अंकित, आपको जाना पडेगा…

जवळ-जवळ अडीच दशक वृत्तपत्रातील नोकरीचे रोमांचकारी, व्यस्त आयुष्य जगता-जगता अचानक त्याला ब्रेक लागला. अवचित समोर आलेल्या आजाराच्या आव्हानामुळे नोकरीचा निरोप घेण्याची वेळ आली तेंव्हा एकच प्रश्न कुरतडत होता. नोकरीमधील माझे काम आजवर मला समाजाशी जोडून राहण्याची संधी देत होते, त्याचे काय? भोवतालचा समाज, आणि त्यातील बहुरंगी माणसे व त्यांच्या जगण्याच्या तऱ्हा मला कायम चकित करीत असतात. जगण्याच्या प्रवाहात अधिक खोल उतरत त्यामागची कारणे जाणून घेण्यास  आणि त्यातून लिहिण्यास  प्रवृत्त करीत असतात. मी पत्रकारितेच्या व्यवसायाकडे वळण्याचे ते एक प्रमुख कारण होते. आता तो माझ्या आनंदाचा धागाच हातातून निसटून जातोय असे काहीसे दिसू लागले तेंव्हा आलेली अस्वस्थता हाताळणे सोपे नव्हते. जरा स्वस्थ झाले तेंव्हा जाणवले,  माझ्याच नकळत एक दुसरी खिडकी हलकेच उघडत होती. ‘वेध’ नावाची. आणि त्याचे निमित्त होते ठाणे वेध मध्ये झालेली एक मुलाखत. २००८ साली ताज हॉटेलवर झालेल्या दहशतवादी हल्यामध्ये ज्या दोन स्त्रियांनी (त्यातील एक सूनु मार्टिस) आपले पती गमावले त्या दोघींची मुलाखत. ज्या जीवघेण्या जखमेची वेदना अजून ओली होती, ती सोसणे अतिशय अवघड होते अशा एका वेदनेचा पदर दोन-तीन हजार श्रोत्यांपुढे उलगडणे सोपे नव्हते. दुःखाचा आवेग आवरणे त्या स्त्रियांसाठी जेवढे अवघड होते तेवढेच ते श्रोत्यांसाठी सुद्धा जणू आव्हान होते. नाडकर्णी सर ज्या तऱ्हेने ती मुलाखत त्या दोघींच्या वैयक्तिक दुःखाकडून त्यांना अनुभवाला येत असलेल्या व्यापक विधायकतेकडे वळवत होते तो अनुभव निव्वळ अचंबित करणारा होता. हेलावून टाकणारा होता. मला माझ्या प्रश्नाचे उत्तर देणारा होता. माणसांशी, समाजाशी जोडून घेण्याचे एक निमित्त देत होता. त्या वेध मध्ये ज्यांना ऐकायला मिळाले ती सगळीच माणसे काही प्रसिद्धीच्या वलयात वावरणारी वगैरे नव्हती. काही अगदी साधीशी पण कमालीची आंतरिक ताकद असणारी. काही झपाटून काम करणारी पण प्रसिद्धीचा एखादा कवडसा अंगावर येताच संकोचून जाणारी. आपल्या कामाचे कोणतेच श्रेय न मागणारी. त्या एका अनुभवानंतर ‘वेध’ नावाची गोष्ट आयुष्यात महत्वाची होऊ लागली. जाणवले, माणसांना भेटण्याची, त्यांना जाणून घेण्याची आणि ही माणसे पुन्हा वेगळ्या रुपात समाजापुढे नेण्याची हि संधी आहे . समाजाशी जोडून घेण्याचे एक वेगळे निमित्त मग मिळाले..

आणि हेही जाणवू लागले, ‘वेध’ चा हा एकदा डोळ्यावर चढलेला चष्मा आता उतरणे मुश्कील. समोर येणारी प्रत्येक व्यक्ती पूर्वी लेखनाचा विषय म्हणून डोक्यात रेंगाळत असे आता त्याच्या बरोबरीने मनात येऊ लागले ते ‘वेध’चे विचार.  कोणत्या सूत्रात गुंफता येईल या व्यक्तीच्या कामातील वेगळेपण? त्यातील निर्धार आणि समर्पण आणि असे बरेच काही त्याच तीव्रतेने  जाईल ना लोकांपर्यंत? असे प्रश्न घेत वेगवेगळी माणसे आणि त्यांचा ध्यास याचा शोध ‘वेध’च्या निमित्ताने घेत राहणे हे ‘वेध’ संयोजनातील माझे अतिशय आवडते काम. शोधासाठी लागणारे धागे कुठून तरी हाताशी येत असतात. वृत्तपत्रातील एखादी बातमी, अवचित हाती लागलेली यु ट्यूबची लिंक, एखादे पुस्तक किंवा मित्र मंडळीशी झालेल्या गप्पा. या शोधात कोणताही विषय वर्ज्य नाही. कचरा? चालेल, पाणी? नक्कीच हवे, शेती? ती तर महत्वाचीच आणि अवकाश विज्ञान सुद्धा हवेच. त्यामुळे शोधाला दहा दिशा मोकळ्या. हा शोध कधी कधी इतका अनिवार असतो की त्यात वास्तवाचे भान हरपण्याची शक्यता नाकारता येत नाही. ‘वेध’साठी आपल्या गावात पाहुण्याला बोलवायचे पण तो अगदी सात समुद्र पार असला तरी? बोलावूया की, काय बिघडले… असे वाटण्याचे क्षण खूप असतात. हळूहळू त्यातील आव्हाने दिसू लागतात आणि मग पाय कधीतरी दाणकन जमिनीवर आदळतात..! पण अशा वेळा दुर्मिळ. एरवी आटापिटा करून त्या व्यक्तीपर्यंत पोचण्याचे वेड स्वस्थ बसू देत नाही. दोन वर्षापूर्वीच्या नाशिक ‘वेध’मध्ये अंकित कावात्रा नावाच्या युवकाला निमंत्रित करण्याची इच्छा होती. यु ट्यूबवरील एका लिंकमधून भेट झाली होती त्याची. आपल्या महानगरांमधून लग्न समारंभ आणि अशा निमित्ताने होणाऱ्या जेवणावळी/पार्ट्या  यामधून वाया जाणारे अन्न आणि दोन वेळेला पुरेसे अन्न न मिळाल्याने उपाशी, कुपोषित राहणारी अनेक लहान मुले यांच्या दरम्यान पूल होऊन काम करणारी त्याची संस्था. त्याच्याविषयी वाचले आणि वाटले बोलवायलाच हवे अंकितला…! मग त्याच्या संस्थेला फोन, मेल, फेसबुक वर पोस्ट… सगळे झाले, आमंत्रण पोचले. येण्याचे आश्वासन मिळाले पण त्यात भरवसा नव्हता. खूप खटपटीनंतर शेवटी खुद्द अंकित जेंव्हा फोनवर भेटला तेंव्हा त्याचे पहिले वाक्य होते, “वंदनाजी, मेरे ऑफिसमे सबके काम के बारेमे important notes लिखनेके लिये एक बोर्ड लगाया है, उसपर सबसे उपर मेरे लिये एक नोट लिखी है. वो है, अंकित, Please do accept Nashik invitation and meet Vandanaji. so I am coming..”. आनंदाने हर्षभरित होण्याचा क्षण होता तो आमच्या टीमसाठी… असे अनेक क्षण आणि अनुभव ही वेध ची देणगी…! अर्थात सगळेच अनुभव असे नसतातच, कसे असतील? पण गेल्या दहा वर्षात काम करतांना एक गोष्ट शिकायला मिळाली आहे, एखाद्या व्यक्तीकडून ‘वेध’च्या आमंत्रणाचा स्वीकार किंवा नकार किंवा त्याबद्दलची स्तब्ध मुग्धता हे सगळे आपल्याला खूप काही शिकवत असते. अधिक प्रयत्न करण्यासाठी बळ देते… नवा वेध, नवा शोध हा मंत्र घेऊन… अशा अनुभवाविषयी पुढे केव्हातरी आणखी…

वंदना अत्रे,

नाशिक वेध.       


नाशिक वेध २०१९, २९ सप्टेंबर रोजी संपन्न होणार आहे…  जरूर या!...

One thought on “अंकित, आपको जाना पडेगा…

  1. वा! वंदनाताई, तुमच्या रुपात वेधला नाशिकमधे एक खंबीर कार्यकर्ता सापडला आहे. पुढच्या वेळी भारतात येईन तेव्हा जर एखादा वेध चा कार्यक्रम असेल तर जरूर ऐकायला जाईन.

    Like

Leave a Reply

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  Change )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  Change )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  Change )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  Change )

Connecting to %s

Create your website at WordPress.com
Get started
%d bloggers like this: