल्या जातात. त्यांना डॉक्टर बोलतं करतात आणि सभागृहातला श्रोता त्या अनुभवांनी नुसता स्तिमित होत नाही तर त्याच्या मरगळ आलेल्या जगण्यात ही आलेली मंडळी ताजेतवानेपण भरून जातात. स्वच्या पलीकडलं जग काय असतं, एक वेड संपूर्ण आयुष्य कसं झपाटून टाकू शकतं, या वेडातून हाती काय गवसतं हे सगळं वेध तुम्हाला दाखवतं हे मात्र खरं!

डावीकडून : अभिनेता जितेंद्र जोशी आणि डॉ .आनंद नाडकर्णी

वेधमध्ये मला अनेकजण भेटले. त्यात जंगलं निर्माण करणारा जादाव पायेंग हा अवलिया भेटला. इतक्या निर्मळ मनाचा हा माणूस, की आजच्या घडीला अशी माणसं असतात यावर विश्वासच बसू नये! एक माणूस काय जादू करू शकतो, पर्यावरणाचं रक्षण कसं करू शकतो आणि एक अख्खं जंगल कसं उभारू शकतो हे या माणसाच्या प्रवासातून समजलं. वाट सोपी नसली तरी ती अशक्यही नाही हे या माणसानं दाखवलं. याच ठिकाणी मला अभिनेता जितेंद्र जोशी वेगळ्या रुपात भेटला. अभिनेत्यापलीकडे असलेला जितेंद्र जोशी मी वेधच्या व्यासपीठावर अनुभवला. त्याच्यातला संवेदनशील कवी, त्याची समाजाप्रती असलेली बांधिलकी मी अनुभवत होते. त्याचा संघर्षमय प्रवास जाणून घेताना आदरानं मन भरून गेलं. सुचेता कडेठाणकरसारखी गोबीचं वाळवंट चालत केवळ ५५ दिवसांत पार करून विक्रम नोंदवणारी मुलगी मी जवळून बघितली. असे जागतिक विक्रम करूनही वागण्यात कुठेही अहंकार नाही, तितकाच साधेपणा आणि इतकंच नाही तर वेधशी कायमचं नातं जोडून एखाद्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासारखी त्यात विरघळून जाणारी सुचेता खूप भावली. जिंकायची भावना क्षणभंगूर असते, स्पर्धा, जिंकणं हे निरर्थक आहे असं सहजपणे सांगणारी सुचेता अतिशय संयमी आणि हसतमुखपणे आपल्याला सामोरी येते.

उजवीकडून: सुचेता कडेठाणकर आणि मुलाखतकार डॉ .आनंद नाडकर्णी

वेधच्या उपक्रमात मला भेटला सुनिल खांडबहाले हा तरूण! प्रतिकूल परिस्थितीतून त्यानं तंत्रज्ञान कसं आत्मसात केलं आणि जगाच्या इतिहासात आपली ओळख कशी निर्माण केली हे या निमित्तानं मला बघता आलं. डॉक्टर आणि आयआयटीतून इंजिनिअर झालेला अभिषेक सेन हा उद्योजक तरूणही याच वेळी भेटला. तंत्रज्ञानाचा आरोग्याशी संबंध कसा जोडता येईल आणि आरोग्य सुविधा ग्रामीण पातळीपर्यंत कशा नेता येतील या ध्येयानं झपाटलेला आणि त्यासाठी आरोग्याशी संबंधित उपकरणं बनवणं, ते किफायतशीर दरात गावापर्यंत पोहोचवणं ही त्यांची कामं बघून त्याच्याविषयी अभिमान वाटला. काश्मीरची भीती न बाळगता, तिथे जाऊन धडकणारा आणि तिथल्या लोकांशी नातं जोडणारा, त्यांना शिकवणारा, त्यांना रोजगार उपलब्ध करून देणारा, त्यांना भारताचं खरं दर्शन करून देणारा सारंग गोसावी देखील मला इथे भेटला. एक वेगळा काश्मीर सारंगनं माझ्या डोळ्यांसमोर उभा केला. पुण्याचा अधिक कदम हा बॉर्डरलेस फाऊंडेशनच्या माध्यमातून जम्मू-काश्मीरच्या मुलींच्या शिक्षणासाठी काम करताना बघून अचंबित व्हायला झालं.

सारंग गोसावी

इथेच सीए झालेला अभिजीत थोरातही भेटला. अभिजीत आणि सारंग यांना मी आधीपासून ओळखत असले तरी अभिजीतमधल्या रत्नाला पैलू पाडत त्याला खुलवणारे डॉक्टर इथे असल्यानं त्याच्यातले अनेक सुप्त पैलू मला वेधच्या व्यासपीठामुळेच उलगडले. सीए म्हणजे काय हे ठाऊक नसलेला एका खेड्यातला मुलगा आयुष्यातली वेडीवाकडी वळणं पार करत पुण्यातला एक नामांकित सीए कसा बनतो आणि आपला खडतर प्रवास न विसरता आपल्यासारख्यांच्या मदतीसाठी कसा उभा राहतो हे मला त्याच्या ‘नादान परिंदे फाऊंडेशन’च्या माध्यमातून दिसलं आणि इतक्या लहान वयात त्याच्यात आलेल्या त्या भानापुढे मीही नतमस्तक झाले.

उजवीकडून: अभिजीत थोरात, डॉ .आनंद नाडकर्णी आणि दीपा देशमुख

‘हमारी मुठ्ठी मे आकाश सारा’ म्हणणारी शारदा बापट ही डॉक्टर तरुणीही मला वेधच्या निमित्तानं भेटली. एका आयुष्यात एक स्त्री काय काय करू शकते ते ती हसतमुखानं सांगत होती. कुठल्याही अडचणींचा बाऊ ती करत नव्हती. आधी ही तरूणी कला शाखेतली पदवी मिळवते काय, त्यानंतर कायद्याचं शिक्षण घेते काय, त्यानंतर  विज्ञानाची पार्श्वभूमी नसताना अचानक डॉक्टर बनते काय, संगणकातली तज्ज्ञता मिळवते काय, पायलट होते काय आणि शाश्वत शेतीचे प्रयोग करते काय आणि त्याच वेळी पियानोवादनही करते काय, सगळंच विलक्षण! इथे हत्तीशी संवाद साधणारा आनंद शिंदे हा तरूण भेटला. हत्तीमधली संवेदनशीलता, त्याचं मृदू कोमल मन आनंदमुळे कळलं. आनंदला राष्ट्रीय पुरस्कारांसह अनेक मानाचे पुरस्कार मिळाले असले तरी त्याला मात्र हत्तीचा मित्र म्हणवून घेण्यातच धन्यता वाटते हे विशेष! आनंद शिंदेनंतर भेटला इथं तो तुषार कुलकर्णी! हा जिराफांचा मित्र! जिराफांवर अभ्यास करणारा, त्यांचं संवर्धन करण्यासाठी झटणारा, त्यांच्यातल्या गुणांना ओळखणारा, त्यांचं बारकोडिंग करणारा तुषार म्हणजे एक अजबच रसायन आहे.

डावीकडून : ‘बुकलेट गाय’ अमृत देशमुख , दीपा देशमुख , डॉ .आनंद नाडकर्णी आणि डॉ . शारदा बापट

‘बुकलेट गाय’ या नावानं ओळखला जाणारा सीए झालेला अमृत देशमुख नावाचा एक तरूण एके दिवशी आपली मोठ्या कंपनीतली सहा आकडी पगाराची नोकरी सोडतो आणि पुस्तकांच्या जगात प्रवेश करतो. पुस्तकांचं वेड त्याला गप्प बसू देत नाही आणि तो जगालाही हे वेड लावण्याच्या मागे लागतो त्याची गोष्टही वेधच्या व्यासपीठानंच मला ऐकवली. अमृत प्रमाणेच खेड्यापाड्यांमधल्या मुलांमध्ये ‘ग्यान की लायब्ररी’ असा उपक्रम सुरू करून वाचनसंस्कृती रुजवण्यासाठी प्रयत्नशील असलेला आणि त्याबरोबरच अनेक प्रकल्प राबवणारा प्रदीप लोखंडे हाही तरूण वेधच्या व्यासपीठावरून संवाद करता झाला. आज त्याला ‘पोस्टकार्ड मॅन ऑफ इंडिया’ म्हणतात. पोस्टकार्डचा कल्पकतेनं उपयोग करणारा एक आगळा माणूस म्हणून प्रदीपकडे बघावं लागेल.

बीई मेकॅनिकल विषय घेऊन इंजिनियर झालेला अमित गोडसे याच्या आयुष्यात अचानक एके दिवशी मधमाशा आल्या आणि त्यांना संपवण्याच्या मागे लागलेला समाजही त्याला दिसला. मधमाशांचं संवर्धन करणं हेच त्याच्या जगण्याचं ध्येय कसं बनलं याची कहाणी अमितनं वेधच्या व्यासपीठावरूनच मला ऐकवली. विज्ञान प्रत्येकाच्या जगण्याचा भाग बनवण्याच्या ध्यासानं झपाटलेला संजय पुजारी आणि कल्याणेहोळ या गावाला विज्ञान गाव बनवणारा खानदेशातला जयदीप पाटील हे दोघंही मला इथं भेटले. आपलं जगणं अर्थपूर्ण करत असतानाच इतरांच्याही आयुष्यातला अंधार दूर करत त्यांना डोळस बनवण्याचं काम हाती घेतलेले हे अनोखे तरूण. विज्ञान किती सोपं असतं आणि ते आपल्या जगण्याचा भागही कसं असतं हे सांगणारे हे दोन तरूण आहेत. संजय पुजारीला तत्कालीन राष्ट्रपती अब्दुल कलामांकडून राष्ट्रीय पुरस्कारानं गौरवलं गेलं, तर जयदीपला विज्ञान सेवक या मानाच्या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. मात्र या पुरस्कारांनी दोघांच्या वागण्यात जगण्यात कुठलाही बदल झाला नाही. ते आपलं विज्ञान प्रसाराचं काम अव्याहतपणे करतच आहेत.

आजच्या चंगळवादी झालेल्या जगात, भौतिक गोष्टींच्या आहारी जाणार्‍या जगात नेहा सेठ नावाची एक हरियाणा राज्यातली इंजिनिअर झालेली तरूणी एके दिवशी कबीराची वाणी ऐकते आणि कबीराचं ‘ मन लागो यार फकिरी मे’ हे भजन तिच्या आयुष्याचा भाग कसं बनतं हे बघून मी तर स्तिमित झाले. कबीरमय होण्यासाठी तिचा संघर्ष बघून थक्क झाले. ‘अपनी धुन मे मगन रहो तो, सुखदुखसे क्या लेना देना’ ही डॉक्टरांनी लिहिलेली गीतरचना नेहाच्या बाबतीत तंतोतंत लागू पडणारी वाटते. लीलावतीज डॉटर म्हणून ओळखली जाणारी शास्त्रज्ञ असलेली प्रियदर्शिनी कर्वे ही एक यशस्वी उद्योजिका आहे, जैवतंत्रज्ञानापासून इंधननिर्मिती करणारी, धूरविरहित चुलीची निर्मिती करणारी ती एक संशोधक आहे. तिचा प्रवास देखील चकित करणारा असा आहे.

वयाच्या २५ व्या वर्षी मराठवाड्यातल्या बीडजवळच्या गेवराई गावातला संतोष गर्जे यानं उजाड माळरानावर सहारा अनाथालय उभारून शेकडो मुलांना पालकत्व दिलं. त्यांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली. त्यांचं जगणं अर्थपूर्ण बनवलं. हा संतोषही एका वेगळ्या वाटेनं चालणारा प्रवासी होता आणि आहे.

वेधच्या व्यासपीठावरून अनेक असाधारण माणसांशी ओळख झाली. त्यातलीच एक व्यक्ती म्हणजे टेंपल मॅन ऑफ इंडिया या नावानं ओळखली जाणारी के. के. महंमद! हिंदूस्थानवर १७ वेळा स्वारी करणारा गझनीचा महंमद एकीकडे, तर त्याच वेळी भारतातल्या २०० हिंदू देवालयांचं पुनरुज्जीवन करणारा हा केरळमधला के. के. महंमद दुसरीकडे! डाकूंनी वेढलेल्या चंबळच्या खोर्‍यात अतिशय निर्भिडपणे काम करणारा हा माणूस, एकीकडे संस्कृतचा अभ्यासक आहे, तर त्याच वेळी तो जातीधर्माच्या पलीकडे जाऊन प्रत्येक गोष्टीतलं सौंदर्य शोधणारा आहे हे बघून शंभरवेळा त्यांच्यासाठी मनात कृतज्ञतेची भावना भरून आली. एका सत्रात मला एपिलेप्सी सपोर्ट ग्रुपची यशोदा वाकणकर, स्किझोफ्रेनिया सपोर्ट ग्रुपसाठी काम करणारी अस्मिता मोकाशी आणि डायबेटिस सपोर्ट ग्रुपची समुदपदेशक विद्या गोखले या तरूणी भेटल्या. आपल्या विकारांशी झुंजत त्यांनी आपल्यासारख्या इतरांना आधार देण्याचं मोठं काम हाती घेतलं आहे.

काम करत असताना शारीरिक अपंगत्व आलेलं असतानाही ताठ मानेनं जिद्दीनं उभे राहणारे उत्तर प्रदेशातल्या मेरठचे कर्नल दत्ता मला वेधच्याच व्यासपीठावर भेटले. ब्लड रनर या नावानं ते ओळखले जातात. ‘दुःखानं आक्रमण केलं तरी मी त्याला सहजपणे परत जायला लावेन’ असं सांगणारे कर्नल दत्ता आपल्याला ‘रूक जाना नही, तू कही हारके’ या त्यांच्या आवडत्या गाण्याची आठवण करून देत होते.

चांगला धट्टाकट्टा असलेला एक तरुण, त्याच्या आयुष्यात एके दिवशी अंध व्यक्तींचा प्रवेश होतो आणि त्याचं जगणंच कसं बदलून जातं हे ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’चा किताब मिळालेल्या स्वागत थोरातनं मला दाखवलं. शेकडो, हजारो अंधाचे डोळे बनून त्यांना जग किती सुंदर आहे हे दाखवणारा स्वागत कसं जगावं याचा जणू पाठच देतो.

डावीकडून : ‘ब्रेल मॅन ऑफ इंडिया’ स्वागत थोरात, मुलाखतकार डॉ .आनंद नाडकर्णी आणि डॉ. ज्योती शिरोडकर

कोणीतरी कोणासाठी आयुष्य वेचावे

जीवनाच्या वाटेवरी सुख पेरीत जावे

स्वागतच्याच या कवितेच्या ओळी मला अंतर्मुख करून गेल्या. माझीही दृष्टी आणखीनच विकसित करून गेल्या.

वेधच्याच व्यासपीठावर भुपेंद्र त्रिपाठी हा सॉफ्टवेअर इंजिनिअर असलेला, पण पॅरेलेसिस, कॅन्सर आणि अंधत्व यांनी आक्रमण केलेला तरूण भेटला. या सगळ्या शत्रूंना पिटाळून लावत, त्यांच्याशी दोन हात करत आज तो अहमदाबाद इथे रिझर्व बँकेच्या मॅनेजरपदी विराजमान असलेला पाहून डोळे भरून आले. चिकाटी काय असते, झगडणं काय असतं हे भुपेंद्रची वाटचाल सांगत होती. आज इतक्या अडथळयांची शर्यत पार करत चालणारा भुपेंद्र आयुष्याकडे बघताना फुलं आणि काटे दोहोंनाही स्वीकारतो आणि त्या निर्मिकापुढे नतमस्तक होतो हे बघून मीही त्याच्यापुढे मनोमन झुकले.

वेधमध्ये हे आणि असे अनेक अनवट वाटेवरचे वाटसरू भेटले. त्यांच्या जगण्यातून वेळोवेळी अफाट ऊर्जा मिळत राहते. कायम सकारात्मक राहा हा संदेश नकळत मनात रुजला जातो. संघर्षाला, प्रतिकूल परिस्थितीला, समस्यांना घाबरू नका, तर त्यांचा सामना करा हेही वेधनं मनावर बिंबवलं. इतकंच नाही तर वेधनं एक वैश्विक कुटुंबही दिलं. जाती-धर्माच्या भिंती पार करून मानवता धर्माची रुजवणूक करणारी माणसं दिली. जगण्याच्या ठरावीक चौकटी मोडून एक मोकळं आकाश निर्माण करून दिलं. त्यामुळे वेधशी हितगुज करताना, मनाचा वेध घेता आला आणि ‘वेध माझा, मी वेधची’ असं जाणवलं! थँक्यू वेध!

दीपा देशमुख, पुणे

adipaa@gmail.com

2 thoughts on “वेध अर्थपूर्ण जगण्याचा

  1. फार सुंदर. परदेशात रहात असल्या मुळे वेध ला प्रत्यक्ष हजर राहता येत नाही पण युट्युब वर सगळे कार्यक्रम बघते. आजच्या या लेखातून अजून किती बघायचं राहून गेलंय ते समजलं. धन्यवाद दीपा ताई!

    Like

  2. वाह दीपा , वेधचा सुरेख आढावा ! या सर्व लोकांना मी भेटले असल्यामुळे वाचताना सर्वांना एकत्र भेटल्यासारखे वाटले .

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: